DNA Live24 2015

..अन्यथा धर्मांतर हाच पर्याय !

'धर्माच्या नावाखाली सुरू असलेला रुढींचा खेळ संपवा, अन्यथा धर्मांतर हाच पर्याय' असल्याचा विचार मांडला आहे जेष्ठ पत्रकार श्री. दीपक कांबळे यांनी. हाच सविस्तर लेख कोणतीही काट-छाट न करता वाचकांसाठी प्रसिद्ध करीत आहोत...


धर्मशास्त्राने घालून दिलेल्या रुढी परंपरांविरोधी गेलो, तर त्याचे गंभीर परिणाम आपल्यासह पुढील पिढींना भोगावे लागतील, या भितीपोटी कर्मकांड माजवणाऱ्या दलालांना आजही मोठे महत्व असल्याचे मला प्रकर्षाने जाणवत आहे. एकीकडे देश जगातली चौथी अर्थसत्ता म्हणून वेगाने पुढे जात आहे. हा २०१७ चा भारत आहे, आम्ही देखील हे नाकारत नाही. पण समाजव्यवस्था अजूनही बदलायला तयार नाही.

काही दिवसांपूर्वी एका लग्नसमारंभाला जाण्याचा योग आला. आमच्याच एका नातेवाईक मित्राच्या कन्येचा धार्मिक प्रथेप्रमाणे विवाह योग जुळून आला. या मंगलप्रसंगापूर्वी दोन दिवस अगोदर त्यांच्याच भावकीतील एका जणाचा मृत्यू झाला. लग्न दोन दिवसांवर येऊन ठेपलेले असताना ‘सुतक’ नावाचा अजगर आडवा आला. त्याचा बोभाटाही गावभर पसरला. मग सुतकात लग्न करू नये, असा सल्ला जुने जाणकार देऊ लागले, तर काहींनी लग्न उरकून घ्या, असाही सल्ला दिला. दोन मतप्रवाह तयार झाल्याने कन्येच्या वडिलांनी एक नव्हे तर तीन प्रथापरंपरांच्या दलालांची भेट घेऊन काय करावे ? लग्न पुढे ढकलावे का ? किंवा काय करावे, अशी विचारणा केली. त्यावर या दलालांनी लग्नसमारंभ उरकण्यास नाहरकत दिली. पण एक अट घातली. ती अट अशी होती की, कन्येच्या आई-वडिलांसह भाविकीतील मंडळींना विवाहप्रसंगी कन्येच्या डोक्यावर अक्षता अर्पण करता येणार नाही. भविष्यात कन्येच्या वैवाहिक जीवनात अडचणी नकोत, या भितीपोटी हा निर्णय मान्य करून लग्न उरकण्याचा निर्णय घेण्यात आला. कन्येच्या डोक्यावर आपल्या हातून अक्षता पडाव्यात या स्वप्नांचा तर चोळामोळा झालाच. शिवाय आदल्या दिवशी हळद समारंभातही आई-वडिलांना सहभाग घेता आला नाही. पाहुणे मंडळींनी प्रथेप्रमाणे विधी उरकले. मुलीला हळद लावताना कासराभर अंतरावरून हुंदक्यांचा आवाज माझ्या कानावर आला. मी थोडासा जवळ जाऊन पाहिले, तर कन्येची आई डोळे पुसताना मला दिसली. सुतक नावाच्या भिकारचोट प्रथेमुळे या आईला मुलीच्या गालावर दोन बोटं हळदीचे लावता आले नाहीत, यापेक्षा मोठी वेदनाच नसावी…, मुलीच्या विवाहाचे मंगलअष्टक पूर्ण होईपर्यंत मुलीची आई तुळशीला तांब्याने पाणी देते. हे देखील त्या माउलीच्या नशिबी उरले नाही, कारण धर्मशास्त्राचे थोतांड मांडणाऱ्या त्या दलालाने घातलेली अट आडवी येत होती. ज्या धर्मात आम्ही राहतो, ज्या धर्माचे आम्ही पालन करतो, तोच धर्म वर्षानुवर्षे आमच्या हक्क आणि भावनिक अधिकारांवर अशी गदा आणतो, हे २०१७ च्या भारतातील तरुणाईला न पटणारे आहे.

लग्न हे मंगल कार्य आहे, आणि एखाद्याचा मृत्यू होणे ही अमंगल किंवा दूर्दैवी घटना आहे. ज्या कार्याचे नावच मंगल कार्य आहे, त्याला अमंगल घटनेची बाधा कशी निर्माण होऊ शकते ? राज्यघटनेत असे काहीही लिहिलेले नाही. मग, या रुढी, प्रथांचे गारुड सांगणाऱ्या दलालांवर विश्वास कशासाठी ठेवतो आपण ? अनिष्ठ रुढी ज्या महापुरुषांनी संपवण्यासाठी लढा दिला, तो लढा, आपण भ्रामक रुढी आजही पाळत असल्याने जिंकु शकलो नाही. या घटनेनंतर अस्वस्थ झालेल्या मनाने माझ्या मनात विचार आला की, जर धर्म आम्हाला असे वर्तन करायला सांगत असेल तर तो धर्म आमचा आहे का ? की या धर्माचा त्याग करून धर्मांतर करावे किंवा कोणताच धर्माचे लेबल न लावता ‘धर्मनिरपेक्ष’ बनावे अशा अनेक प्रश्नांचे मोहळ माझ्या मनात उठले, आणि दोन दिवसांपासून मोहळ मनात घोंगावतय...म्हणून अस्वस्थ झालोय...

- श्री.दीपक कांबळे, मो. ९५६११५९५०५

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget