DNA Live24 2015

बोगस कंपन्या व बनावट कृषी निविष्ठा उत्पादकांवर कारवाई करा : शेतकरी संघटना

नगर : विदर्भातील यवतमाळ येथे जहाल किटकनाशकांच्या फवारणीमुळे २० शेतक-यांचा बळी गेला आहे. कृषी विभागाच्या बेपर्वाईमुळेच राज्यात बनावट खते व किटकनाशकांची व बोगस कंपन्यांच्या कृषी निविष्ठांची विक्री होत आहे. त्यामुळे यवतमाळ घटनेचा निषेध व्यक्त करतानाच नगर जिल्ह्यातही अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कर्तव्यदक्षपणे काम करण्याचे आवाहन शेतकरी संघटनेने केले आहे.

शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचे दक्षिण नगर जिल्हाध्यक्ष सचिन चोभे व उत्तर जिल्हाध्यक्ष बापुराव आढाव यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व कृषी विकास अधिकारी यांना याबाबतचे निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांच्यासह कार्यकर्ते शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्यभर काम करीत आहेत. मात्र, यवतमाळसारखी घटना घडल्याने संघटनेसह शेतकरी बांधवांतही कृषी विभागाबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. किटकनाशक कंपन्यांसह कृषी सेवा केंद्र चालकांकडून शेतक-यांना जहाल औषधींची सर्रास विक्री केली जात आहे. तसेच अनेक बोगस कंपन्या व बनावट खते व किटकनाशक औषधांचीही जिल्ह्यात विक्री होत आहे. यास आळा बसविण्यासाठी कारवाई तातडीने करण्याची गरज आहे. सध्या विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात अशाच जहाल व बनावट किटकनाशकांच्या फवारणीदरम्यान सुमारे २० शेतक-यांचा बळी गेला आहे. तसेच सुमारे ५०० शेतकरी विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. याच पार्श्वभुमीवर नगर जिल्ह्यातही अशा घटना टाळण्यासाठी कृषी विभागाने तातडीने कार्यवाही करणे गरजेचे होते. मात्र, विभागाकडून साधी बैठक घेतल्याचेही ऐकिवात नाही. त्यामुळेच या विभागास कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी संघटनेला निवेदन द्यावे लागत आहे. त्यावर तातडीने कार्यवाही करून जिल्ह्यात बोगस खत व औषध कंपन्यांसह बनावट कृषी निविष्ठांचे उत्पादन व विक्री करणा-यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात यावा.

चोभे यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यातील नगर, श्रीरामपूर, सुपा-पारनेर आदी एमआयडीसींसह गावोगावी सुरू असलेल्या खत व किटकनाशक निर्मिती व पेकेजिंग कंपन्यांची तपासणी होणे गरजेचे आहे. तसेच जैविक कृषी निविष्ठांच्या नावाने शेतकरी वर्गाची होणारी फसवणूक हाही मोठा विषय आहे. स्थानिक अधिकारी व कर्मचारी यांना हाताशी धरून व दलालांच्या मार्फत ही बोगस व बनावट कृषी निविष्ठा विक्रीची टोळी कार्यरत आहे. त्यावर आळा न बसविल्यास नगर जिल्ह्यातही यवतमाळ जिल्ह्यासारखीच भीषण दुर्घटना घडू शकते. हेच टाळण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातर्फे कर्तव्यदक्षपणे काम करण्याची मोठी जबाबदारी आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget