DNA Live24 2015

लोकसहभागाची जोड देऊन कांतराव देशमुख यांनी केला झरी गावाचा कायापालट..!

गावाची प्रगती करण्यासाठी विकासवादी नेत्यासह गावकरीही विचारी आणि सुज्ञ असावे लागतात. या दोन्हींचा मेळ घालूनच खराखुरा ग्रामविकास शक्य आहे. अशाच पद्धतीने झरी (जि. परभणी) या गावानेही 'जलयुक्त' होऊन सर्व समस्यांवर मात करण्यासाठी कंबर कसली आहे. गावाचे मार्गदर्शक आणि राज्य कृषी विभागातर्फे दिला जाणारा कृषिभूषण पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते श्री. कांतराव देशमुख (गावाचे लाडके काका) यांच्या नेतृत्वाखाली या गावाचा कायापालट झाला आहे. ज्येष्ठ कृषी पत्रकार आणि शेती विषयाचे अभ्यासक श्री. आनंद ढोणे पाटील यांनी गावाच्या विकासाचा घेतलेला आढावा...

कोणत्याही गावचा आणि परिसराचा सर्वांगीण विकास घडवून आणायचा असेल तर त्या कामी गावचा पुढारी चांगला असावा लागतो. त्याच बरोबर ग्रामस्थ नागरीकांनी देखील एकीचे बळ ठेवून विकास कामात सक्रिय सहभाग घेणे महत्वाचे असते. मात्र, अनेक गावात असी सत्य परिस्थीती असते की, गावचा सरपंच विकास कामे करू लागल्यावर त्यास राजकीय द्वेषापोटी म्हणा की तो पुढे जाईल या विरोधापायी म्हणा ग्रामसुधार योजना राबविणा-यांना साथ न देता त्यांची तंगडी धरुन मागे ओढण्याची वृत्ती मराठवाड्यातील अनेक गावातील नागरीकांच्या मनात पक्की घर करून बसलीय. यामुळे तशा गावांचा विकास न होता ती गावे भकासच होत आहेत. परंतु, अशा विषयाला अपवाद ठरलयं ते परभणी जिल्ह्यातील झरी  गाव. जलयुक्त शिवार अन् नाम फाउंडेशन च्या वतिने गाव व परिसरात जनहिताची चांगली विकास कामे घडवून आणल्याने कांतराव काकांच्या प्रयत्नाने गावाचा कायापालट होत आहे.


झरी हे परभणीहून जिंतूर शहराकडे जाणा-या मुख्य रस्त्यावरच १८ किलोमीटरवर उत्तर दिशेला लागणारं सुमारे १८ हजार लोकसंख्या अन् ३००० घरं असलेलं गाव आहे. या गावात सर्व जाती धर्माचे नागरीक लोकं गुण्यागोविंदाने वास्तव्य करून राहतात. गावाचे कृषिभूषण तथा सामाजिक कार्यकर्ते श्री. कांतराव माणिकराव देशमुख उर्फ काका हे ६० वर्ष वयाचे  कुटूंबाची एकूण एकत्रीत मिळून ११० एकर जमीन असलेले प्रगतशील आणि प्रयोगशीलता जोपासणारे मोठे शेतकरी तर आहेत. तसेच ते गावचे १९७८ ते २००२ पर्यंत असे अनेक वर्ष सरपंच, पंचायत समिती सदस्य, परभणी जिल्हा परिषदेचे दोन वेळा शिक्षण व बांधकाम समितीचे सभापती, कृषि उत्पन्न बाजार कमिटीचे संचालक अशी विविध पदांवर त्यांनी यशस्वीपणे ठसा उमटविला आहे. या सर्व पदांवर काम करतानाच विविध सरकारी, निमसरकारी आणि लोकसहभाग यांच्या माध्यमातून गावाबरोबरच परिसराचा विकास घडवून आणणारे काका म्हणुन ते अवघ्या मराठवाड्यात परिचित आहेत. त्यांनी या गावात दहावीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा, पशूसंवर्धन दवाखाना ,पोस्ट कार्यालय, मानवासाठी शासकीय दवाखाना, जिल्हा बँक तसेच राष्ट्रीयकृत बँक अशा पद्धतीच्या सार्वजनिक सुविधा केंद्रे उभारली आहेत. तसेच गावातील रस्ते, पथदिवे, पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येक घरी नळ जोडणी, सांस्कृतिक सभागृह, सुसज्जं स्मशानभुमीसह नाम नदीवर बांधण्यात आलेले बंधारे आणि त्यात आडवलेलं करोडो लिटर्स पाणी जमिनीत मुरल्यामुळे शेतशिवारात पाण्याची मुबलक उपलब्धता  झाल्याने  मराठवाडा विभागात झरी गाव पाणीदार गाव म्हणून नावारूपाला येत आहे.

सरपंच पदाचा केला उपयोग
१९७८ ते २००२ साला पर्यंत म्हणजे तब्बल २४ वर्ष ते झरी गावचे सरपंच असताना त्यांनी विविध ग्राम सुधार योजना आणून गावातील सर्व कच्चे रस्ते सिमेंट क्रांकेटने बांधकाम करून पक्के करवून घेतले आहेत. शिवाय प्रत्येक आवश्यकठिकाणच्या खांबावर विद्यूत पथदिवे, वाढीव विद्यार्थी संख्येच्या हिशोबाने शाळेला वाढीव वर्ग खोल्या बांधकाम,सांडपाणी गावाबाहेर वाहून जाण्यासाठी नाल्यांचे बांधकाम, पिण्याच्या पाण्यासाठी गावाशेजारी मोठी विहिर खोदून त्याविहिरीवरून गावात पाणी पुरवठ्याकरीता पाईपलाईन करून प्रत्येक घरी नळ जोडणी तसेच ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या बसवून तेथून नळ जोडणी आणि काही विंधन विहीरीही खोदून घेवून गावात कायम पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येवून अशी विविध जनसुविधेची कामे करीत सरपंच पदाचा त्यांनी सदूपयोग करून घेतला. या व्यतिरीक्त ते १९९१ ते १९९५ या कालावधीत पंचायत समिती व परभणी जिल्हा परिषदेचे दोन ट्रम बांधकाम व शिक्षण सभापती असताना त्यांनी गावात जनतेच्या व शेतक-यांच्या सोयीसाठी जिल्हा मध्यवर्ती व राष्ट्रीय बँकेच्या वरिष्ठ स्तरावर सातत्याने प्रयत्न करून त्या बँकेच्या शाखा आणून स्थापन करून शेतक-यांना शेतीविकासासाठी पिक कर्ज उपलब्ध करून दिले. बचत व गुंतवणूकीचीही बँकामुळे गावातच नागरिक व शेतक-यांनी सोय झाली.तसेच पशुधन दवाखाना, पोस्ट कार्यालय, मानवाच्या गरजेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र ही नव्याने मंजूर करून आणून चालू केले. राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बांधून गावात शिवस्मारक उभारले आहे. गावाजवळच दूधना नदी किना-यावर स्वताची १ एकर जमिन दाण देवून तेथे "मातोश्री इंदिराबाई देशमुख वैकुंठधाम झरी"या नावाने अद्यावत अशी एक स्मशान भूमी बांधण्यात आली आहे. शेतक-यांचा कापूस गावातच विकला जावा यासाठी जिनींग व प्रेसिंग कारखान्याची गावातच उभारणी करून तो चालू केल्याने या कापुस संकलन केंद्राच्या जिनींगवर गाव व परिसरातील शेतक-यांच्या कापसाला चांगला भाव मिळत आहे. या सहच त्यांनी गावात व बाहेर गावी जावूनही शेतक-यांचे शेतकरी मेळावे घेवून जास्त पाणी लागणारे पिके न घेता कमी पाणी लागणारे पिके ही थिबकवरच घ्यावीत,तसेच उत्पादन वाढीसाठीचे आधुनिक नव तंत्र वापरून शेती करावी, कमी खर्चात अधिक उत्पादन देणा-या फळबागा लागवड कराव्यात, सेंद्रीय शेती,पाणी आडवा पाणी जिरवा असे मार्गदर्शन देखील शेतक-यांना ते नेहमीच करीत असतात.अशा स्वरूपाचे बरीच जनहितार्थ कामे काकांनी केली आहेत.


जलयुक्त शिवार अभियान जोरात
महाराष्ट्र सरकारने २०१५-१६ या चालू आर्थिक वर्षापासून राज्यात कोरड्या दुष्काळावर मात करण्यासाठी व टँकर मुक्त गावे करण्यासाठी जलयुक्त शिवार हे जलसंधारणाची कामे करण्याचे महत्वपूर्ण अभियान राज्यात चालू करून तेराबविण्याचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेतले. या अभियानात कायम दुष्काळ  असणा-या गावांची प्रथम निवड करून त्या त्या गावाशेजारच्या नद्यांचे खोलीकरण,रुंदीकरण आणि सरळीकरणाची कामे लोकसहभाग व शासन हिस्सा खर्चातुन करून त्यावर बंधारे बांधून त्यात पावसाच्या पुराचे पाणी आडवल्या गेल्याने जलयुक्त शिवार योजनेतून जलसंधारणाची कामे झालेल्या गाव व परिसरातील जमिनीत पाणी मुरल्या जावून भूगर्भातील पाणी पातळी वाढल्यामुळे काही अंशी कोरड्या दुष्काळावर मात होवून या अभियानात झालेल्या नदी विकास कामाचा चांगला परिणाम दिसून येत आहे.

नाम फाउंडेशनचे लाभले महत्वाचे योगदान
प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते व हिंदी चित्रपटातील अभिनेता नाना पाटेकर या दोघांनी एकत्र येवून १५ सप्टेंबर २०१५ साली स्थापन केलेल्या नाम फाउंडेशनने   मराठवाडा, विदर्भ विभागासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील दुष्काळ व आत्महत्या ग्रस्त शेतक-यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या वारसांना प्रत्येकी पंधरा हजार रुपयाची आर्थिक मदत, अनेक ठिकाणी जलसंधारणाची कामे केली आहेत.झरी गावक-यांनाही नामचे मोठे योगदान लाभले आहे. नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपूरे, नाना पाटेकर हे शेतक-याप्रती जनहिताची कामे करणारा एखादा समाज कार्यकर्ता मिळण्याचे शोधकाम करीत असतानाच त्या कामी साजेसा अशा कांतराव देशमुखांचे नाव कळाले. यावरून त्यांनी काकांशी संपर्क करून चर्चा केली होती .नामचे संस्थापक मकरंद अनासपूरे हे झरी येथे येवून पूर्वी कांतराव यांनी केलेले ग्राम विकास कामे पाहून खुश होवून त्यांनी नामच्या वतीने गावच्या जलसंधारणाच्या कामात सहभाग देण्याचे ठरवून त्या पध्दतीने मोलाचे सहकार्य करून नद्यांच्या खोलीकरण, सरळीकरण, बंधारे बांधण्याकामी आर्थिक सहकार्य केले आहे.

नाम नदीच्या जलसंधारण कामासाठी नाम फाउंडेशन चा मोठा आर्थिक सहभाग नाम फाउंडेशनने गावासाठी जलसंधारणाची कामे करण्यासाठी झरी गाव दत्तकच घेतल्याने नामने नागरीकांना पिण्याचे शुध्द पाणी मिळावे या साठी प्रति तास २ हजार लिटर पाणी शुद्ध करण्याचा आर ओ प्लांट बसविला आहे. त्यातून प्रत्येक कुटूंबाला दररोज २० लिटर शुद्ध पाण्याचे पुरवठा केला जातो. तसेच गावातील काही निवडक ५० शेतक-यांना नाम फाउंडेशन च्या वतिने एक एकरसाठी ५० थिबक संच मोफत दिले आहेत. याशिवाय गावातील ३५० होतकरू महिलांना स्वताच्या पायावर उभे राहून स्वावलंबी होवून स्वंयरोजगार करण्याच्या हेतूने त्यांना कपडे शिलाई कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थी महिलांना ५० शिलाई मशीन भेट देण्यात आल्यामुळे त्या महिलांनी आता शिवणकाम व्यवसाय उभारल्याने आर्थिक स्तराने स्वावलंबी झाल्या आहेत.
तसेच नामने गावातील दहावी अकरावी वर्गात शिकणा-या मुली, विधवा, परितक्त्या महिला यांना शिलाई कामाचे प्रशिक्षण देवून त्यांना स्वंयरोजगार निर्माण करण्याकरीता ५० कपडे शिवण्याच्या शिलाई मशीन भेट दिल्याने त्या आता आपल्या कपडे शिवण्याच्या रोजगारामुळे स्वावलंबी झाल्या आहेत.यासह नाम फाउंडेशनने बाहेरगावाहून झरी येथे शाळेत पायी ये-जा करणा-या पिंपळा, मिर्झापुर, जलालपूर गावच्या विद्यार्थिनींना १०० सायकली मोफत देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बाहेरगावच्या मुलींना पायपीट करीत शाळेत येण्या जाण्यासाठी होणार त्रास कमी झाल्याने त्यांची शाळेतील अनुपस्थिती कमी झाली आहे.

जमा खर्च हिशोबाच्या बाबतीत झरी ग्रामपंचायत भारतीत पहिलीच
या गावचे शिल्पकार कांतराव काका देशमुख यांनी आपल्या गावाची ग्रामपंचायतची ईमारत ही या पुर्विच सुटेबल असी दोन मजली बांधली तर आहेच. गावात एक मोठे सार्वजनिक उत्सव कार्यक्रमाच्या सोयीसाठी सभागृह ही बांधले आहे. विविधांगी विकास तर आहेच. मात्र,त्यांचे एक वैशिष्ट्य असे आहे की,ग्रामपंचायतीला येणारा रुपया अन् जाणारा रुपया म्हणजे जो काही जमा खर्चाचा हिशोब असतो तो ते न चुकता दररोज ग्रामपंचायतच्या फलकावर लिहून ठेवीत असतात. जेणे करून गावातील नागरिकांना उघड असा हिशोब देणारी झरी ही भारतातील पहिलीच ग्रामपंचायत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 
संपर्क:- श्री. कांतराव काका देशमुख झरीकर, 
          
मु. पो. झरी. ता./जि. परभणी, मो. ९४२३७७६६००

लेखक : श्री. आनंद ढोणे पाटील (मो. ९१४५११४४४६)Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget