DNA Live24 2015

खड्डेअख्यान : रस्त्यावरील खड्ड्यांचेही भाग्य उजळले..! (पूर्वार्ध)

कोणाचे भाग्य कधी अन् कोणामुळे उजळेल याचा काहीच भरवसा नाही. कारण खड्डे मग ते रस्त्यातले असो की भितीमुळे पोटात पडलेला 'खड्डा' असो, सगळ्यांकडेच आपले दुर्लक्ष असते. खड्डेयुक्त रस्त्यांचीच भारतियांना सवयही झालेली आहे. त्यामुळेच असुनही कोणाच्याही ध्यानात येत नसलेला हा खड्डा तसा अभागीच. फक्त गाडीला गचका बसला तरच यावर आपले लक्ष जाते. मात्र, दोनेक महिन्यांपासून याच अभागी खड्ड्यांचे भाग्य उजळले आहे. याला निमित्त ठरले आहेत आपले सा.बां.मंत्री चंदुभौ पाटील साहेब. खड्ड्यालाही सेल्फीचे ग्लैमर आणणा-या याच मंत्र्यांसह विरोधकांनाही त्रिवार मुजरा... माझा नाही खड्ड्यांचाच...!!!

ही घटना दूर कुठेतरी मराठवाडा नावाच्या राज्यात घडली आहे. हल्लाबोल करायला गावोगाव फिरणा-या धनुभाऊ व अजितदादा यांच्याबाबतीत ही घडली अन् एका खड्ड्याला बातमीचा भाग होण्याचे भाग्य लाभले. त्याचं खड्ड्यानं माझ्या स्वप्नात येऊन सांगितलेली गोष्ट 'खास' मराठीजनांसाठी.

त्याचं काय झालं 'अच्छे दीन'वाल्यांनी राज्यात सगळं बदलून सगळं बेस्ट चालल्याचं सांगण्यातच साडेतीन वर्षे घातली होती. साठोत्तरीची कथा सुफळ-संपूर्ण नसल्याचं चित्र रंगवून नरेंद्रकृपेने देशात काँग्रेस गवतावर मतदारांनी 'मेरा ७१' हे तणनाशक फवारलं. अन् देशात 'गाजरगवत' फोफावलं. त्यानंतर साडेतीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील साडेसातीचा फेरा संपविण्यासाठी देवेंद्रांचा ऐरावत चौखुर उधाळला. देवेंद्रांनी साठोत्तरीची कथा सुफळ-संपन्न करण्यासाठी घसा खरवडून आवाहन केलं. गाणे म्हणण्याच्या सुरातच त्यांनी ललकारी देऊन मंत्री-संत्र्यांना कामाला लागण्याचा आदेश दिला.

मग देवेंद्रांच्या पोटातलं पाणीही हलणार नाही असे रस्ते तयार करण्याची जबाबदारी संघिष्ठसेवक चंदुभौंनी घेतली. अन् 'खड्डा दाखवा अन् हजार रुपये मिळवा'ची घोषणा दिली. बारामतीच्या 'पॉवर'बाजांसह काँग्रेस गवतवाल्यांनी 'नारूचा रोगी दाखवा अन् हजार रुपये मिळवा' अशी घोषणा देऊन हिंदुस्थानला 'नारुमुक्त' केलं होतं. त्याचं पावलावर पाऊल टाकून चंदुभौंनी मग सा.बां.वर विश्वास टाकून हजार रुपये सर्वसामान्यांसाठी खुल्ले केले. हा किती जणानी हजार रुपये कमविले की सेल्फी काढण्याच्या नादात जादा गमविलेत, याबद्दल अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. तसेच दिलेले पैसे हजारांच्या नोटात दिलेत की दोन देऊन एक पुन्हा मागे घेतलेत हेही जगजाहीर झालेलं नाही. मात्र, याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करण्यासाठी निवेदन कोणी द्यायचं यावरून 'नाना' व 'अण्णां'मधलं भांडणं मात्र रंगात आलयं, हे नक्की. चला, हेही नसे थोडके..!

जाऊद्या विषयांतर नकोय म्हणून पुन्हा गुजरातचा 'मऊ रस्ता' सोडून मराठी मुलुखातल्या खड्ड्यांच्या रस्त्यावर गाडी आणतोय. १५ डिसेंबर २०१७ पर्यंत राज्य खड्डेमुक्त होईल अशी घोषणा सा.बां. मंत्री पाटील यांनी त्यांच्या वाड्यावरून केली होती. त्यानंतर सुप्रियाताई बारामतीकर यांनी #selfiewithpotholes ही मोहीम सुरु केली. या मोहिमेला माध्यमांसह तरुणांनी सोशल मीडियावरती मोठी स्पेस दिली. अन् खड्ड्यांचेही भाग्य पालटले. त्याचीच आठवण धनुभाऊ अन् अजितदादांना काल मराठवाड्यात झाली. दोघांनाही खड्ड्यांसोबत सेल्फी काढला अन् दिला मोठ्या दणक्यातच चंदुभौंना व्हाटसऐपवर पाठवून. त्यातबी 'अजितपर्व'साठी झटणा-या दादांचा फोटू पाठवायचा अभ्यास कच्चा असल्याचं दिसलं. कारण त्यांना फोटू पाठवताच येत नसल्यानं दादा धनुभाऊंना म्हणाले, 'सेल्फी तूच पाठव बाबा...' अन् त्या खड्ड्याची बातमी अक्षरष: सेलिब्रिटीच झाली एकाच दणक्यात...

त्योच खड्डा पहाटं स्वप्नात आला अन् माझ्याबी पोटात खड्डा पडला. त्याच भितीपोटी डोळे चोळीत गोधडीतून उठलो अन् गोधडी पुन्हा अंगावर लपेटून हे खड्डेआख्यान तुम्हाला सांगतोय. बाकी माझ्यापेक्षा त्यो खड्डाच महान म्हणावा लागनं. कारण मी आपला स्लो अन् डबड्या मोबाईलवरून सांगतोय तुम्हाला हे खड्डेपुराण. अन् त्यो खड्डा मारी धनुभाऊंसह दादा न् चंदुभौंच्या मोबाईलसहीत पेपरात न् सोशल मीडियातबी सेलिब्रिटी म्हणून मिरवतोय. त्यालाच काय ते आलेत देवेंद्रांच्या राज्यात 'अच्छे दिन'. आम्ही आपले 'अच्छे'ऐवजी बुरे स्वप्नं पाहून तडफडतोय 'दीन'वाणं..!

कळावे, लोभ असावा...
- तुमच्याच हिंदुस्थानातला 'मनच्या बाता'वाला दुर्लक्षित 'भारतीय'...
श्री. सचिन मोहन चोभे,

संपादक, कृषीरंग

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget