DNA Live24 2015

नावीन्यपूर्ण सहकारी संस्था स्थापन करण्याची संधी

अहमदनगर : प्रतिनिधी
सहकार क्षेत्रात पारंपरिक पद्धतीने विविध संस्था सुरु करण्याचा कल बदलून ग्रामीण जीवन आणि त्यांच्याशी निगडीत सेवा पुरवणाऱ्या सहकारी संस्थांची निर्मिती व्हावी, यासाठी सहकार विभागाने नावीन्यपूर्ण सहकारी संस्थांची स्थापना करण्याचे ठरविले असून जिल्ह्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

अहमदनगर जिल्ह्यात प्रामुख्याने सहकारी साखर कारखान्यांची संख्या जास्त आहे. त्याचसोबत कृषी उत्पन्न बाजार समिती, विविध कार्यकारी सहकारी संस्था आदींची संख्याही खुप आहे. मात्र, रोजगाराभिमुख आणि नावीन्यपूर्ण उपक्रम अथवा कुशल-अकुशल मनुष्यबळास आणि स्थानिक परिस्थितीची गरज ओळखून अशा संस्था उभ्या राहाव्यात, यासाठी सहकार विभागाचे काम सुरु होते. जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी यासंदर्भात वेळोवेळी जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) अनिलकुमार दाबशेडे आणि त्यांच्या तालुकापातळीवरील सहकाऱ्यांच्या बैठका घेऊन या प्रक्रियेला वेग दिला.
            तालुका सहनिबंधकांनी प्रत्येक तालुक्यात यादृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली. सुरुवातीला कोणकोणत्या क्षेत्रात काम सुरु करता येईल, याबाबत विचार झाला. संगणक प्रशिक्षण, भरती प्रक्रिया राबविणारी सहकारी संस्था, खासगी सुरक्षारक्षक पुरविणारी सहकारी संस्था, विविध घरगुती सेवा पुरविणारी सहकारी संस्था, औषधी वनस्पती उत्पादक सहकारी संस्था, घनकचरा व्यवस्थापन आणि सहकारी रुग्णालय अशा बाबींचा विचार करण्यात आला.
            विशेष म्हणजे, श्रीगोंदा येथे श्री संत शेख महंमद महाराज सहकारी रुग्णालय या नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत सुरु झाले आहे. रुग्णांसाठीची सेवा याठिकाणी सुरु होऊन ते आता कार्यरत आहे. अधिक व्यापक प्रमाणात काम करण्यासाठी आणि नागरिकांना सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी आता या संस्थेचे प्रयत्न सुरु झाले आहेत.
            याशिवाय, राहाता येथे गोरगरिबांच्या अंत्यविधीसाठी मोफत साहित्य पुरविणे आणि इतरांना नाममात्र सेवा आकारुन सेवा पुरविणारी वैकुंठयात्रा साहित्य सेवा सहकारी संस्था स्थापन करण्यात आली आहे. एखाद्या कुटुंबातील सदस्याचे निधन झाले तर अशावेळी संपूर्ण कुटुंबिय दु:खात असते. कुटुंबियांच्या जवळची सहकारी, शेजारी अशावेळी धावपळ करतात आणि अंत्यविधीसाठीची तयारी करतात. कुटुंबियांना कोणतीही अडचण नको, त्रास नको, या हेतूने अशा पद्धतीने ही सहकारी संस्था सुरु कऱण्यात आली आहे.
            जिल्ह्यात निमगाव खैरी (ता. श्रीरामपूर) येथे यशवंत बहुउद्देशीय सहकारी संस्था, पारनेर येथे विविध बचतगटांनी मिळून स्थापन केलेली वुमन डेवलपमेंट को-ऑप. सोसायटी, सिंदीच्या झाडापासून निरा उत्पादन करुन विक्री करणे आणि सिंदीच्या झाडांची लागवड करणे हा हेतू घेऊन गांजीभोयरे येथे रेणुकामाता निरा उत्पादक सहकारी संस्था स्थापन करण्यात आली आहे.
            येत्या काळात असे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून संस्थांची स्थापना व्हावी, यासाठी जिल्हापातळीवरील सहकार विभागाची यंत्रणा काम करीत आहे.
Labels:

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget