DNA Live24 2015

संभाव्य अतिवृष्टीच्या काळात शेतकऱ्यांनी जीविताच्या, कृषिमालाच्या सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे : कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर

मुंबई : राज्याच्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ या भागात ५ ऑक्टोबर ते १४
ऑक्टोबर या कालावधी दरम्यान विजेच्या कडकडाटासह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने
वर्तविली आहे. या काळात शेतकऱ्यांनी जीवितास तसेच कापणी केलेल्या अथवा कापणीयोग्य मालाच्या
सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आज
येथे पत्रकार परिषदेत केले.
कृषिमंत्री म्हणाले की, अतिवृष्टीमुळे शेतातील उभ्या शेतमालास फटका बसू शकतो. हे नुकसान
टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतमालाची सुरक्षितरित्या साठवणूक करावी. कृषी उत्पन्न बाजार समितीकडे
आणलेला शेतमाल व्यवस्थितरीत्या झाकून ठेवावा. तसेच या काळात विजेचा कडकडाट होऊन वीज
कोसळण्याच्या दुर्घटना होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक
आणि शेतकरी बांधवांनी स्वतःच्या आणि जनावरांच्या जीविताच्या रक्षणासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय
घ्यावा. मोकळे मैदान, वीजवाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मरच्या जवळ थांबू नये.
यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांच्या फवारणी दरम्यान १८ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना
घडली. ही घटना अतिशय दुःखद आणि क्लेशदायक आहे. या घटनेबाबत राज्य सरकार संवेदनशील असून
मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेतील पीडितांना २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच या घटनेच्या
चौकशीसाठी गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली
आहे. या समितीला घटनेची कारणमीमांसा करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या
अहवालात दोषी आढळणाऱ्यांवर तात्काळ योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्र्यांनी
यावेळी बोलतांना दिली.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 साठी जवळपास ५६ लाख ५९ हजार
शेतकरी कुटुंबांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. ज्या जिल्ह्यातील बँकांनी तपशील दिले आहेत त्या जिल्ह्यातील
शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दिवाळीपर्यंत कर्जमाफीची रक्कम जमा होईल. तसेच जे शेतकरी कर्जमाफीचे
अर्ज भरण्यापासून वंचित राहिले आहेत त्यांचा देखील दुसऱ्या टप्प्यात फेरविचार करण्यात येणार आहे,
असेही कृषीमंत्र्यांनी सांगितले.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget