DNA Live24 2015

'मार्केटिंग म्हणजे बोभाटा करणे' असं सांगणारे कृषीउद्योगदूत एम.बी. शिंदे यांचे निधन

घरोघरी निर्जलीकरण प्रकल्प उभारण्यासाठीची शेतकरी हिताती चळवळ महाराष्ट्रात रुजविणारा कार्यसम्राट म्हणजेच स्व. एम. बी. शिंदे. कारण अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील Aroow Agro Industries चे मालक हीच त्यांची ओळख राहिली नव्हती. तरुणांमधून कृषी उद्योजक घडविण्याचाच वसा शिंदे सरांनी घेतला होता. शुक्रवारी (दि. १९ जानेवारी २०१८) कंपनीत काम करतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. महाराष्ट्रात हजारो तरुण-तरुणींना उद्योजक बनविणा-या या कार्यसम्राटाचे असे अवेळी व लवकर जाणे अनेकांना चटका लावून जाणारेच आहे...

'देवाला चांगली माणसं आवडतात, अन् तो अशा दिलदार व मदतीसाठी तत्पर असणा-यांना लवकर बोलवून घेतो', असं ऐकत-बोलतच भारतीय माणूस ज्येष्ठ होतो. यात कितपत तथ्य आहे माहित नाही. पण काल रात्री याचीच प्रचिती आली. कारण हजारो छोटे-मोठे उद्योजक घडविणारे आमचे एम. बी. शिंदे सर आम्हाला पोरके करून गेले होते. एमसीईडी, मिटकॉन असो की राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठामधील फुड प्रोसेसिंग कार्यशाळा सगळीकडे प्रमुख मार्गदर्शक शिंदे सर असत.

'मार्केटिंग म्हणजे साधा प्रकार आहे. त्याचं जादा बर्डन घेऊ नका. कारण मार्केटिंग म्हणजे फक्त बोभाटा करणं' असं सोप्या भाषेत समजावून सांगणारे शिंदे सर आपल्यातून गेल्याचं अजुनही मन मान्य करीत नाही. फळे व भाजीपाला डिहाड्रेशन हाच त्यांचा खरा विषय. या प्रक्रियेचे बारिकसारिक तपशील ते पहिल्याच भेटीत कोणालाही समजावून सांगत. त्यांचं कौंटुंबिक जीवन काही मलाही माहित नाही. कारण पायाला भिंगरी लावल्यागत शिंदे सर सतत राज्यभर पायपीट करीत होते. एसटीच्या लालपरीतून ते कुठेही जाऊन तरुणांना डिहायड्रेशनचे बारकावे समजावून सांगत. कुठलाही बडेजाव न मिरवता व आर्थिक अभिलाषा न ठेवता हा माणूस काम करायचा.

मी अनेकदा म्हटलोय की, 'सर, किती दिवस फक्त समाजसेवा करणार? मार्केटिंग आम्हाला सोप्या भाषेत समजावून सांगता अन् स्वत: मात्र प्रसिद्धीपासून लांब राहता...' ते मला म्हणत, 'सचिन, तुझं म्हणणं चूक नाही. पण मी समाजसेवक नाही. कारण लोकांना मदत करण्यात माझंही हित आहे. कारण मला यातून आनंद व समाधान लाभतं...' (आताही याची आठवण होऊन डोळे पाणावलेत) नगरमधील झोपडी कँटिनमध्ये एकामध्ये दोन कटिंग चहा पिऊन आम्ही शेतकरी बांधवांच्या आर्थिक उन्नतीसाठी राबविण्याच्या प्रकल्पांवर काथ्याकूट करायचो.

समाजसेवेचा बुरखा ओढून घेत पोटार्थीपणे काम करणारे जाती-धर्माचे नेते व पुढारी यांच्यापेक्षा आमचे शिंदे सर महान होते. कारण ते तरुणांना जात व धर्म पाहून कधीच मदत करीत नव्हते. हजारो बचत गटांनाही त्यांनी आर्थिक उन्नतीचा मार्ग दाखविला. महिला सक्षमीकरणातही त्यांचे कार्य मोठे आहे. कधीही त्याचा बडेजाव सरांनी मिरवला नाही. मोठे काम करूनही जमिनीवर असलेला हा कार्यसम्राट होता.

सचिन चोभे, सुधीर चोभे, विशाल कुटे, सुरेंद्र शिंदे.... अशी यादी हजारोंची होईल. या सर्वांना जोडणारा दुवा म्हणजेच शिंदे सर. त्यांची कामाची उमेद व निस्वार्थी वृत्ती मला खूप काही शिकवून गेली. काल रात्री सुरेंद्र सरांचा मेसेज आला की, सर आम्हाला पोरके करून गेलेत. त्यांचा फोटो शोधण्यासाठी तासभर इंटरनेट चाळलं. पण फोटो काही मिळालाच नाही. आज सकाळी सुरेंद्र सरांनी पाठविला अन् हे श्रद्धांजलीपर लिखाण करायला बसलो. एका कार्यशाळेत मार्गदर्शन करतानाच हा फोटो आहे. हेच शिंदे सरांचं आवडतं काम होतं.

कृषीउद्योगदूत एम. बी. शिंदे यांचेच काम आता माझ्यासारख्यांना पुढे न्यायचं आहे. तीच असेल त्यांना खरीखुरी श्रद्धांजली...

- श्री. सचिन मोहन चोभे

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget