DNA Live24 2015

कृषी विभागाचेही 'स्वदेशी' रडगाणे...!


कोणतीही घटना घडो, त्यात परदेशी शक्तींचा हात असल्याची बतावणी करण्याचे धोरण आपण सत्तर वर्षानंतरही सोडलेले नाही. याचीच आठवण पुन्हा एकदा कृषी विभागाच्या विशेष टास्क फोर्सने करून दिली आहे. त्यास निमित्त घडले आहे, विदर्भ आणि खानदेशातील कीटकनाशक फवारणी प्रकरणाचे. त्याचा आढावा घेणारा हा विशेष लेख खास 'कृषीरंग'च्या वाचकांसाठी...

विदर्भ आणि खानदेशात आतापर्यंत सुमारे ४० बळी गेल्यानंतरही राज्याचा कृषी विभाग 'अर्थ'पूर्णरीत्या शांततेत आहे. अशावेळी बैठकावर बैठका घेतल्याचे भासवून अनेकांनी 'दिवाळी' करून घेतली आहे. एकूणच या प्रकरणात राज्याचा कृषी विभाग, कंपन्या, वितरक आणि कृषी सेवा केंद्रचालक आरोपींच्या पिंजर्यात आहेत. अशावेळी आपापली चामडी वाचविण्याचेच 'नैसर्गिक' धोरण या सर्व घटकांनी ठेवले आहे. परिणामी भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणारच नाही, असे छातीठोकपणे सांगणारा एकही 'जबाबदार' घटक राज्यात नसल्याचेच चित्र आहे. यालाच छेद देण्याची मोठी संधी कीटकनाशक फवारणी प्रकरणातून बळी गेलेल्यांच्या प्रकरणाची तपासणी करणाऱ्या विशेष टास्क फोर्सवर होती. मात्र, त्यांनीही सध्या आपल्या देशात सुरू असलेला 'स्वदेशी'चा नारा बळकट करताना या प्रकरणाची जबाबदारी थेट परदेशी शक्ती अर्थात कंपन्यांवर टाकली आहे.

विशेष टास्क फोर्सने दिलेल्या अहवालानुसार मोन्संटो, बायर आणि सिंजेनटा या तीन कंपन्याच्या अतिजहाल कीटकनाशकांच्या वापरामुळे हे बळी गेले आहेत. वसंतराव नाईक शेती स्वावलंबी मिशांनचे अध्यक्ष श्री. किशोर तिवारी यांनी हा अहवाल नुकताच सरकारला सादर केला. त्यानुसार या तीन बहुराष्ट्रीय आणि बलाढ्य कंपन्यांवर जबाबदारी टाकण्यात आली आहे. कदाचित विशेष टास्क फोर्सने दिलेला अहवाल १०० टक्के खरा आहे,  असे आपण काहीवेळ मान्यही करू. पण मग, कंपन्या अशा पद्धतीने मनमानी करून शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्या होत्या तेंव्हा राज्याच्या कृषी विभागाचे धुरीण काय करीत होते, असा भाबडा प्रश्न पडतोच की. आपले कृषी सेवा केंद्र चालक कंपन्यांच्या जीवावर परदेशी टूर करण्यासाठी जाताना, हाच कृषी विभाग काय झोपा काढत होता का? या कंपन्या देशात येऊन शेतकऱ्यांची सेवा करीत नाहीत. शेतकरी लूट हाच या बड्या कंपन्यांचा अजेंडा आहे. मात्र, आपला भारतीय रक्त असणारा कृषी विभागाचा अधिकारी-कर्मचारी, वितरक आणि मुख्य म्हणजे कृषी सेवा केंद्रचालक अशावेळी काय पाकडे किंवा चिन्यांशी दोन हात करण्यात व्यस्त होते काय..?

असे प्रश्न यानिमित्ताने नक्की पडतात. सगळ्याच गोष्टींना 'स्वदेशी'चा मुलामा देण्याची आपली परंपरा हजारो वर्षांची आहे. त्याच मानसिकतेतून हे शेतकरी अनास्थेचे बळी ठरले आहेत. या कंपन्या काही देश्प्रेमातून आपल्या भारतीय शेतीची सेवा करीत नाहीत. मात्र, या कंपन्यांचे अतिजहाल कीटकनाशक विकले जात असताना, आपला कृषी विभाग आणि सरकारी यंत्रणा काय झोपा काढत होती का? भारतीय बनावटीचे बोगस आणि बनावट कीटकनाशक सध्या बाजारात मिळत आहेत. तसेच जैविक नावाने हजारो भारतीय कंपन्या आणि सल्लागार शेतकऱ्यांना गंडवत आहेत. त्यांच्यावरही याचे काहीतरी शिंतोडे नाही का जात? तसे नसल्यास बाजारात मिळणार्या सर्व भारतीय उत्पादाकांच्या कृषी निविष्ठा सर्वोत्तम असल्याचे 'प्रमाणपत्र' या विशेष टास्क फोर्सने जरी केलेले आहे का, असाही प्रश्न शेतकरी पुत्र म्हणून आम्हाला पडतोच की...

यातही सर्वात महत्वाचे म्हणजे आघाडी सरकारच्या काळातही याच कंपन्यांची मुस्कटदाबी सरकारी कृषी विभागाकडून सुरू होती, याचीही पुन्हा आठवण येतेच की. त्यावेळी याच कंपन्यांवर कोणत्या मुद्द्याने क्लीनचीटची कृपादृष्टी या (बे)जबाबदार कृषी विभागाने केली होती. नगर बाजार समितीत मागील आठवड्यात 'हरळी'च्या औषधाने गच्च भरलेल्या दुकानातील बोगस आणि बनावट कृषी निविष्ठा गायब होईपर्यंत अहमदनगरचा कृषी विभाग काय झोपा काढत होता का? या राज्यासह 'पृथ्वी'चीच वाट लावण्याचाच ठेका कृषी विभागाने घेतल्याबद्दलची चर्चा शेतकऱ्यांत आहे. अशावेळी साप-साप म्हणून परदेशी कंपन्याच्या नावाने भुई धोपटणे नेमके कोणाच्या हिताचे आहे, असाही प्रश्न पडतोच की. राज्यभरात बोगस आणि बनावट कृषी निविष्ठा उत्पादन आणि विक्रीचा 'बाजार' मांडण्यात देशी-परदेशी कंपन्यांसह कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी, वितरक आणि मुख्य म्हणजे कृषी सेवा केंद्रचालक एकसारखेच जबाबदार आहेत. त्यांना सगळ्यांनाच एका मापात मोजण्याची गरज आहे. आपला त्यो बाब्या आणि दुसर्याचे ते कार्टे, असा दुटप्पी न्याय देऊन यावर पांघरून टाकणे, संपूर्ण महाराष्ट्राला परवडणारे नाही...

(श्री. सचिन मोहन चोभे, संपादक आणि जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना, अहमदनगर)

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget