DNA Live24 2015

लोकशाहीतून विकासाकडे...


ग्रामपंचायत हा लोकशाहीचा पाया आहे. तर, आपल्या देशाची संसद कळस. अशीच शिकवण आपल्याला आतापर्यंत 'पुस्तकी नागरिकशास्त्रा'ने दिलेली आहे. हीच ओळख पक्की होण्याऐवजी दिवसेंदिवस ढिल्ली होत असल्याची आपली सार्वत्रिक भावना आहे. कारण, जिल्हा परिषदेपासुन संसदेपर्यंत व्हाया विधीमंडळापर्यंत सगळ्यांनी संविधानिक घटकांची पायमल्ली करून 'कळस' गाठला आहे. त्याचेच लोण आता गावकीपासून भावकीपर्यंत पोहचले आहेत. उद्याही अशाच पद्धतीने नगर जिल्ह्यातील ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठीचा 'कळसाध्याय' रचला जाणार आहे. त्यानिमित्ताने समस्त मतदारांना उपदेशाचा डोस पाजण्याचे कर्तव्य समजून केलेली ही नसती उठाठेव...

महिनाभरापासून जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमुळे एक वेगळा उत्साह अनुभवण्यास मिळत आहे. हा उत्साह नेमका कशा पद्धतीने वृद्धिंगत होतो, त्यानंतर कसा जोमाने फोफावतो व लोकशाही तत्वांना कशा पद्धतीने बळकटी देतो, याबद्दल बोलण्याचीच ही सर्वोत्तम वेळ आहे. प्रत्येक गावचा रंग वेगळा असल्याने निवडणुकीचा गावोगावचा ढंगही निराळाच असतो. प्रत्येक गावच्या निवडणुकीची एक वेगळी तर्‍हा असते. आपल्या बेरकी जिल्ह्यात याचेच रंग अनेकदा सप्तरंगीही होतात. लोकशाही व या निवडणुकांचा नेमका काय संबंध असाच भाबडा प्रश्न तुमच्यासारखाच मलाही पडलेला आहे. मित्रान्नो, (यातही फक्त पुरुषप्रधान संस्कृतीकडे झुकलेल्या व आपल्याकडे लोकशाही फक्त 50 टक्केच असल्याचा भाव आहे) मुळात निवडणूका व लोकशाही यांचा आपल्याकडचा संबंध खुप राहिलेलाच नाही. त्यामुळेच असल्या बेरंगी तत्वांबाबत वाचण्याची तुमचीही इच्छा नसेलच. परंतु, तुम्हाला असलं उपदेशपर काहीही वाचायची इच्छा नसल्याचे थेट सांगता येणारी लोकप्रिय राजकीय पद्धती म्हणजेच लोकशाही होय. तोच तर लोकशाहीचा खरा वारसदार आहे. त्याच वारसदारांना या निवडणुकीनिमित्त मानाचा मुजरा..!

आपल्या देशात लोकशाहीबाबतचे तीन मतप्रवाह आहेत. पहिला लोकशाहीच्या नावाने फक्त गळे काढून मतदानाला नेमकीच दांडी मारतो. दुसरा असल्या शब्दांचा विचारही न करता थेट मतदानाला जाऊन कर्तव्य बजावतो. तर, तिसरा आणि सर्वात हुशार प्रवाह म्हणजे लोकशाहीमधील निवडणुकांचा मनसोक्त आनंद लुटतो. यातला पहिला गट हा शिकून साक्षर झालेला असतो. त्याला जरा जास्तच 'अ'ज्ञान आलेले असते. लोकशाही व निवडणुकांना तो कस्पटासमान मानतो. तर, दुसरा पैसे न घेता किंवा प्रसंगी गरिबीपुढे लाचार झाल्याने पैसे घेऊनही मतदानाचे कर्तव्य बजावतो. याच घटकाने खर्‍या अर्थाने आपल्याकडील लोकशाही टिकवून ठेवली आहे. याच घटकाच्या जागृतीमुळे आपल्याकडे गावापासून देशभर रक्तहिन क्रांतीव्दारे सत्ताबदल होतो. तर, तिसरा घटक या एकुणच प्रक्रियेत नेता, पुढारी, कार्यकर्ता अन् प्रचारक या नावांनी मिरवत असतो. हा घटक लोकशाहीच्या पहिल्या प्रवाहाकडे दुर्लक्ष करतो. कारण ते मतदानासारख्या राष्ट्रीय कर्तव्याला विसरलेले असतात. मात्र, दुसर्‍या घटकामधील मतदारांना आकर्षिक करून घेऊन सत्तेच्या केंद्रस्थानी जाण्याचा प्रयत्न हा तिसरा घटक नेहमीच करतो. कधीकधी मतदानाचे माप आपल्याकडे झुकविण्यासाठी हा तिसरा घटक पहिल्या किंवा दुसर्‍यांना हरभर्‍याच्या झाडावर चढवून उमेदवारी करण्यास भाग पाडतो. याच प्रयत्नांत अपयशी ठरल्यावर या पहिल्या दोन्ही घटकांचा एकुणच निवडणुकीच्या लोकशाही मार्गावरून विश्वास कमी होतो. अशा पद्धतीने पहिल्या घटकास देशासह लोकशाहीचे काहीही देणेघेणे नाही, तर तिसर्‍यांना लोकशाहीच्या मार्गाने आपली पोळी भाजून घ्यायची आहे. यात मधल्यामधे दुसरा घटक वैतागला आहे.

मात्र, याच दुसर्‍या घटकाने देशातील लोकशाही जिवंत ठेवली आहे. तोच खर्‍या अर्थाने निवडणुकांत सक्रीय सहभाग नोंदवून आपले संविधानिक कर्तव्य बजावत आहे. यापैकी बर्‍याच जणांकडे आर्थिक चणचण असते. त्यातूनच यांना आकर्षिक करून घेण्यासाठी लोकशाहीच्या निवडणुकांमध्ये तिसरा घटक 'अर्थ'पूर्णरित्या त्यांना 'लाभार्थी' ठरण्यासाठीची प्रलोभने दाखवतो. मात्र, मित्र-मैत्रिनींन्नो, नव्हे भारतीयांनो या तिसर्‍या घटकांनाच हद्दपार करण्यासाठी तुम्हाला आर्थिक प्रलोभनांना बाजूला सारून मतदानाचा हक्क बजविण्यासाठी पुढे यावे लागणार आहे. पहिला घटक फक्त शिकलेला आहे. त्याला नोकरी व कुटुंबाच्याच चाकोरीतून 'देशभक्ती'चा आनंद घ्यायचा आहे. त्याच्याकडून या देशाला कोणत्याही अपेक्षा नाहीत. तो मध्यमवर्ग असल्याने 'मध्यममार्गी'च राहणार आहे. दुसर्‍या घटकाकडेच या लोकशाहीला प्रगतीकडे नेण्याची धमक आहे. चला तर मग सारासार विवेक शाबीत ठेऊन मतदान करूया, मतदानाचा हक्क बजावतानाच आपल्या देशाला सकारात्मक विकासाकडे नेण्याचे कर्तव्यही पार पाडुया..!
- श्री. सचिन मोहन चोभे.
मो. 9422462003

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget