DNA Live24 2015
January 2018


परभणी : प्रतिनिधी
तालूक्यातील झरी येथे उदयगिरी नेत्रालय (उदगीर, जि. लातूर) व कै. स्वातंत्र्य सैनिक पंडितराव देशमुख यांच्या वतिने आयोजित नेत्र तपासणी शिबीरात २८० रुग्णांची तपासणी करण्यात आली.
दि. २९ ते ३१ जानेवारी २०१८ दरम्यान मोफत नेत्र तपासणी शिबीर कृषीभूषण कांतराव काका देशमुख यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात २८० रूग्णांची तपासणी करण्यात येवून या पैकी ५० रूग्ण शस्त्रक्रियेसाठी उदगीर येथे पाठवण्यात आल्याची माहीती कांतराव काका यांनी दिली.

परभणी : प्रतिनिधी
यावर्षी खरिप हंगामाच्या सरतेशेवटी परतीचा समाधान कारक आणि दिर्घ काळ ओल टिकून ठेवणारा चांगला असा पाऊस झाला. यामुळे रब्बी पिके रग्गड येणार असल्याच्या शेतक-यांच्या अशा पल्लवीत झाल्या.

सोयाबीनने मारले पण रब्बी नक्कीच तारणार आहे, असे चित्र जिल्ह्यात सर्वत्र पाहवयास मिळते आहे. यातच जायकवाडी धरण पाण्याने पूर्णपणे भरल्याने परभणीतील हजारो शेतक-यांना बागायती पिके घेण्यासाठी पाणी मिळत आहे. डिग्रस बंधारा देखील पाण्याने तुडूंब भरलेला आहे. यावर्षी शेतक-यांनी सोयाबीन च्या खाली झालेल्या जमीनीत हरबरा, गव्हू, करडई, टाळकी ज्वारी या रब्बी पिकांची मोठ्या क्षेत्रात पेरणी केली आहे. सध्या ही रब्बी पिके जोमात आहेत.

हरब-यास घाटेभरण होवून काही ठिकाणी तो काढणीस आलाय तर ब-याच क्षेत्रात भारदास्तपणे घाटे लगडून उभा आहे. ज्वारीच्या कणसांना दाणे भरण्यास सुरूवात झाली आहे. करडई पिक देखील जोमातच दिसते आहे. तर गव्हू पिकशुध्दा ओंबी धरीत आहे.ओलीत क्षेत्राबरोबरच कोरडवाहू जमीनीतही ही रब्बी पिके डौलदार पणे उभी आहेत. ऐन शेंगा लागण्याच्या अवस्थेत पावसाने उघडीप दिल्याने यंदा सोयाबीनचे उत्पादन घटून शेतक-यांना एकरी एक ते दिड क्विंट्टलच उतारा आला होता. खरिपाचे नुकसान रब्बी नक्कीच भरून काढणार असल्याचे रब्बी पिकाच्या जोमदार परिस्थितीवरून दिसून येतेय. तुरीने देखील शेतक-यांना तारले आहे. तुरीचे चांगले उत्पादन झाले.परंतू शासनाचे हमी दर केंद्रे अजुनही चालू झाले नसल्याने मनमानी पध्दतीने व्यापारी शेतक-यांची तुर खरेदी करून लुट करीत आहेत. आता हरब-याचेही तेच होणार काय? असा प्रश्न आहे.

शेतकरी शेतात अहोरात्र काबाड कष्ट करून पिकातून माणिक मोती पिकवीत आहेत. मात्र, त्यांच्या शेती उत्पादीत कच्च्या धनधान्यची खरेदीही हमी दराने शासनकर्ते खरेदी करीत नसल्याने भरपूर उत्पादन होवूनही शेतक-यांचे दरापायी दरवर्षि मोठे आर्थिक नुकसान होत आहे आणि मग यातूनच शेतीला वाईट दिवस शेती पिकून देखील येताहेत ते उत्पादन खर्चावर आधारित भाव न मिळाल्याने. ईतकी शासन व्यवस्था बिघडून गेलेली आहे. असो, यंदा मात्र रब्बी पिके सध्या स्थिती जोमात आहेत. त्यापासून विक्रमी उत्पादनही होईलच. पिके तसी आहेतही. जिल्ह्यातील काही भागास कितीतरी वर्षानंतर जायकवाडी पाण्याने भरल्याने त्या भागातील शेतक-यांनी मोठ्या प्रमाणावर रब्बी पिकांची पेरणी केली आहे. तेथील रब्बी पिकं शुध्दा एक नंबर अवस्थेत आहेत. ऊसाची लागवडही वाढली आहे.यंदा सोयाबीन ने मारले पण रब्बी पिकं नक्की शेतक-यांना तारतील.
(शब्दांकन : श्री. आनंद ढोणे पाटील)


परभणी : प्रतिनिधी
तालूक्यातील स्वच्छ गांव सुंदर गांव झरी येथे सर्वांगीण विकासाभिमुख व्यक्तीमत्व असलेले कांतराव काका देशमुख यांच्या पुढाकारातून झरी येथे  परभणी-जिंतूर मुख्य रोडवरच असलेल्या विक्रांत पेट्रोलियमच्या ठिकाणी उदयगिरी लाँयन्स नेत्र रूग्णालय उदगीर व कै.स्वा.सैनिक पंडितराव देशमुख व्हीजन सेंटर झरी यांच्या तर्फे दि २९ जानेवारी २०१८ पासून ३१ जानेवारी २०१८ तिनदिवसीय मोफत काँम्पुटरव्दारे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले असून आता पर्यंत बहूसंख्य गरजू रूग्णांनी याची लाभ घेतला आहे.

हे शिबीर ३१ जानेवारी २०१८ पर्यंत सकाळी ८ पासून दुपारी ४ वाजे पर्यंत चालू राहणार आहे.शिबीरात शस्रक्रियेस येणा-या रूग्णांनी निवडणूक व आधारकार्ड व ईतर ओळखपत्र सोबत ठेवून औषधीसाठी लागणा-या पैसे तयार ठेवावेत.शिबीरात तपासणी केलेल्या रूग्णांना त्यांच्या नंबरच्या पाँट्स नुसार अल्प दरात चष्मे हे श्रीराम आप्टीकल परभणी जामकर काँम्पलेक्स जिंतूर नाका यांच्या कडून देण्यात येणार आहेत.सदरील शिबारात गरजू रूग्णांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेण्याचे अवाहन कांतराव काका झरीकर यांनी केले आहे.

अहमदनगर : प्रतिनिधी
राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आहेत. या सर्व सरपंचांची लेखी परिक्षा घेतली जाणार असून त्यानंतरच त्यांना स्वाक्षरीचा अधिकार मिळणार असल्याची माहिती आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपट पवार यांनी सांगितले.

ते म्हणाले की, या परिक्षेत पास झाले तरच या सरपंचांना काम करता येणार आहे. याबाबतच्या शिफारशी आमच्या समितीने केल्या आहेत. त्यानुसार लवकरच निर्णय होणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

नगर तालुका पत्रकार संघ व नगर तालुका बाजार समितीतर्फे आयोजित गाव कारभारी परिषदेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. दरम्यान ते म्हणाले, चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करीत आहे. आमच्या समितीने ही शिफारस केली आहे. लवकरच यावर निर्णय अपेक्षित आहे.

अहमदनगर : प्रतिनिधी
थेट जनतेतून सरपंच निवड व चौदावा वित्त आयोगाच्या निधीमुळे ग्रामपंचायती सक्षम झालेल्या आहेत. आता याच ग्रामपंचायतींमध्ये तलाठी, कृषी अधिकारी व इतर विभागाचेही कर्मचारी बसण्यासाठीचे निर्देश सरकार देणार आहे, अशी माहिती आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपट पवार यांनी दिली आहे

अहमदनगर : प्रतिनिधी
चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करीत आहे. आमच्या समितीने ही शिफारस केली आहे. लवकरच यावर निर्णय अपेक्षित असल्याची माहिती आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपट पवार यांनी दिली.

नगर तालुका बाजार समिती व तालुका पत्रकार संघातर्फे आयोजित गाव कारभारी कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

वर्धा : प्रतिनिधी
राज्यभरातील शेतक-यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पणन व कृषी राज्यमंञी सदाभाऊ खोत यांना साकडे घातले आहे. यावर सकारात्मक काम करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात तुरीची खरेदी केंद्रे चालु करावी, शेतीमाल खरेदी करताना A,B,C या ३ ग्रेड मध्ये करावा, तारण योजनेत शेतकर्यांना हमी भावाचे सरंक्षण द्यावे, कृषी उत्पन्‍न बाजार समित्यामध्ये उपविधी २८(अ) अमंलबजावणी होत नसुन त्याकरीता तात्काळ आदेश द्यावे आदी मागण्या केल्या आहेत.

यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारीणी सदस्य मधुभाऊ हरणे, सतीश दाणी, सचिन डाफे, खुशालराव हिवरकर, अरविंद राऊत, धोंडबाजी गांवडे आदी उपस्थित होते.

अहमदनगर : प्रतिनिधी
महाराष्‍ट्र राज्‍य निवडणूक आयोगाने अहमदनगर जिल्‍हयातील माहे  मार्च 2018 ते मे 2018 या कालावधीत  मुदत संपणा-या  व नव्‍याने  स्‍थापित ग्रामपंचायतींच्‍या  सार्वत्रिक निवडणूका सरपंच पदासह सर्व सदस्‍य  पदासाठी  तसेच रिक्‍त पदांच्‍या पोट निवडणूकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. तहसील कार्यालयांनी सदर कालावधीत मुदती संपणा-या  ग्रामपंचायतीबाबत खात्री करावी व निवडणूक आयोगाच्‍या कार्यक्रमांप्रमाणे संबंधित ग्रामपंचायतीचे प्रभाग रचना व आरक्षणाबाबतची कार्यवाही पूर्ण करुन अनुपालन अहवाल पाठवावा असे जिल्‍हाधिकारी यांनी एका प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविले आहे.
            अहमदनगर जिल्‍हयातील ग्रामपंचायतीचा निवडणूकीचा कार्यक्रम-  1) तहसीलदार यांनी निवडणूकीची नोटीस प्रसिध्‍द करण्‍याचा दिनांक गुरुवार 25 जानेवारी 2018, 2) नामनिर्देशनपत्रे मागविण्‍याचा व सादर करण्‍याचा दिनांक व वेळ  ( नमुना अ अ मध्‍ये  नमूद केलेल्‍या ठिकाणी ) सोमवार 5  ते  शनिवार 10 फेब्रवारी 2018 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत.  3)  नामनिर्देशनपत्र  छाननी करण्‍याचा दिनांक व वेळ ( नमुना अ अ मध्‍ये  नमूद केलेल्‍या ठिकाणी)  सोमवार 12 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 11 वाजेपासून छाननी संपेपर्यंत.  4)  नामनिर्देशनपत्रे मागे घेण्‍याचा अंतिम दिनांक व वेळ ( नमुना अ अ मध्‍ये  नमूद केलेल्‍या ठिकाणी)  गुरुवार  15 फेब्रुवारी 2018 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत.  5) निवडणूक चिन्‍ह नेमून देण्‍याचा तसेच अंतिमरित्‍या निवडणूक लढविणा-या  उमदेवारांची यादी प्रसिध्‍द करण्‍याचा दिनांक व वेळ गुरुवार 15 फेब्रुवारी 2018 रोजी दुपारी 3 वाजेनंतर. 6)  आवश्‍यक असल्‍यास मतदानाचा दिनांक रविवार 25 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 7.30 वा. ते सायं. 5.30 वाजेपर्यंत. 7) मतमोजणीचा दिनांक ( मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्‍हाधिका-यांच्‍या मान्‍यतेने तहसीलदार निश्चित करतील त्‍यानुसार राहील)  सोमवार 26 फेब्रुवारी 2018 रोजी. 8)  निवडणूक निकाल प्रसिध्‍द करण्‍याचा अंतिम दिनांक ( ज्‍या ग्रामपंचायतीची  मुदत 1 मार्च 2018 रोजी संपत आहे. अशा ग्रामपंचायतीच्‍या निवडणूका निकालाची अंतिम प्रसिध्‍दी सोमवार 26 फेब्रुवारी 2018 रोजीच जिल्‍हाधिकारी कार्यालयामार्फत करण्‍याची दक्षता घ्‍यावी  ) मंगळवार   27 फेब्रुवारी 2018  असा कार्यक्रम  आहे.

अहमदनगर : प्रतिनिधी
कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना, शाश्वत सिंचनासाठी प्रयत्न, मागेल त्याला शेततळे, बी-बियाणे खतांचा पुरेसा पुरवठा, तंत्रज्ञानाचा वापर, गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न राज्य शासन करीत असल्याची माहिती पालकमंत्री राम शिंदे यांनी दिली.


राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, गळीत धान्य विकास कार्यक्रम, राष्ट्रीय कृषी विकास योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि जमीन आरोग्य पत्रिका अशा कृषी विस्तार योजनांच्या अंमलबजावणीत आपला जिल्हा आघाडीवर असल्याचे सांगून         मागेल त्याला शेततळे ही योजनाही जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे प्रा. शिंदे यांनी सांगितले. जिल्ह्यात 6 हजार 667 शेततळी पूर्ण  करण्यात आली आहेत. या माध्यमातून मत्स्यबीजे शेतकऱ्यांना देऊन मत्स्यव्यवसायास चालना देण्याचे प्रयत्न जिल्हा प्रशासनातर्फे सुरु आहेत. कृषी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षाच्या कालावधीत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवरटिलर, पेरणीयंत्र, मळणीयंत्र, कल्टीवेटर, रोटावेटर अशी यंत्र आणि अवजारे अनुदानावर मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आल्याचे ते म्हणाले.
            महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत मजुरांना वेळेत मिळणाऱ्या मजूरीचे प्रमाण आता जवळपास 75 टक्क्यांवर आले असून मजूरी शंभर टक्के वेळेत होईल या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. शेतकरी अपघात विमा योजना आणि गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील 69 अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसदारांना आपण 1 कोटी 35 लाख रुपयांचा लाभ मिळवून दिला असल्याचे ते म्हणाले.

अहमदनगर : प्रतिनिधी
 राष्ट्रीय पल्स पोलीओ मोहिमेअंतर्गत रविवार, दि. 28 जानेवारी रोजी जिल्ह्यात पल्स पोलीओकरण मोहीमेचा पहिला टप्पा राबविला जाणार आहे. यांत जिल्ह्यातील 3 लाख 90 हजदार बालकांना पोलीओ लस दिली जाणार आहे. प्रत्येक वाड्या वस्त्यांवर जाऊन लसीकरण मोहीम यशस्वी करावी आणि शून्य ते पाच वर्षे वयोगटातील एकही बालक वंचित राहणार नाही, यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी दिल्या आहेत.
            राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहीम दिनांक 28 जानेवारी आणि 11 मार्च, 2018 अशा दोन टप्प्यांत राबविली जाणार असून त्यातील पहिला टप्पा उद्या होत आहे. यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने पुरेशी तयारी केली असून ग्रामीण भागातील शून्य ते पाच वयोगटातील 3 लाख 36 हजार 942, शहरी भागात 53 हजार 78 अशा एकूण 3 लाख 90 हजार बालकांना ही पोलीओची मात्रा दिली जाणार आहे.  त्यासाठी ग्रामीण भागात 2 हजार 634 बूथ आणि शहरी भागात 180 बुथवर 7 हजार 283 आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत ही लस बालकांना दिली जाणार आहे.  ग्रामीण भागात 30 जानेवारीपासून सलग 3 दिवस आणि शहरी भागात सलग पाच दिवस घरोघरी जाऊन राहिलेल्या बालकांना पोलीओचा डोस दिला जाणार आहे. याशिवाय, पोलीओ लसीकरणापासून एकही बालक वंचित राहू नये म्हणून जिल्ह्यात 72 ट्रान्सिट कॅम्पद्वारे बसस्थानक, रेल्वेस्थानक, धार्मिक स्थळे आदी ठिकाणी तसेच 112 मोबाईल टीमद्वारे ऊसतोड कामगार, भटके लोक, रस्त्यावरील मजुरी करणाऱ्या नागरिकांची मुले यांना पोलीओ लस दिली जाणार आहे.
            पोलीओ लसीकरण मोहिमेसाठी नागरी व ग्रामीण भागातील सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, नगरपालिका दवाखाने येथील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जिल्हास्तरावर एक दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे तर ग्रामीण भागात काम कऱणाऱ्या आरोग्य सेवक-सेविका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि या मोहिमेत सहभागी असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही घेण्यात आले आहे.


अहमदनगर : प्रतिनीधी
आपल गाव विकसीत झाले पाहीजे अशी सर्वांची मनोमन इच्छा असते त्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परिने हातभार लावत असतो. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तर प्रयत्न होतच असतात त्या प्रयत्नांना जर योग्य मार्गदर्शन मिळाले तर विकासाची गती नक्कीच वाढू शकते.सत्तेवर नसणारे, सत्तेवर असणारे आणि गाव विकासाचे स्वप्न पहाणारे प्रत्येक जण गावाचा विकासात विकासकाची भूमिका कशी निभावू शकतो, यासाठी  आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार,औरंगाबाद मधील आदर्श गाव पाटोदा चे सरपंच भास्करराव पेरे, नागपूर मधील आदर्श गाव शितलवाडी च्या सरपंच योगिता गायकवाड, हे तर पाणी संवर्धना संदर्भात बाळासाहेब शिंदे मार्गदर्शन करणार आहेत.

नगर तालूका पत्रकार संघ आणि कृषी उत्पन्न् बाजार समिती यांनी गाव कारभारी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि २८ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता होणाऱ्या या परिषदेच्या अध्यक्षस्थानी आदर्श गाव योजनेचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार असणार आहेत. तसेच यावेळी आ. शिवाजीराच कर्डीले, आ.अरूणकाका जगताप, जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, उपमुख्यकार्यकारी अधिकारी अशोक कोल्हे, प्रशांत शिर्के, पंचायत समिती गटविकास अधिकारी सय्यद अलमास आदी उपस्थित असणार आहेत.

संपुर्ण देशात हिवरे बाजारचा आदर्श निर्माण करताना पोपटराव पवारांनी घेतलेले कष्ट। ,त्यांचे अनुभव ते सांगणार आहेत. औंरंगाबाद जिल्ह्यात ३३५० लोकसंख्येच्या आणि ६०२ कुटूंब संख्या असणारे पाटोदा हे गाव आहे. या गावात लोकांना गरम पाणी, दळण आणि शुद्ध आरओ चे पाणी मोफत दिले जाते. गावात २४ तास पाणी आहे.गावातील प्रत्येकाचा वाढदिवस साजरा केला जातो.हे सरपंच भास्करराव पेरे यांनी कसे करून दाखविले याबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत. शितलवाडी-परसोडा ता.रामटेक जि.नागपूर येथील योगिता गायकवाड या उच्चशिक्षीत तरूणी राजकीय पार्श्वभूमी नसताना सरपंच झाली. पाण्याचे दुर्भिक्ष पाहून १४ गावांसाठीची बंद पडलेली प्रादेशिक पाणी पुरवठा योजना २०१४ साली चालवण्यास घेतली.रात्रीचा दिवस करत रणरागिणी प्रमाणे काम करत आजही ती योजना नफ्यात सुरू आहे. गावातील नळांना फेडरल बसवून सर्वत्र सारख्याच दाबाने पाणी पुरवठा त्यांनी सुरू केला आहे. लेक वाचवा अभियान, स्त्री भ्रुण हत्या विरोध यासाठी पथनाटयातून जनतेला मार्गदर्शन केले. त्यांच्या कामाची दखल भारत सरकारच्या निती आयोगाने घेत त्यांना आयोगाच्या  बैठकीसाठी महिला कर्तबबार सरपंच सदस्य म्हणून दिल्लीलाही बोलविण्यात आले होते.त्या आपले अनुभव कथन करणार आहेत. कायम दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या नगर तालूक्याला पाणीदार करण्यासाठी कसे प्रयत्न करता येतील कशा उपाययोजना करता येतील. शासकीय मदतीविना लोकसहभागातून हे कसे शक्य आहे हे पाणी फौंडेशनचे जिल्हा समन्वयक बाळासाहेब शिंदे सांगणार आहेत.


उपस्थितांसाठी लकी ड्रॉ
गाव कारभारी परिषदेसाठी उपस्थीत असणाऱ्यांसाठी लकी ड्रॉ आयोजन करण्यात आले आहे. शारदा एजन्सी आणि श्री ट्रेडर्स यांच्या कडून अॅक्सेस गाडी, शेतकरी सेवा केंद्राकडून स्प्रींकलर सेट,राम एजन्सी मार्फत ३९ इंच एलसीडी टिव्ही,, कोमल अॅग्रो तर्फे विदयूत मोटार आणि ओमसाई एजन्सी कडून पिठाणी गिरणी देण्यात येणार आहे.

गावाची प्रगती करण्यासाठी विकासवादी नेत्यासह गावकरीही विचारी आणि सुज्ञ असावे लागतात. या दोन्हींचा मेळ घालूनच खराखुरा ग्रामविकास शक्य आहे. अशाच पद्धतीने झरी (जि. परभणी) या गावानेही 'जलयुक्त' होऊन सर्व समस्यांवर मात करण्यासाठी कंबर कसली आहे. गावाचे मार्गदर्शक आणि राज्य कृषी विभागातर्फे दिला जाणारा कृषिभूषण पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते श्री. कांतराव देशमुख (गावाचे लाडके काका) यांच्या नेतृत्वाखाली या गावाचा कायापालट झाला आहे. ज्येष्ठ कृषी पत्रकार आणि शेती विषयाचे अभ्यासक श्री. आनंद ढोणे पाटील यांनी गावाच्या विकासाचा घेतलेला आढावा...

कोणत्याही गावचा आणि परिसराचा सर्वांगीण विकास घडवून आणायचा असेल तर त्या कामी गावचा पुढारी चांगला असावा लागतो. त्याच बरोबर ग्रामस्थ नागरीकांनी देखील एकीचे बळ ठेवून विकास कामात सक्रिय सहभाग घेणे महत्वाचे असते. मात्र, अनेक गावात असी सत्य परिस्थीती असते की, गावचा सरपंच विकास कामे करू लागल्यावर त्यास राजकीय द्वेषापोटी म्हणा की तो पुढे जाईल या विरोधापायी म्हणा ग्रामसुधार योजना राबविणा-यांना साथ न देता त्यांची तंगडी धरुन मागे ओढण्याची वृत्ती मराठवाड्यातील अनेक गावातील नागरीकांच्या मनात पक्की घर करून बसलीय. यामुळे तशा गावांचा विकास न होता ती गावे भकासच होत आहेत. परंतु, अशा विषयाला अपवाद ठरलयं ते परभणी जिल्ह्यातील झरी  गाव. जलयुक्त शिवार अन् नाम फाउंडेशन च्या वतिने गाव व परिसरात जनहिताची चांगली विकास कामे घडवून आणल्याने कांतराव काकांच्या प्रयत्नाने गावाचा कायापालट होत आहे.


झरी हे परभणीहून जिंतूर शहराकडे जाणा-या मुख्य रस्त्यावरच १८ किलोमीटरवर उत्तर दिशेला लागणारं सुमारे १८ हजार लोकसंख्या अन् ३००० घरं असलेलं गाव आहे. या गावात सर्व जाती धर्माचे नागरीक लोकं गुण्यागोविंदाने वास्तव्य करून राहतात. गावाचे कृषिभूषण तथा सामाजिक कार्यकर्ते श्री. कांतराव माणिकराव देशमुख उर्फ काका हे ६० वर्ष वयाचे  कुटूंबाची एकूण एकत्रीत मिळून ११० एकर जमीन असलेले प्रगतशील आणि प्रयोगशीलता जोपासणारे मोठे शेतकरी तर आहेत. तसेच ते गावचे १९७८ ते २००२ पर्यंत असे अनेक वर्ष सरपंच, पंचायत समिती सदस्य, परभणी जिल्हा परिषदेचे दोन वेळा शिक्षण व बांधकाम समितीचे सभापती, कृषि उत्पन्न बाजार कमिटीचे संचालक अशी विविध पदांवर त्यांनी यशस्वीपणे ठसा उमटविला आहे. या सर्व पदांवर काम करतानाच विविध सरकारी, निमसरकारी आणि लोकसहभाग यांच्या माध्यमातून गावाबरोबरच परिसराचा विकास घडवून आणणारे काका म्हणुन ते अवघ्या मराठवाड्यात परिचित आहेत. त्यांनी या गावात दहावीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा, पशूसंवर्धन दवाखाना ,पोस्ट कार्यालय, मानवासाठी शासकीय दवाखाना, जिल्हा बँक तसेच राष्ट्रीयकृत बँक अशा पद्धतीच्या सार्वजनिक सुविधा केंद्रे उभारली आहेत. तसेच गावातील रस्ते, पथदिवे, पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येक घरी नळ जोडणी, सांस्कृतिक सभागृह, सुसज्जं स्मशानभुमीसह नाम नदीवर बांधण्यात आलेले बंधारे आणि त्यात आडवलेलं करोडो लिटर्स पाणी जमिनीत मुरल्यामुळे शेतशिवारात पाण्याची मुबलक उपलब्धता  झाल्याने  मराठवाडा विभागात झरी गाव पाणीदार गाव म्हणून नावारूपाला येत आहे.

सरपंच पदाचा केला उपयोग
१९७८ ते २००२ साला पर्यंत म्हणजे तब्बल २४ वर्ष ते झरी गावचे सरपंच असताना त्यांनी विविध ग्राम सुधार योजना आणून गावातील सर्व कच्चे रस्ते सिमेंट क्रांकेटने बांधकाम करून पक्के करवून घेतले आहेत. शिवाय प्रत्येक आवश्यकठिकाणच्या खांबावर विद्यूत पथदिवे, वाढीव विद्यार्थी संख्येच्या हिशोबाने शाळेला वाढीव वर्ग खोल्या बांधकाम,सांडपाणी गावाबाहेर वाहून जाण्यासाठी नाल्यांचे बांधकाम, पिण्याच्या पाण्यासाठी गावाशेजारी मोठी विहिर खोदून त्याविहिरीवरून गावात पाणी पुरवठ्याकरीता पाईपलाईन करून प्रत्येक घरी नळ जोडणी तसेच ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या बसवून तेथून नळ जोडणी आणि काही विंधन विहीरीही खोदून घेवून गावात कायम पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येवून अशी विविध जनसुविधेची कामे करीत सरपंच पदाचा त्यांनी सदूपयोग करून घेतला. या व्यतिरीक्त ते १९९१ ते १९९५ या कालावधीत पंचायत समिती व परभणी जिल्हा परिषदेचे दोन ट्रम बांधकाम व शिक्षण सभापती असताना त्यांनी गावात जनतेच्या व शेतक-यांच्या सोयीसाठी जिल्हा मध्यवर्ती व राष्ट्रीय बँकेच्या वरिष्ठ स्तरावर सातत्याने प्रयत्न करून त्या बँकेच्या शाखा आणून स्थापन करून शेतक-यांना शेतीविकासासाठी पिक कर्ज उपलब्ध करून दिले. बचत व गुंतवणूकीचीही बँकामुळे गावातच नागरिक व शेतक-यांनी सोय झाली.तसेच पशुधन दवाखाना, पोस्ट कार्यालय, मानवाच्या गरजेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र ही नव्याने मंजूर करून आणून चालू केले. राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बांधून गावात शिवस्मारक उभारले आहे. गावाजवळच दूधना नदी किना-यावर स्वताची १ एकर जमिन दाण देवून तेथे "मातोश्री इंदिराबाई देशमुख वैकुंठधाम झरी"या नावाने अद्यावत अशी एक स्मशान भूमी बांधण्यात आली आहे. शेतक-यांचा कापूस गावातच विकला जावा यासाठी जिनींग व प्रेसिंग कारखान्याची गावातच उभारणी करून तो चालू केल्याने या कापुस संकलन केंद्राच्या जिनींगवर गाव व परिसरातील शेतक-यांच्या कापसाला चांगला भाव मिळत आहे. या सहच त्यांनी गावात व बाहेर गावी जावूनही शेतक-यांचे शेतकरी मेळावे घेवून जास्त पाणी लागणारे पिके न घेता कमी पाणी लागणारे पिके ही थिबकवरच घ्यावीत,तसेच उत्पादन वाढीसाठीचे आधुनिक नव तंत्र वापरून शेती करावी, कमी खर्चात अधिक उत्पादन देणा-या फळबागा लागवड कराव्यात, सेंद्रीय शेती,पाणी आडवा पाणी जिरवा असे मार्गदर्शन देखील शेतक-यांना ते नेहमीच करीत असतात.अशा स्वरूपाचे बरीच जनहितार्थ कामे काकांनी केली आहेत.


जलयुक्त शिवार अभियान जोरात
महाराष्ट्र सरकारने २०१५-१६ या चालू आर्थिक वर्षापासून राज्यात कोरड्या दुष्काळावर मात करण्यासाठी व टँकर मुक्त गावे करण्यासाठी जलयुक्त शिवार हे जलसंधारणाची कामे करण्याचे महत्वपूर्ण अभियान राज्यात चालू करून तेराबविण्याचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेतले. या अभियानात कायम दुष्काळ  असणा-या गावांची प्रथम निवड करून त्या त्या गावाशेजारच्या नद्यांचे खोलीकरण,रुंदीकरण आणि सरळीकरणाची कामे लोकसहभाग व शासन हिस्सा खर्चातुन करून त्यावर बंधारे बांधून त्यात पावसाच्या पुराचे पाणी आडवल्या गेल्याने जलयुक्त शिवार योजनेतून जलसंधारणाची कामे झालेल्या गाव व परिसरातील जमिनीत पाणी मुरल्या जावून भूगर्भातील पाणी पातळी वाढल्यामुळे काही अंशी कोरड्या दुष्काळावर मात होवून या अभियानात झालेल्या नदी विकास कामाचा चांगला परिणाम दिसून येत आहे.

नाम फाउंडेशनचे लाभले महत्वाचे योगदान
प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते व हिंदी चित्रपटातील अभिनेता नाना पाटेकर या दोघांनी एकत्र येवून १५ सप्टेंबर २०१५ साली स्थापन केलेल्या नाम फाउंडेशनने   मराठवाडा, विदर्भ विभागासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील दुष्काळ व आत्महत्या ग्रस्त शेतक-यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या वारसांना प्रत्येकी पंधरा हजार रुपयाची आर्थिक मदत, अनेक ठिकाणी जलसंधारणाची कामे केली आहेत.झरी गावक-यांनाही नामचे मोठे योगदान लाभले आहे. नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपूरे, नाना पाटेकर हे शेतक-याप्रती जनहिताची कामे करणारा एखादा समाज कार्यकर्ता मिळण्याचे शोधकाम करीत असतानाच त्या कामी साजेसा अशा कांतराव देशमुखांचे नाव कळाले. यावरून त्यांनी काकांशी संपर्क करून चर्चा केली होती .नामचे संस्थापक मकरंद अनासपूरे हे झरी येथे येवून पूर्वी कांतराव यांनी केलेले ग्राम विकास कामे पाहून खुश होवून त्यांनी नामच्या वतीने गावच्या जलसंधारणाच्या कामात सहभाग देण्याचे ठरवून त्या पध्दतीने मोलाचे सहकार्य करून नद्यांच्या खोलीकरण, सरळीकरण, बंधारे बांधण्याकामी आर्थिक सहकार्य केले आहे.

नाम नदीच्या जलसंधारण कामासाठी नाम फाउंडेशन चा मोठा आर्थिक सहभाग नाम फाउंडेशनने गावासाठी जलसंधारणाची कामे करण्यासाठी झरी गाव दत्तकच घेतल्याने नामने नागरीकांना पिण्याचे शुध्द पाणी मिळावे या साठी प्रति तास २ हजार लिटर पाणी शुद्ध करण्याचा आर ओ प्लांट बसविला आहे. त्यातून प्रत्येक कुटूंबाला दररोज २० लिटर शुद्ध पाण्याचे पुरवठा केला जातो. तसेच गावातील काही निवडक ५० शेतक-यांना नाम फाउंडेशन च्या वतिने एक एकरसाठी ५० थिबक संच मोफत दिले आहेत. याशिवाय गावातील ३५० होतकरू महिलांना स्वताच्या पायावर उभे राहून स्वावलंबी होवून स्वंयरोजगार करण्याच्या हेतूने त्यांना कपडे शिलाई कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थी महिलांना ५० शिलाई मशीन भेट देण्यात आल्यामुळे त्या महिलांनी आता शिवणकाम व्यवसाय उभारल्याने आर्थिक स्तराने स्वावलंबी झाल्या आहेत.
तसेच नामने गावातील दहावी अकरावी वर्गात शिकणा-या मुली, विधवा, परितक्त्या महिला यांना शिलाई कामाचे प्रशिक्षण देवून त्यांना स्वंयरोजगार निर्माण करण्याकरीता ५० कपडे शिवण्याच्या शिलाई मशीन भेट दिल्याने त्या आता आपल्या कपडे शिवण्याच्या रोजगारामुळे स्वावलंबी झाल्या आहेत.यासह नाम फाउंडेशनने बाहेरगावाहून झरी येथे शाळेत पायी ये-जा करणा-या पिंपळा, मिर्झापुर, जलालपूर गावच्या विद्यार्थिनींना १०० सायकली मोफत देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बाहेरगावच्या मुलींना पायपीट करीत शाळेत येण्या जाण्यासाठी होणार त्रास कमी झाल्याने त्यांची शाळेतील अनुपस्थिती कमी झाली आहे.

जमा खर्च हिशोबाच्या बाबतीत झरी ग्रामपंचायत भारतीत पहिलीच
या गावचे शिल्पकार कांतराव काका देशमुख यांनी आपल्या गावाची ग्रामपंचायतची ईमारत ही या पुर्विच सुटेबल असी दोन मजली बांधली तर आहेच. गावात एक मोठे सार्वजनिक उत्सव कार्यक्रमाच्या सोयीसाठी सभागृह ही बांधले आहे. विविधांगी विकास तर आहेच. मात्र,त्यांचे एक वैशिष्ट्य असे आहे की,ग्रामपंचायतीला येणारा रुपया अन् जाणारा रुपया म्हणजे जो काही जमा खर्चाचा हिशोब असतो तो ते न चुकता दररोज ग्रामपंचायतच्या फलकावर लिहून ठेवीत असतात. जेणे करून गावातील नागरिकांना उघड असा हिशोब देणारी झरी ही भारतातील पहिलीच ग्रामपंचायत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 
संपर्क:- श्री. कांतराव काका देशमुख झरीकर, 
          
मु. पो. झरी. ता./जि. परभणी, मो. ९४२३७७६६००

लेखक : श्री. आनंद ढोणे पाटील (मो. ९१४५११४४४६)वर्धा : प्रतिनिधी
तरूणांचा वाढता ओघ शेतकरी संघटनेकडे असल्याने यापुढील काळात ग्रामीण प्रश्न पुन्हा एकदा संघटना हिरीरीने सोडवू शकेल. स्व. शरद जोशी यांच्या विचारांनी शेतकरी बांधवांना आर्थिक उन्नती दाखविण्याचाच हा प्रयत्न आहे, असे मत माजी आमदार सरोजताई काशीकर यांनी व्यक्त केले.

जिल्ह्यातील टाकळी (दरणे) येथे झालेल्या सभेत त्या बोलत होत्या. सभेला तरुणांची प्रचंड प्रतिसाद मिळाला. या सभेला संबोधित करताना माजी आमदार सरोजताई काशीकर म्हणाल्या की, शेतकर्यांवर असलेली सर्वच कर्जे ही अनैतिक असुन ही कर्जे शेतकरी देणे लागत नाही. सरकारने जाहिर केलेली कर्जमाफी ही फसवी असुन शेतकर्यांना कर्जमाफी नको तर संपूर्ण शेती व शेतकरी कर्ज मुक्त हवा आहे. शेतकर्यांना संपूर्ण स्वातंत्र्य हवे आहे. या सभेला सतीश दाणी, दत्ताजी राऊत, सचिन डाफे, शैलाताई देशपांडे, ज्योति निकम (जिल्हा परिषद सदस्य) यांच्यासह गावातील शेतकरी तरूण मोठया संख्येने उपस्थित होते.


अहमदनगर : प्रतिनिधी
शेतकरी व कष्टकरी बांधवांचे मुखपत्र 'कृषीरंग' या साप्ताहिकाचा पहिला अंक सोमवारी (दि. २२ जानेवारी) प्रसिद्ध होत असून, नगरसह पुणे, सोलापूर, बीड व औरंगाबाद जिल्ह्यातील प्रमुख गावांत अंक उपलब्ध असल्याची माहिती व्यवस्थापकीय संपादक सौ. माधुरी चोभे यांनी दिली.

सुरुवातीच्या टप्प्यात चार पानांसह सुरू केलेला हा अंक १६ पानी रंगीत स्वरुपात गुढी पाडव्यापर्यंत प्रसिद्ध केला जाईल. हा अंक मिळण्यासाठी व वार्षिक वर्गणी भरून नियमित अंक सुरू करून घेण्यासाठी 9422462003 या मोबाईल नंबरवर किंवा krushirang@gmail.com संपर्क साधावा. तसेच बातम्या किंवा लेखही यावरच पाठविण्याचे आवाहन सौ. चोभे यांनी केले आहे.

मुंबई येथील विकास कामाचे भूमिपुजन करताना व्यासपीठावरच टिकाव मारतानाच्या या फोटोला सोशल मीडियावर 'लोकप्रियता' मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे या फोटोमध्ये चक्क व्यासपीठावरच टिकाव मारत आहेत. याबद्दल आश्चर्य व्यक्त करतानाच हा नेमका कोणत्या शेतीचा प्रकार आहे, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अहमदनगर : प्रतिनिधी
देशात 'अच्छे दिन' आल्याची जाहिरातबाजी जोरात सुरू असतानाच तीन वर्षांत काहीच बदलले नसल्याचे वास्तव कायम आहे. याचीच झलक जिल्ह्यातील नेवासा या भाजपाच्या ताब्यातील मतदारसंघातही दिसते. नेवासा तालुक्यातील घोडेगाव-कुकाणा रोडवरील हाच फोटो सोशल मीडियामध्ये सध्या तुफान लोकप्रिय ठरला आहे. एकुणच भाजपाच्या सत्ताकाळातही विद्यार्थ्यांना 'आधार' धोकादायक प्रवासी वाहतुकीचाच असल्याचे चित्र यामुळे पुन्हा एकदा जगजाहीर झाले आहे.

एसटी बसअभावी शाळेसाठी ओढताण करण्यासाठी विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने लटकून जावे लागत आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री, पंतप्रधान व केंद्र आणि राज्य सरकारच्या जाहिरातबाजीवर हजारो कोटी रुपये खर्च केला जात आहे. यातलाच काही खर्च कमी करून तो विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यासह स्कुलबस खरेदीसाठी देण्याची 'बोलकी' प्रतिक्रिया सोशल मीडियावर यामुळे केली जात आहे.

अहमदनगर : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा घोळ मिटता मिटत नसल्याचेच चित्र आहे. आधार देऊनही या योजनेचा लाभ मिळण्यापासून जिल्ह्यातील सुमारे लाखभर शेतकरी कुटुंब या योजनेपासून वंचित राहिले आहेत.

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन सिताराम पाटील वायकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, या एकाच बँकेच्या ९० हजार ५५८ शेतक-यांची माहिती जुळलेली नाही. अशा शेतक-यांची यादी बँकेच्या शाखांमध्ये तयार केलेली असून या शेतक-यांनी संबंधित शाखेत संपर्क करावा. फक्त जिल्हा बँकेनेच हा आकडा जाहीर केला आहे. तर, इतर बँकांची झाकली मूठ सव्वालाखाचीच आहे. त्यामुळेच योजनेचा लाभ न मिळालेल्यांची संख्या मोठी असल्याची भिती व्यक्त होत आहे.


उस्मानाबाद : प्रतिनिधी
हल्लाबोल यात्रेसाठी सध्या अजित दादा पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसची 'टीम' मराठवाडा दौ-यावर आहे. याच यात्रेमध्ये आज लोहा येथे झालेल्या सभेत कार्यकर्त्यांनी दादांसह त्यांच्या 'टीम'ला ताकद देण्यासाठी खारिक-खोब-यांव्दारे सत्कार केला. 'सत्कारा'चा हा अफलातून प्रकार सध्या सर्वत्र चर्चेत आहे.

नेत्यांची मर्जी राखण्यासाठी कोणता कार्यकर्ता काय शक्कल लढविल याचा नेम नाही. असाच प्रयत्न करून लोहा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. पुन्हा सत्तेत येण्यासह मुख्यमंत्रीपदावर दादांना काम करण्याची संधी मिळण्यासाठीच कार्यकर्त्यांनी ही 'ताकद' दिल्याची चर्चा आहे.

मुंबई : प्रतिनिधी
वाणिज्य मंत्रालयाने कांद्याच्या निर्यात मुल्यात १५० डॉलरची घसघशीत घट केल्याने आगामी तीन महिन्यांत कांद्याचे भाव २५-३० रुपये स्थिर राहण्याचा अंदाज आहे.

दि. १९ जानेवारीच्या पत्रानुसार कांद्याचे किमान निर्यात मुल्य ८५० वरुन ७०० डॉलर करण्यात आले आहे. याचा थेट फायदा शेतकरी बांधवांना होईल. मात्र, याचाच गैरफायदा घेऊन व्यापारी मंडळींनी बाजारभाव पाडण्याचीही तयारी ठेवलेली असल्याचे समजते. एकुणच सरकारी कृपेने पुन्हा एकदा दलाल व व्यापा-यांचीच चांदी होऊ नये यासाठी शेतकरी बांधवांनाही सजग रहावे लागणार आहे.

घरोघरी निर्जलीकरण प्रकल्प उभारण्यासाठीची शेतकरी हिताती चळवळ महाराष्ट्रात रुजविणारा कार्यसम्राट म्हणजेच स्व. एम. बी. शिंदे. कारण अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील Aroow Agro Industries चे मालक हीच त्यांची ओळख राहिली नव्हती. तरुणांमधून कृषी उद्योजक घडविण्याचाच वसा शिंदे सरांनी घेतला होता. शुक्रवारी (दि. १९ जानेवारी २०१८) कंपनीत काम करतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. महाराष्ट्रात हजारो तरुण-तरुणींना उद्योजक बनविणा-या या कार्यसम्राटाचे असे अवेळी व लवकर जाणे अनेकांना चटका लावून जाणारेच आहे...

'देवाला चांगली माणसं आवडतात, अन् तो अशा दिलदार व मदतीसाठी तत्पर असणा-यांना लवकर बोलवून घेतो', असं ऐकत-बोलतच भारतीय माणूस ज्येष्ठ होतो. यात कितपत तथ्य आहे माहित नाही. पण काल रात्री याचीच प्रचिती आली. कारण हजारो छोटे-मोठे उद्योजक घडविणारे आमचे एम. बी. शिंदे सर आम्हाला पोरके करून गेले होते. एमसीईडी, मिटकॉन असो की राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठामधील फुड प्रोसेसिंग कार्यशाळा सगळीकडे प्रमुख मार्गदर्शक शिंदे सर असत.

'मार्केटिंग म्हणजे साधा प्रकार आहे. त्याचं जादा बर्डन घेऊ नका. कारण मार्केटिंग म्हणजे फक्त बोभाटा करणं' असं सोप्या भाषेत समजावून सांगणारे शिंदे सर आपल्यातून गेल्याचं अजुनही मन मान्य करीत नाही. फळे व भाजीपाला डिहाड्रेशन हाच त्यांचा खरा विषय. या प्रक्रियेचे बारिकसारिक तपशील ते पहिल्याच भेटीत कोणालाही समजावून सांगत. त्यांचं कौंटुंबिक जीवन काही मलाही माहित नाही. कारण पायाला भिंगरी लावल्यागत शिंदे सर सतत राज्यभर पायपीट करीत होते. एसटीच्या लालपरीतून ते कुठेही जाऊन तरुणांना डिहायड्रेशनचे बारकावे समजावून सांगत. कुठलाही बडेजाव न मिरवता व आर्थिक अभिलाषा न ठेवता हा माणूस काम करायचा.

मी अनेकदा म्हटलोय की, 'सर, किती दिवस फक्त समाजसेवा करणार? मार्केटिंग आम्हाला सोप्या भाषेत समजावून सांगता अन् स्वत: मात्र प्रसिद्धीपासून लांब राहता...' ते मला म्हणत, 'सचिन, तुझं म्हणणं चूक नाही. पण मी समाजसेवक नाही. कारण लोकांना मदत करण्यात माझंही हित आहे. कारण मला यातून आनंद व समाधान लाभतं...' (आताही याची आठवण होऊन डोळे पाणावलेत) नगरमधील झोपडी कँटिनमध्ये एकामध्ये दोन कटिंग चहा पिऊन आम्ही शेतकरी बांधवांच्या आर्थिक उन्नतीसाठी राबविण्याच्या प्रकल्पांवर काथ्याकूट करायचो.

समाजसेवेचा बुरखा ओढून घेत पोटार्थीपणे काम करणारे जाती-धर्माचे नेते व पुढारी यांच्यापेक्षा आमचे शिंदे सर महान होते. कारण ते तरुणांना जात व धर्म पाहून कधीच मदत करीत नव्हते. हजारो बचत गटांनाही त्यांनी आर्थिक उन्नतीचा मार्ग दाखविला. महिला सक्षमीकरणातही त्यांचे कार्य मोठे आहे. कधीही त्याचा बडेजाव सरांनी मिरवला नाही. मोठे काम करूनही जमिनीवर असलेला हा कार्यसम्राट होता.

सचिन चोभे, सुधीर चोभे, विशाल कुटे, सुरेंद्र शिंदे.... अशी यादी हजारोंची होईल. या सर्वांना जोडणारा दुवा म्हणजेच शिंदे सर. त्यांची कामाची उमेद व निस्वार्थी वृत्ती मला खूप काही शिकवून गेली. काल रात्री सुरेंद्र सरांचा मेसेज आला की, सर आम्हाला पोरके करून गेलेत. त्यांचा फोटो शोधण्यासाठी तासभर इंटरनेट चाळलं. पण फोटो काही मिळालाच नाही. आज सकाळी सुरेंद्र सरांनी पाठविला अन् हे श्रद्धांजलीपर लिखाण करायला बसलो. एका कार्यशाळेत मार्गदर्शन करतानाच हा फोटो आहे. हेच शिंदे सरांचं आवडतं काम होतं.

कृषीउद्योगदूत एम. बी. शिंदे यांचेच काम आता माझ्यासारख्यांना पुढे न्यायचं आहे. तीच असेल त्यांना खरीखुरी श्रद्धांजली...

- श्री. सचिन मोहन चोभे

कोणाचे भाग्य कधी अन् कोणामुळे उजळेल याचा काहीच भरवसा नाही. कारण खड्डे मग ते रस्त्यातले असो की भितीमुळे पोटात पडलेला 'खड्डा' असो, सगळ्यांकडेच आपले दुर्लक्ष असते. खड्डेयुक्त रस्त्यांचीच भारतियांना सवयही झालेली आहे. त्यामुळेच असुनही कोणाच्याही ध्यानात येत नसलेला हा खड्डा तसा अभागीच. फक्त गाडीला गचका बसला तरच यावर आपले लक्ष जाते. मात्र, दोनेक महिन्यांपासून याच अभागी खड्ड्यांचे भाग्य उजळले आहे. याला निमित्त ठरले आहेत आपले सा.बां.मंत्री चंदुभौ पाटील साहेब. खड्ड्यालाही सेल्फीचे ग्लैमर आणणा-या याच मंत्र्यांसह विरोधकांनाही त्रिवार मुजरा... माझा नाही खड्ड्यांचाच...!!!

ही घटना दूर कुठेतरी मराठवाडा नावाच्या राज्यात घडली आहे. हल्लाबोल करायला गावोगाव फिरणा-या धनुभाऊ व अजितदादा यांच्याबाबतीत ही घडली अन् एका खड्ड्याला बातमीचा भाग होण्याचे भाग्य लाभले. त्याचं खड्ड्यानं माझ्या स्वप्नात येऊन सांगितलेली गोष्ट 'खास' मराठीजनांसाठी.

त्याचं काय झालं 'अच्छे दीन'वाल्यांनी राज्यात सगळं बदलून सगळं बेस्ट चालल्याचं सांगण्यातच साडेतीन वर्षे घातली होती. साठोत्तरीची कथा सुफळ-संपूर्ण नसल्याचं चित्र रंगवून नरेंद्रकृपेने देशात काँग्रेस गवतावर मतदारांनी 'मेरा ७१' हे तणनाशक फवारलं. अन् देशात 'गाजरगवत' फोफावलं. त्यानंतर साडेतीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील साडेसातीचा फेरा संपविण्यासाठी देवेंद्रांचा ऐरावत चौखुर उधाळला. देवेंद्रांनी साठोत्तरीची कथा सुफळ-संपन्न करण्यासाठी घसा खरवडून आवाहन केलं. गाणे म्हणण्याच्या सुरातच त्यांनी ललकारी देऊन मंत्री-संत्र्यांना कामाला लागण्याचा आदेश दिला.

मग देवेंद्रांच्या पोटातलं पाणीही हलणार नाही असे रस्ते तयार करण्याची जबाबदारी संघिष्ठसेवक चंदुभौंनी घेतली. अन् 'खड्डा दाखवा अन् हजार रुपये मिळवा'ची घोषणा दिली. बारामतीच्या 'पॉवर'बाजांसह काँग्रेस गवतवाल्यांनी 'नारूचा रोगी दाखवा अन् हजार रुपये मिळवा' अशी घोषणा देऊन हिंदुस्थानला 'नारुमुक्त' केलं होतं. त्याचं पावलावर पाऊल टाकून चंदुभौंनी मग सा.बां.वर विश्वास टाकून हजार रुपये सर्वसामान्यांसाठी खुल्ले केले. हा किती जणानी हजार रुपये कमविले की सेल्फी काढण्याच्या नादात जादा गमविलेत, याबद्दल अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. तसेच दिलेले पैसे हजारांच्या नोटात दिलेत की दोन देऊन एक पुन्हा मागे घेतलेत हेही जगजाहीर झालेलं नाही. मात्र, याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करण्यासाठी निवेदन कोणी द्यायचं यावरून 'नाना' व 'अण्णां'मधलं भांडणं मात्र रंगात आलयं, हे नक्की. चला, हेही नसे थोडके..!

जाऊद्या विषयांतर नकोय म्हणून पुन्हा गुजरातचा 'मऊ रस्ता' सोडून मराठी मुलुखातल्या खड्ड्यांच्या रस्त्यावर गाडी आणतोय. १५ डिसेंबर २०१७ पर्यंत राज्य खड्डेमुक्त होईल अशी घोषणा सा.बां. मंत्री पाटील यांनी त्यांच्या वाड्यावरून केली होती. त्यानंतर सुप्रियाताई बारामतीकर यांनी #selfiewithpotholes ही मोहीम सुरु केली. या मोहिमेला माध्यमांसह तरुणांनी सोशल मीडियावरती मोठी स्पेस दिली. अन् खड्ड्यांचेही भाग्य पालटले. त्याचीच आठवण धनुभाऊ अन् अजितदादांना काल मराठवाड्यात झाली. दोघांनाही खड्ड्यांसोबत सेल्फी काढला अन् दिला मोठ्या दणक्यातच चंदुभौंना व्हाटसऐपवर पाठवून. त्यातबी 'अजितपर्व'साठी झटणा-या दादांचा फोटू पाठवायचा अभ्यास कच्चा असल्याचं दिसलं. कारण त्यांना फोटू पाठवताच येत नसल्यानं दादा धनुभाऊंना म्हणाले, 'सेल्फी तूच पाठव बाबा...' अन् त्या खड्ड्याची बातमी अक्षरष: सेलिब्रिटीच झाली एकाच दणक्यात...

त्योच खड्डा पहाटं स्वप्नात आला अन् माझ्याबी पोटात खड्डा पडला. त्याच भितीपोटी डोळे चोळीत गोधडीतून उठलो अन् गोधडी पुन्हा अंगावर लपेटून हे खड्डेआख्यान तुम्हाला सांगतोय. बाकी माझ्यापेक्षा त्यो खड्डाच महान म्हणावा लागनं. कारण मी आपला स्लो अन् डबड्या मोबाईलवरून सांगतोय तुम्हाला हे खड्डेपुराण. अन् त्यो खड्डा मारी धनुभाऊंसह दादा न् चंदुभौंच्या मोबाईलसहीत पेपरात न् सोशल मीडियातबी सेलिब्रिटी म्हणून मिरवतोय. त्यालाच काय ते आलेत देवेंद्रांच्या राज्यात 'अच्छे दिन'. आम्ही आपले 'अच्छे'ऐवजी बुरे स्वप्नं पाहून तडफडतोय 'दीन'वाणं..!

कळावे, लोभ असावा...
- तुमच्याच हिंदुस्थानातला 'मनच्या बाता'वाला दुर्लक्षित 'भारतीय'...
श्री. सचिन मोहन चोभे,

संपादक, कृषीरंग

मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर रोडवरील "श्री राम बाग एग्रो- मेडीकल टुरीझम फन पार्क" या कृषी पर्यटन केंद्राची ख्याती आता जगभर पोहचली आहे. सुयोग्य व्यवस्थापन आणि आरोग्यपूर्ण वातावरणामुळे या पर्यटन केंद्राने आपला लौकिक निर्माण केला आहे. याच पर्यटन केंद्राच्या एकूण वाटचालीवर प्रकाशझोत टाकला आहे ज्येष्ठ कृषी पत्रकार श्री. आनंद ढोणे यांनी...

"जगात जर्मनी अन् भारतात परभणी" असं म्हटल्या जाणार्या परभणी जिल्ह्यामध्ये अविकसित राहण्याची पैज लावलेल्या पुढारी मंडळींचीच मोठी संख्या आहे. मात्र, त्यातही काही मंडळींनी या जिल्ह्याच्या विकासाला आपल्या पद्धतीने हातभार लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळेच हा जिल्हाही आता प्रगतीपथावर मार्गस्थ झाला आहे. त्यापैकीच एक आहेत, परभणी शहरातील विमल नेत्रालय दवाखान्याचे डॉ संजय प्रभाकरराव टाकळकर. टाकळकर यांनी आपल्या जन्म गावी म्हणजे परभणी जिंतूर रोडवर ६ किमी अंतर लांबीवर असलेल्या धर्मापुरी येथे गावाला लागूनच पश्चिम दिशेला स्वता:च्या २६ एकर जमीन क्षेत्रावर "श्री राम बाग एग्रो- मेडीकल टुरीझम फन पार्क" उभारून परभणी जिल्ह्याचे नाव कृषि पर्यटन जगतात अख्ख्या मराठवाडा प्रांतात एक निसर्ग रम्य ठिकाण म्हणून नावारूपाला आणले आहे.


परभणी शहरापासून जिंतूर तालूक्याकडे जाणा-या मेन रस्त्यावरच ६ कि मी अंतर चालून गेल्यावर डाव्या बाजूला धर्मापुरी हे गाव लागते. धर्मापुरी पाटीवरच श्री राम बाग एग्रो- मेडीकल टुरीझम फन पार्क चे होर्डिंग फलक प्रत्येक माणसाचे आपसुकच लक्ष वेधून घेतं. अन् मग तेथे उतरल्यावर त्या निसर्ग रम्य अशा चित्राकडे पाहून राम बागेच्या दिशेने पाय वळू लागतात. मुख्य रोड स्थानकापासून बागेकडे जाणारा गावातला रस्ता मात्र गावक-यांनी त्यांच्या हद्दीचा तसाच कच्चा ठेवलाय.ह्या रस्त्यावरून मोजून दहा मिनीटे चालून गेल्यावर गावाला खेटूनच पश्चिमेला श्री राम बाग कृषि पर्यटन स्थळ माणसाचे पाय आत स्वताकडे वळवून घेतं. हे  कृषि पर्यटन केंद्र सबंधं २६ एकर प्रक्षेत्रावर विविध निसर्ग रम्या अशा पैलूंनी नटलेलं पाहवयास मिळतं. हल्लीच्या काळात आणि सिमेंट काँक्रीटच्या युगात आपण निसर्गापासून खूप दुरावलो आहोत तसेच जुने ग्रामीण भागातील खेळ विसरलो आहोत. शेतातील मौज,नैसर्गिक पध्दतीने पिकवलेली झाडांची फळे,गावरान मेवा हे सगळे आपल्याला दिसेनासे झाले आहे. काही क्षण निसर्गा सोबत घालवण्यासाठीचं श्री राम बाग हे कृषि पर्यटन स्थळ अद्यावत अशा सोयसुविधायुक्त आहे. या ह्या अग्रो मेडिकल टुरीझम फन पार्क मध्ये जुन्या काळातील डमणी बैल गाडी, घोडेस्वारी, उंट सवारी, सायकल रेसिंग, लहान मुलांना खेळण्यासाठी वाटर टँक, ट्री हाऊस (झाडावरील घर), शिवार फेरी, गावरान मेव्या मध्ये हंगामनिहाय हुर्डा पार्टी, पेरू, बोरे, तुरीच्या शेंगा, हरबरा टहाळ, टरबूज, अंबा, संगीताच्या तालावर नृत्य, विविध जातींचे पक्षी विहार, सर्व जातींच्या सर्प प्राण्यांचा चित्रासह माहीती पट, तारांगण, रस्सी खेच, कबड्डी, खो खो, विविध गेम्स, गोट्या, विटी दांडू, लिंगोरच्या, बध्दीबळ, कँरम, किट्टी पार्टी, बर्थ डे पार्टी, सेमिनार असे नानाविध प्रकार येथे निसर्ग रम्य वातावरणात साजरे करता येतात. या राम बागेत कडू निंब, चिंच, बाभूळ, मौसंबी, आवळा, पेरू, बोर, संत्री, अंबा ही अनेक फळांची मोठी झाडे उभी असल्याने माणसाचे मन अगदी रमूण जाते. या कृषि पर्यटनाची स्वागत कमान अतिशय देखणी असी आहे. आत मध्ये स्वागत कमानीला लागूनच सुरक्षा गृह आहे जे की जुन्या राज घराण्या प्रमाणे जूने कंदील दिवे अटकवून ठेवलेले आहे. त्या पुढे जाताच विविध जातींच्या शेतकरी मित्र अशा सापांच्या चित्रासह त्यांची माहीती बोर्ड असलेले सर्प उद्यान लागते आणि थोडे पुढे सरकून गेल्यानंतर अनेक समाज सुधारकांचे तैल चित्र हे पुतळ्या प्रमाणे रंगरंगोटीच्या बांधकामासह बसवण्यात आल्याचे दिसते. तसेच समोर काही अंतरावर किल्ले वजा गडासारखे सरदारांचे पुतळे असलेले सुरेख कोरीव वजा बांधकाम आहे. बाजूलाच प्राणी व विविध पक्षींचे विहारही दिसते. जुन्या पध्दतीची दगडी चि-यांनी बांधलेली विहीर अन् तिच्यावर पाणी शेंदूण काढण्याचे रहाट रस्सी चक्र देखणे आहे. त्याला लागूनच डाव्या बाजूला डायनींग हाल आहे. येथे बांबू पासून बनविलेल्या सुबक अशा खूर्च्या टाकण्यात आल्या आहेत. जून्या पध्दतीच्या उंच अशा आराम दायी नारळी दोरीने विणलेल्या आरामदायी बाजाही आहेत. एक उंचावर बांधलेले सभागृह देखील आहे.दरवर्षि १ जानेवारी ते २० जानेवारी पर्यंत भव्य पतंग उडविणे उत्सव,महिलांसाठी मकरसंक्रातीसह विविध कार्यक्रम,मार्च महिन्यात भारतीय सणावारातील महत्वाचा रंगपंचमी हा सण नैसर्गिक वातावरणामध्ये शुद्ध व सात्विक विचाराने १०० टक्के नैसर्गिक रंगांची विचारांची मुक्तपणे उधळण सोबत विविध मनोरंजनपर कार्यक्रमे साजरी होतात. तसेच एप्रिल व मे महिन्याच्या सुट्टी मध्ये खास विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी सुट्टीचा पुरेपूर आनंद आनुभवण्याकरीता विविध खेळ, जसे क्रिकेट, कँरम, बुध्दीबळ, अश्वरोहन, नेमबाजी, योगा व इत्तर बौध्दिक खेळ ५ दिवसीय शिबीर घेतले जाते. शिवाय,खास मराठवाड्याची रसाळी अंब्याच्या विविध प्रजातीची चव ही संपूर्ण कुटूंबासह अंबा महोत्सवात चाखायला मिळते. जून व जुलै महिन्यात ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन वृक्षारोपण लागवडीने  साजरा केला जावून नागपंचमीला सर्व जातींच्या सापा विषयी माहिती दिली जाते. सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात निसर्गाची सफर मारीत २७ सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन उत्साही वातावरणात साजरा होतो आणि कोजागिरी पोर्णिमेच्या रात्री संगित मैफिल घेतली जाते. त्याच बरेबर डिसेंबर ते पुढील तिन महिने रब्बी हंगामात जोरदार हुर्डा पार्टीत पर्यटक चवदार टाळकी ज्वारीच्या भाजलेल्या कणसा दाण्याची मजा चखतात.तसेच नेहमी शैक्षणिक सहलीने विद्यार्थी व शिक्षकांची रेलचेल चालूच असते. युवा कट्टे ही घेतले जातात, अशी माहिती डॉ संजय प्रभाकरराव टाकळकर यांनी दिली.संपर्क :
डॉ संजय प्रभाकरराव टाकळकर मो.९८२३१६२७६५,
भगवान मोळे ( व्यवस्थापक) मो.८३०८७४८९२७ 
उमेश कुलकर्णी(मार्केटिंग प्रतिनिधी) मो ९७६४८९७७१४ 
श्री राम बाग एग्रो- मेडीकल टुरीझम अँड फन पार्क, धर्मापुरी,ता जि परभणी.

लेखक : श्री. आनंद ढोणे मो. ८८८८०८१०८३MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget