DNA Live24 2015
February 2018ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राज ठाकरे यांनी घेतलेली मुलाखत सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. कारण तसेच अपेक्षित आहे. मात्र, या मुलाखतीने अपेक्षाभंग झाल्याची सार्वत्रिक ओरड होत आहे. 'मोदीभक्तां'नी असे म्हणून यातले महत्वाचे राजकीय संदर्भ झाकोळण्याचा प्रयत्न केला. तो अपेक्षितच होता. मात्र, पवारप्रेमी किंवा काँग्रेसी विचारांच्या मंडळींनाही यातून काहीच गवसले नसल्याच्या प्रतिक्रिया आहेत. होय, कारण जास्त अपेक्षा ठेऊन जगणारे आणि प्रत्येक गोष्टीत कंटेंट हवाच, अशी अपेक्षा ठेवणाऱ्यांचा अपेक्षाभंग होणे साहजिकच आहे. मुळात अशा मंडळींनी आपापल्या चष्म्यातून मुलाखतीचे आधीच आकलन करून ठेवले होते. काही गृहीतक पक्के करूनच ही मंडळी मुलाखत पाहत होती. त्यामुळे मुलाखतीचा निखळ आनंद त्यांना मिळाला नाहीच. उलट तोंड आंबट करून सोशल मीडियावर 'विचारी' आव आणण्याचा आनंद घेत त्यांनी 'भक्तां'ना बळ देण्याचे कर्तव्य बजावले.

मुळात पवार साहेबांची मुलाखत राजसाहेब घेणार यालाच वेगळे महत्व होते. जागतिक मराठी अकादमीला ही अफलातून कल्पना सुचली. याबद्दल आयोजकांचे अभिनंदन. होय, कारण मागच्या दोन महिन्यापासून या कार्यक्रमाची वाट हजारो मराठी बांधव पाहत होते. तर, अशा कार्यक्रमातून राजकारणाला वेगळी दिशा मिळाल्यास आपले काय होणार, म्हणून काही घटक याची वाट लावण्यासाठी प्रयत्नरत होते.

मुळात हे लिहिताना आधीच स्पष्ट करतो की, मी काही लौकिकार्थाने 'पवारभक्त' नाही. तसाही साडेतीन वर्षांपूर्वीपर्यंत काँग्रेस आणि पवार यांना बोल लावत वयाने लहानाचा मोठा झालेला एक सामान्य माणूस आहे मी. होय, वयाने आणि शरीरानेच या काळात मोठा झालो. आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकेच्या मतदानापूर्वी काही दिवस आधी अक्कल अली की, देशाला जातीयवादी करणाऱ्यांचे दिवस आल्यास आपल्यासह देशाचेही काही खरे नाही. पण, तोपर्यंत माझ्यासारख्यांनी 'अच्छे दिन'चे स्वप्नरंजन करून मोठ्या अपेक्षेने बदलाचा कौल दिला होता. नव्हे, प्रपोगंडा नावाच्या राक्षसाने आम्हाला तसे करण्यासाठी भाग पडले होते. पहिल्याच वर्षात माझ्यासारख्या काहींचा हा हँग ओव्हर उतरला. आणि आम्हाला स्वातंत्र्य, समता व बंधुता यांचे महत्व कळून संविधान हाच धर्मग्रंथ असल्याचे 'अगाध' ज्ञान झाले. म्हणून भाजप सोडून सगळेच राजकीय पक्ष महान असल्याचा माझा दावा नाही. कारण 'एमआयएम'सारखे काही एकारलेले आहेतच की. तसेच काँग्रेसी म्हणवणारेही काही धुतल्या तांदळाचे नाहीत. पण किमान धर्म आणि जातीयवादी विचाराने ते देशात दुही पसरवत नाहीत. हाच काय इतर पक्ष आणि भाजपचा फरक.

तर, मुद्दा माझा किंवा भाजपचा नाही. त्यामुळे झालेले विषयांतर पुरे. आता मुद्यावर येतो. कालची बीएमसीसी (पुणे) महाविद्यालयाच्या मैदानातील अभूतपूर्व मुलाखत पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी हजारो मराठीजन हजर होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून यासाठी तरुण एकवटले होते. निमित्त होते पवार साहेबांना ऐकण्याचे. या मुलाखतीत राजसाहेबांनी काय प्रश्न विचारले आणि त्याला पवार साहेबानी कसे उत्तर दिले हे सांगण्याची मला गरज वाटत नाही. कारण हा लेख वाचणार्यांनी ही मुलाखत पहिलीच असेल आणि पहिली नसल्यास कोणताही पूर्वग्रह न ठेवता पहा आणि मग लेख वाचा.

मित्रो, (भाईओ और बहिनो) या मुलाखतीत राजसाहेबांनी वेगळे प्रश्न विचारले नाहीत... राजकीय हेतूने लॉन्चिंग करण्याचा हा प्रयत्न फसला... यात विशेष कन्टेन्ट नव्हता... तेच-तेच प्रश्न होते... मुलाखत आणि प्रश्नही पूर्वनियोजित होते... मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या भोवतीच मुलाखत फिरली... अशा आणि इतरही शेकडो प्रतिक्रिया सोशल मीडियात आहेत. होय, ज्याचे-त्याचे आकलन तसे असूही शकते. नव्हे, असायलाच हवे. पण पूर्वग्रह ठेऊन आलेल्यांचाच या मुलाखतीने अपेक्षाभंग केलाय एव्हढे नक्की. काहीतरी नवीन माहिती यातून पुढे येईल, असाच पवारप्रेमी विचारवंतांचा होरा होता. तोच फसल्याने त्यांनी नकारात्मक सूर आवळला आहे. होय, पवार आणि त्यांचे राजकारण याबद्दल विशेष माहिती नाहीच हाती लागलेली. पण दुसऱ्याही काही मुद्यांवर यात चर्चा झाली. त्याकडे लक्ष देण्याचे भान या विचारवंतांनी ठेवायला नको का..? का हे कामही आम्ही सध्या 'चळवळ्या'नी करावे..?

या संपूर्ण मुलाखतीत सध्याच्या केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर पहिल्यांदाच कोणीतरी बोलले नाही का..? होय, पवार साहेबांनी नाव घेणे टाळले. पण राजसाहेबांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेबांचे नाव घेऊन ही कमतरता भरून काढलीच की. सगळा (६०० कोटींचा) देश सध्या आलिंगन आणि अहमदाबाद यांच्या कौतुकात गुंग आहे. त्यावर बोचरे ओरखडे या ज्येष्ठ आणि युवा नेत्यांनी ओढलेच की. तसेच राजकीय वातावरण कसे गढूळ झालेले आहे. किंबहुना असे वातावरण वाढविण्यासाठी कोणते घटक क्रियाशील आहेत, यावरही मंथन झालेच की. होय, विषयाला फक्त स्पर्श झाला मंथन नाही. पण दोन तासांच्या मुलाखतीत कोणता विषय चर्चेतून  पूर्ण संपणार..?

दुसरा महत्वाचा मुद्दा पवार साहेब बोलले तो म्हणजे आर्थिक निकषावर आरक्षणाचा. राजसाहेबांनी यापूर्वी यावर अनेकदा आपले अशाच लाईनचे विचार मांडले आहे. स्व. ठाकरे साहेबांनीही याच विचारांचे बाळकडू तरुणांना पाजले आहे. त्याच लाईनवर पवार साहेबांनी आर्थिक निकषावर आरक्षण या मुद्द्याचे समर्थन करून आपल्याच शाहू-फुले-आंबेडकरी विचारांना बासनात गुंडाळले. आर्थिक निकषावर आरक्षण घटनात्मक नाही. तसेच दारिद्र्य रेषेच्या सर्वेक्षणाचा अनुभव लक्षात घेता, असे आरक्षण कसे गैरलागू आहे, हेही जगजाहीर आहे. मात्र, पवार साहेबांनी यावर सविस्तर न बोलता त्रोटक बोलून आर्थिक निकषावर आरक्षणाचा पुरस्कार केल्याने बहुजन वर्गात चलबिचल झाली आहे. कारण पवार साहेबांनी असे सांगणे अपेक्षित होते की, आरक्षण हा गरिबी निर्मूलनाचा राजमार्ग नाही. तसेच आरक्षणाचे फायदे समाजाऐवजी काही कुटुंबीयांनाच झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आरक्षण 'गिव्ह इट अप' करण्याची मोहीम कशी गरजेची आहे. यावर बोलणे अपेक्षित होते. परंतु, त्यांनीही आरक्षणविरोधी भूमिका घेऊन 'वेगळा' संदेश दिला आहे. तसेच गरीब (मराठा व सर्व जातीच्या) समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीवर सविस्तर बोलण्याचेही टाळले. यावर टीका होणे साहजिक आहे.

राहता राहिला मोदीभक्त मंडळींकडून या मुलाखतीची वाट लावण्याचा प्रयत्न. तर, त्यांनी मुलाखत आणखी चांगली झाली असती, तरीही विरोधी सूर आवळालाच असता. मुळात पवार साहेबांसह काँग्रेसी सत्तेच्या काळात आणि त्यांच्याच मदतीने फोफावलेली उजवी कीड आता पवार साहेबांवर सूड उगवत आहे. पवारविरोध हेच त्यांचे सूत्र आहे. मात्र, पवार साहेबांचे चांगले गुण घेऊन असलेल्या-नसलेल्या वाईट गुणांकडे दुर्लक्ष करून आताच्या तरुणाईने राजकारणात आणि समाजकारणात (अगदी चळवळीतही) उतरने अपेक्षित आहे. मात्र, प्रपोगंडाचा गंडा पडल्याने सध्या तरुणाईला फक्त उजवे आणि त्यातही हिंदुत्ववादी विचार म्हणजेच 'विचार' वाटत आहेत. तर, पुरोगामी म्हणवून घेणाऱ्यांनी एकूणच पवार साहेब असो की काँगेस यांच्याकडून जास्तीच्या अपेक्षा ठेऊन अपेक्षाभंगाचे पातक माथी मारून घेतले आहे. अशाच मंडळींनी आता या मुलाखतीत काहीच दम नसल्याच्या वावड्या उठवून 'भक्तां'ना बळ देण्यात धन्यता मानली आहे. 

@सचिन चोभे
(लेखक शेतकरी संघटनेचे अहमदनगर (दक्षिण) जिल्हाध्यक्ष आहेत)


 नागरिकांनी दक्षता घ्‍यावी  
             अहमदनगर दि. 22 - अहमदनगर जिल्‍हयासह उत्‍तर मध्‍य महाराष्‍ट्रामध्‍ये दिनांक 23 फेब्रुवारी 2018 पासून पुढील 72 तासांच्‍या कालावधीत  वादळीवा-यासह गारपीट होण्‍याचा इशारा भारतीय हवामान खात्‍याने वर्तविला आहे जिल्‍हयातील नागरिकांनी या संदर्भात दक्षता घेण्‍याचे आवाहन जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थान प्राधिकरणाचे  अध्‍यक्ष तथा जिल्‍हाधिकारी  अभय महाजन यांनी  केले आहे.    
           जिल्‍हयातील नारिकांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, बाजार समितीमध्‍ये शेतमाल विक्रीसाठी आणला  असेल किंवा त्‍याप्रमाणे नियोजित केले असेल तर या मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्‍यावी.  वीजेपासून व गारापासून बचावासाठी  सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍यावा, धोकादायक ठिकाणी सेल्‍फी काढू नये.  मोकळे मैदान, झालीखाली विद्युतवाहिनी अथवा ट्रॉन्‍सफॉर्मजवळ थाबू नये. सर्व प्रकारच्‍या विद्युत तारा, विद्युत खांबापासून दूर रहावे.  जनावरे सुरक्षित ठिकाणी स्‍थलांतरीत करावी. अतिवृष्‍टीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्‍यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे.
         सर्व नागरिकांनी वादळी वारे, वीज आणि गारपीटीपासून स्‍वतःपासून गुरा-ढोरांचे संरक्षण होईल याची दक्षता घ्‍यावी,  आपत्‍कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलिस स्‍टेशन यांचेशी संपर्क साधावा तसेच जिल्‍हा नियंत्रण कक्ष जिल्‍हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील टोल फ्री  दूरध्‍वनी क्रमांक 1077 ,  0241-2323844 व 2356940 वर संपर्क साधावा.


परभणी : प्रतिनिधी
उन्हां तान्हात पाऊस थंडीत अन् रात्री बेरात्री सुध्दा शेतकरी काळ्या आईशी ईमान राखत शेतात काबाड कष्ट करतात. त्यांचे कष्ट कोणी मोजीतच नाही. जाती धर्माच्या नावावर जेवढ्या प्रमाणात पेटून उठता तेवढ्याच प्रमाणात शेतक-यांच्या समस्यावर पेटून उठणे गरजेचे आहे. अवकाळी पाऊस गारपीट यापेक्षाही अधिक शासनाच्या उफराट्या धोरणाने शेतकरी शेतकरी मरताहेत, असे प्रतिपादन आ बच्चू कडू यांनी परभणी जिल्ह्यातील सेलू येथे केले.

संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ व छत्रपती संभाजीराजे भोसले चारिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्या निमित्त नुतन महाविद्यालयाच्या मैदानावर चारदिवसीय बळिराजा कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेलू नपचे नगराध्यक्ष विनोद बोराडे हे होते. तर स्वागताध्यक्ष म्हणून जिंतूरचे आ विजय भांबळे पाटील उपस्थित होते. पुढे बोलताना आ बच्चू कडू म्हणाले की, मिरवणूक वजा करून आपण शेतक-याप्रती कृषी प्रदर्शन भरविण्यात आले. ही आजच्या काळाची गरजच आहे.राजकर्त्यांची व्यवस्था बिकट आहे. ज्यांचा जोर आवाज आहे त्यांचीच सत्ता आहे. जमीनीत जितक्या इंच नांगर खोल घातला जातो. त्याच्या अर्धा तरी नांगर सरकारात घातला तर शेतक-यांचे सगळे प्रश्न सुटू शकतील.

सदरील कृषी प्रदर्शनाच्या ह्या कार्यक्रमास जि.प.च्या अध्यक्षा उज्वलाताई राठोड, जिल्हाधिकारी राहूल कर्डिले, जि.प.चे अर्थ व बांधकाम सभापती काकडे अशोक, वनामकृ विद्यापीठाचे डॉ यु एन आळसे यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.


परभणी : प्रतिनिधी
कृषीरंग या साप्ताहिकाने शिवजयंतीनिमित्त यंदा 'छत्रपतींची कृषीनिती' विशेषांक प्रसिद्ध केला आहे. याच विशेषांकाचे प्रकाशन महंत श्री. गुरू जीवनदासजींच्या हस्ते करण्यात आले.

शेतकरी व कष्टकरी जनतेचं मुखपत्र असलेल्या 'कृषीरंग'चा राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या् शिवकालीन कृषीनितीच्या कार्याचा आढावा घेणा-या विशेषांक वाचकांच्या हातात देण्यापूर्वी चुडावा (ता. पूर्णा, जि. परभणी) येथील व महाराष्ट्र राज्यातील अनेक ठिकाणच्या मठाचे मठाधिश तथा महान तपस्वी मंहत श्री. गुरु जिवनदासजी महाराज यांच्या शुभ हस्ते २१ फेब्रूवारी २०१८ रोजी सकाळी ७ वाजता कृषीरंगच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृषीनिती विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. समवेत मराठवाडा विभागीय प्रतिनिधी आनंद ढोणे पाटील उपस्थित होते. याप्रसंगी महंत श्री. गुरू जिवनदासजी महाराज यांनी कृषीरंगच्या पुढील वाटचालीस सुभेच्छा आणि  शुभ आशीर्वाद दिले.


परभणीतील समाजसेवकांचा अनोखा उपक्रम

परभणी : प्रतिनिधी
परंपरेने पुजलेला दरिद्रीपणा त्यातच नेहमीचा दुष्काळ. या अस्मानी संकटाच्या अशा परिस्थितीत हतबल होऊन अच्युत अनुरथ उकल्लकर यांनी केलेल्या आत्महत्येमुळे मानवत तालुक्यातील उक्कलगाव येथील उक्कलकर कुटुंबावर जगण्याची अत्यंत भिषण परिस्थितीत ओढावली. फुटक्या तुटक्या चार-पाच पत्राच घर , घरात अठरा विश्व दारिद्र्य कुटुंबाच्या नावावर एक गुंठाही शेतजमीन नाही .अशा परिस्थितींत आपल्या वृद्ध सासूला व तीन लहान लहान लेकरांना कष्ट करुन संसाराचा गाडा अोढनार्‍या मिनाताई उक्कलकर. मीनाताई उक्कलकर यांना अशा परिस्थितींत कायमचा आश्रय प्राप्त करुन देण्यासाठी गेल्या दिड वर्षापासून  प्रयत्न करणारे मानवत येथील निवासी शाळेवर कार्यरत असणारे श्यामसुंदर निरस, परभणील जिजाऊ ज्ञानतीर्थच शिक्षक राजू वाघ व बाल शिवराय गुरुकुलचे संचालक विलास साखरे, बालविद्यामंदिरचे शिक्षक सुभाष ढगे  या चार मित्रांनी एकत्र येऊन समाजातील सामजिक दातृत्व असणार्‍या व्यक्तिंच्या मदतीतून या ऊक्कलकर कुटूंबास गत वर्षी शिवजंयतीस मिरची काडंप यंत्र/पिठाची गिरणी तर यावर्षी दि. १९ फेब्रुवारी २०१८ रोजी या उक्कलर कुटुंबाला उभारुन देऊन छत्रपती शिवरायांना वेगळ्यापद्धतीने अभिवादन केले आहे.
कृषिभूषन कांतराव  झरीकर, जिंतूर येथील डाॅ.सौ सविता वाघमारे व गणपत वाघमारे दाम्पंत्य, यांच्या आर्थिक मदतीतून या उक्कलकर कुटुंबाला घर बांधून देण्यात आले . याबरोबरच या कार्यासाठी मानवत येथील डॉ सचिन कदम,पत्रकार सुरज कदम,  केशव आगे, श्याम निरस अशा समाजिक जाण असणाऱ्या व्यक्तींनीही मदतीचा हात लावला.  19 फेब्रुवारी रोजी या कुटुंबाला बांधून दिलेल्या "राजमुद्रा" या घराच्या गृहाप्रेवेशाचा कार्यक्रम कृषिभूषण कांतराव
झरीकर,डॉ वाघमारे दांपत्य, प्राचार्य नितिन लोहट, गटशिक्षण अधिकारी संजय ससाणे डाॅ.सचिन कदम डाॅ.निवृती पवार केंद्रप्रमुख शिरीष लोहट, डिगांबर भिसे ,राजू वाघ, विलास साखरे , सरपंच नाथाभाऊ उक्कलकर, पं.सदस्या पिपंळे ताई व गावातील मान्यंवरांच्या उपस्थित कुटुंबाला जिजाऊ व शिवरायांच्या प्रतिमेस अभिवादन करुन गृहप्रवेश करुन दिला.ज्या शिवरायांनी आपले समस्त जीवन समाजातील वृद्ध शोषित वंचित कष्टकरी शेतकरी यांच्या उध्दारासाठी समर्पित केले . त्या शिवरायांचा अशा कार्याचा माध्यमातून शिवसन्मान सोहळा आयोजीत करणे हि बाब खरोखर रयतेच्या राज्यास खर्‍या अर्थाने शोभनारी आहे. अोढवलेल्या दुर्दैवी परिस्थितीने खचलेल्या माय माऊलीस  कायमचा आश्रय मिळावा म्हणून गेल्या दिड वर्षापासुन सातत्याने घेत असलेल्या श्यामसुंदर निरस राजू वाघ , विलास साखरे , पत्रकार सुरज कदम, दिगांबर भिसे, सुभाष ढगे यांच्या परिश्रमातुन व समाजभूषन कांतराव झरीकर ,डॉ वाघमारे दाम्पत्य यांच्या आर्थिक मदतीतून घराच्या बांधकामास सुरवात झाली. तर डाॅ.सचिन कदम सुरज कदम प्रा.सुभाष ढगे,केशव आगे ,अगंद भरोसे  सतिश शिंदे, बाळू खोडके,सुनिल कांबळे, सरपंच नाथाभाऊ यांनीही या घर बांधकामत आर्थिक मदत केली.तर प्रा.नितिन लोहट यांनी मिनाताई उक्कलकर यांच्या दोन मुलीच्या संपूर्ण शिक्षणाचे पालकत्व स्विकारले.
तरुणांनी केलेल्या या आगळ्या वेगळ्या कार्याचं समाजाच्या सर्व थरातून कौतुक होत आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दिगांबर भिसे, प्रास्ताविक श्याम निरस यांनी केले तर आभार विलास साखरे यांनी मानले.

अहमदनगर : प्रतिनिधी
सरकारी कारभार लोकाभिमुख होण्याऐवजी प्रशासनाभिमूख झाल्याचा फटका आता देशीसह विदेशी गायी-म्हशींनाही बसला आहे. परिणामी भरवशाच्या म्हशीला टोणगा झाल्याचाच अनुभव पशुपालकांना येत आहे.

यास निमित्त घडले आहे लाळ्या खुरकुत रोगप्रतिबंधक लसीकरणातील गोंधळाचे. राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने कंपन्यांसमोर लाळघोटेपणा केल्याने हे लसीकरण वेळेत पूर्ण होऊ शकलेले नाही. सहावेळा निविदा काढूनही पाहिजे त्या कंपनीला लाभ मिळत नसल्यानेच हा निविदाघोळ रंगल्याची मंत्रालयात चर्चा आहे. त्यामुळेच याप्रकरणी मंत्री महादेव जानकर यांनीच लक्ष घालण्याची मागणी शेतक-यांतून होत आहे.

हिंगोली : प्रतिनिधी
वसमतनगर तालूक्यातील टोकाई सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या हंगामात १०५ दिवसात १ लाख ६७ हजार ७७० मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले आहे.त्यापासून १ लाख ७१ हजार ८५० क्विंट्टल साखर तयार झाली आहे.

यापूर्हावी हा साखर कारखाना अवसायानात गेला होता. त्यानंतर ह्या साखर कारखान्याची सुत्रे भाजपा नेते अँड. शिवाजीराव जाधव यांच्याकडे गेले. तेंव्हा पासून हा कारखाना जाधव साहेब यांनी स्व:खर्च लावून त्याचा सर्व बाबींनी विकास करून गाळपा करीता सज्ज करून गाळपही चांगल्या पध्दतीने चालू केले. यंदाचे तिसरे गाळपाचे यशस्वी हंगाम आहे.

ऊस गाळपासाठी कारखान्याचे संचालक मंडळ देखील प्रयत्न करीत आहेत. हा साखर कारखाना चालू झाल्यामुळे या भागातील ऊसउत्पादक शेतक-यांचे चेअरमन अँड. शिवाजीराव जाधव यांच्यामुळे चांगभले होत आहे. शेतक-यांनी ऊस लागवड देखील वाढवीली आहे. यापुढेही ऊस गाळप नियोजन पध्दतीने चालूच आहे. याच बरोबर वसमत विधानसभा मतदार संघातील शेतक-यांच्या हितासाठी शिवाजीराव जाधवांचे प्रयत्न चालूच असतात. दिल्लीवरून आल्यानंतर ते संपूर्ण विधानसभा मतदार संघातील गावांना भेटी देवून शेतकरी नागरीकांच्या काय समस्या आहेत? याची माहीती घेवून त्या शासनदरबारी मांडून सोडवणूक करून मतदार संघातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहत असल्याने त्यांच्या नावाचा वसमत व हिंगोली परिसरात बोलबोला होत आहे.

मुंबई : प्रतिनिधी
शासनाने कर्जमाफी दिलेल्या किंवा एकरकमी परतफेड योजनेतर्गत मंजुर कर्जखात्यांवर बॅकानी 31 जुलै 2017 नंतर व्याज आकारणी करू नये असे निर्देश मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज सर्व बॅकांना दिले.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की यापुर्वी राज्यस्तरीय बॅकर्स समीतीच्या बैठकीत हा निर्णय झाला
आहे. तरी देखील जुलै 2017 कर्ज खात्यांवर काही बॅका व्याज आकारणी करत असल्याचे निदर्शनास आले
आहे त्यामुळे बॅकानी अशी व्याजआकारणी करू नये व असे केल्यास बॅकावर कारवाई करण्यात येईल असे
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कर्जमाफी योजनेचा जिल्हा निहाय व बॅक निहाय आढावा यावेळी त्यांनी घेतला.
कर्जमाफी योजनेतर्गत एकुण 31.32 लाख कर्ज खात्यांवर 12 हजार तीनशे कोटी एवढी रक्कम
संबंधीत कर्जखात्यांत वर्ग करण्यात आली आहे.तथापी शेतकऱ्यांनी अर्जात दिलेली माहिती व बॅकेकडील
माहिती जुळत नसल्याने अश्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती संबंधीत बॅकाकडे पाठविण्यात आली
आहे.
21.65 लाख खात्यापैकी 13.35 लाख खात्यांची माहिती बॅकानी अपलोड केली आहे .उर्वरीत
कर्जखात्यांची माहिती पुढील तीन दिवसात सर्व जिल्हा बॅका,राष्ट्रीयकृत बॅका,व्यावसायीक बॅकानी
पोर्टलवर टाकावी. उर्वरीत टप्प्यातील रक्कम पात्र खातेदारांच्या कर्जखात्यावर जमा होण्यासाठी बॅक व
तालुकास्तरीय समीत्यांनी जलदगतीने व अचुक काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा आज व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे
मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.यावेळी आमदार डॉ.अनिल बोंडे यांच्यासह मुख्य सचिव सुमित मल्लीक ,
मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रविण परदेशी ,अप्पर मुख्य सचिव सहकार एस.एस.संधू यासह सर्व
राष्ट्रीयकृत बॅकेचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. सहकारमंत्री सुभाश देशमुख यांनी व्ह‍िडीओ
कॉन्फरन्समध्ये सोलापूरवरून सहभाग घेतला.
एकरकमी परतफेड योजना (ओटीएस )चा लाभ मिळण्यासाठी बॅकांनी विशेष मोहिम राबवुन
शेतक-यांना थकबाकीची उर्वरीत रक्कम भरण्यास प्रोत्साहीत करावे जेणेकरून त्यांना दिड लाख पर्यतची
कर्जमाफीचा लाभ देता येईल अशीही सुचना मुख्यमंत्र्यांनी दिली.

अहमदनगर : प्रतिनिधी
जलयुक्‍त शिवार अभियानाच्‍या माध्‍यमातून महाराष्‍ट्र शासनाने अतिशय उत्तम काम राज्‍यात केले आहे.  जनतेला पाण्‍याबाबतीत जलसाक्षर करण्‍याचे कामही कौतुकास्‍पद असून पडणारा पाऊस, पाण्‍याचे नियोजन, योग्‍य वापर, काटकसर,पीक पध्‍दतीचा अवलंब या बाबी महत्‍वाच्‍या असल्‍याचे सांगतानाच यातूनच अहमदनगर जिल्‍हा पाणीदार होण्‍यास मदत होईल असा विश्‍वास जलबिरादरी प्रकल्‍पाचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष डॉ. राजेंद्र सिंह यांनी आज येथे व्‍यक्‍त केला.
            जिल्‍हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जलसाक्षरता केंद्रातर्गत जलनायक, जलदूत यांच्‍या कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्‍हणून श्री सिंह बोलत होते. जिल्‍हाधिकारी अभय महाजन अध्‍यक्षस्‍थानी उपस्थित होते. यावेळी जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने, उपजिल्‍हाधिकारी वामन कदम, जिल्‍हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्‍य  कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्‍हे,  जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडीत लोणारे, कार्यकारी अभियता मोरे, यशदाचे आनंद कुशावळे, सुमंत पांडे, आदि उपस्थित होते.
             जलयुक्‍त शिवार अभियानाचे कौतुक करुन श्री सिंह म्‍हणाले राज्‍यात जलयुक्‍तचे उत्‍तम काम झाले  आहे.  नागरिकांना पाण्‍याबाबतीत साक्षर करण्‍याचे काम ही सुरु आहे. शाश्‍वत विकासासाठी या बाबी महत्‍वाच्‍या आहेत.  यातूनच राज्‍यासोबत अहमदनगर जिल्‍हाही  पाणीदार होईल पाण्‍याच्‍या बाबतीत  आपल्‍याला पडणारा पाऊस, योग्‍य वापर, पाण्‍याचा काटकसरीने वापर पाण्‍याच्‍या उपलब्‍धतेनुसार पीक पध्‍दती  या बाबी विचारात घ्‍याव्‍या लागतील. यामध्‍ये लोकसहभाग महत्‍वाचा ठरणार आहे. जिल्‍हयाला पाणीदार बनविण्‍यासाठी प्रत्‍येकाने आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन त्‍यांनी केले.
            राजस्‍थानमध्‍ये 11 हजार 800 छोटे बांध आम्‍ही बांधले आहेत.  त्‍यामुळे त्‍याबंधा-यात पाण्‍याची उपलब्‍धी आहे. गावातून  शहराकडे होणारे स्‍थलांतर थाबले आहे. व स्‍थलांतरीत झालेले कुटूंब पुन्‍हा गावात परतले आहेत. या कामामुळे सामान्‍य माणसाच्‍या चेह-यावर आनंद दिसतो आहे. वाहून जाणारे पाणी व माती अडविणे गरजचे असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
            जिल्‍हाधिकारी अभय महाजन म्‍हणाले, अहमदनगर जिल्‍हयात जलयुक्‍त शिवार अभियानाच्‍या माध्‍यमातून मोठयाप्रमाणात कामे झाली आहेत. यामध्‍ये लोकसहभाग महत्‍वाचा ठरला असून या कामामुळेच भूजल पातळीत वाढ झाली आहे. पाण्‍याची गरज, साठा, वापर या जबाबदारीमध्‍ये प्रत्‍येकाचे योग दान महत्‍वाचे ठरणार आहे. जिल्‍हा परिषदेच्‍या शाळेमधूनही पाण्‍याबाबतीत विद्यार्थ्‍याना मार्गदर्शन केले जाणार असल्‍याचे श्री महाजन यांनी यावेळी सांगितले.  यावेळी जिल्‍हयातील प्रत्‍येक तालुक्‍यातून आलेले जलदूत, जलनायक उपस्थित होते. आभार उपजिल्‍हाधिकारी वामन कदम यांनी मानले.

(आधी किस्सा सांगू की तत्वज्ञानी अक्कल पाजाळू, यावर द्वंद्व रंगल्याने आठवडाभरानंतर लिहितोय. शेवटी किस्सा मांडताना तत्वज्ञानी आव आणण्याचं मनानं पक्कं केलं अन् लिहायला बसलो. बाकी, वाचून सांगा की मी चुकलोय की मला भेटलेले 'महापुरूष')

ठिकाण : एका सहकारी संस्थेचे विश्रामगृह

काही कामानिमित्त पुणे जिल्ह्यातील एका तालुक्याच्या गावी जाण्याचा 'योग' आला. म्हटलं लॉजिंगला खर्च करण्यापेक्षा चांगली राहण्याची सोय पाहुयात. असं मनात आल्याने स्थानिक पत्रकार मित्राला फोन केला. तोही बाहेरगावी होता. पण त्यानचं एका सहकारी संस्थेच्या ऐसपैस विश्रामगृहात सोय केली. तीन दिवसांचं काम असल्यानं माझेही हजारेक रुपये राहण्यात गेलेच असते. पत्रकारिता सोडून समाजसेवेचा किडा डोक्यात ठेऊन भटकत असल्याने तसाही खिसा गारचं आहे. माझे कुटुंबही या निरुद्योगी हिंडफिरेपणाला सरावलेय. त्यांच्यादृष्टीने 'मुंज्या'च झालोय म्हणा. पण या विश्रामगृहातला किस्सा घडला अन् या बारागावच्या 'समाजसेवक मुंज्या'च्याही झिंज्याच तर्र झाल्या ना...

तर तत्वज्ञान ऐकविल्यावर आता किश्यावर येतो. दिवसभर तालुक्यात फिरून विश्रामगृहात सायंकाळी आठला एंट्री केली. रिसेप्शनवजा काउंटरवर कोणीच नव्हतं. पंधरा मिनिटं वाट पाहूनही कोणीच येईना म्हटल्यावर थोडी शोधाशोध सुरू केली. अखेर एका खोपच्यातल्या रुममध्ये एकजण भेटला. इथं पत्रकार मित्रानं रूम बुक केल्याचं त्याला सांगून नगरहून आल्याचं म्हटलं.

तर, यानं त्या मित्राच्या नावाच्या कोणालाही ओळखत नसल्याचं म्हटलं. आता आली का पंचाईत. मग केला मित्राला फोन. त्याला या इसमानं असं म्हटल्याचं सांगितल्यावर त्याच्यातला पत्रकारी इगो जागा होऊन त्याने माझा फोन त्याला द्यायला सांगितला. त्याने त्याला हे फैलावर घेऊन पक्की ओळख दिली. अन् माझं तीन दिवशीय मुक्कामाचं पक्कं झालं.

मित्रानं झापल्यानं त्यानं मग ५ नंबरची रूम देण्यासह जेवणाबद्दलही विचारणा केली. तो म्हणाला, 'साहेब, इथं कितीही जण येतात. कोणाचंही नाव सांगून रूम मागतात. त्यात तुमच्या साहेबांच्या आडनावाचे इथं तिघंजण आहेत. म्हणून माझीही गफलत झाली. सॉरी. काही लागलं तर हक्कानं सांगा...'

मीही 'गुड नाईट' म्हणून त्याचा निरोप घेतला अन् झालो विश्रामगृहाचा निवासी. पहिली रात्रं मस्तचं गेली. दुस-या दिवशी तालुकाभर फेरफटका मारून साडेआठला पोहचलो विश्रामगृहात. तिथं रूमला लॉक करण्याची सोय नसतेय. सगळाच मामला खुल्लमखुल्ला. आलो अन् कालच्या त्या कर्मचारी इसमाला नमस्कार करून पाच नंबरच्या रुमकडं आलो. पाहतो तर रूम आतमधून लॉक..!

आता झाली का पंचाईत. मी कडी वाजवून मोबाईलात खेळत बसलो. पाचेक मिनिटं गेली तरीही आतून काहीचं प्रतिसाद नाही. मग जिना उतरून खाली येऊन विचारलं, 'पाच नंबर आतून लॉक आहे. कोणाला दिलीय का?'

कर्मचारी म्हणाला, 'नाही ओ साहेब. तुमची रूम कशाला कोणाला देऊ? थांबा थोडं. कोणीतरी गेलं असेल बाथरूमला.'
हे ऐकून मीही पुन्हा वर येऊन रूमची कडी दोरात वाजवली. आतून प्रतिसाद शुन्य. म्हटलं असेल अजुनही टॉयलेटमध्ये. दोन नंबरला गेला असलं. असं म्हणून काही मित्रांना फोनवर पिळत बसलो. पंधरा मिनिटं झाली, मी पुन्हा जोरात कडी वाजवली. शेजारच्या रूममधलेही काहीजण आवाज ऐकून आले. त्यांनीही कडी वाजवली. आतून प्रतिसाद शुन्य. पंधरा मिनिटं वाट पाहून दुसरेही निघून गेले.

कडी वाजवणं, वाट पाहणं अन् मोबाईलात खेळणं यातच तासभर गेला. कर्मचारी बंधुनेही दोन-तीनदा कडी वाजवून ट्राय केला. आतून प्रतिसादच येत नव्हता. आता कर्मचारी अन् मीही मनातून जरा धास्तावलोच. माझी पिशवीही (बैग) आतच अडकली होती. आतला नेमका काय कामात गुंतलाय की...., असलं काहीबाही माझ्या अन् कर्मचारी मित्राच्या मनात यायला लागलं.

शेवटी कर्मचारीही वैतागून काहीतरी दुस-या कामाला गेला. जाताना म्हटला, ' तहसीलचे दोघे सरकारी अधिकारी आले होते. तेच घुसले असतील चुकून. पाहुयात. मी येतो खाली जाऊन...'

आता मी एकटाच पाच-पाच मिनिटांना दरवाजाची कडी न् दरवाजा ठोकत बसलो. तर, या रूमऐवजी हा गोंधळ ऐकून चार नंबरच्या रुममधून आले एक 'तराटराव' बाहेर. कावलेले होते. म्हणाले, 'आहो, काही समजतयं का तुम्हाला? माझी झोपमोड झाली की. कशाला आवाज करताय? येईल की तो आतला बाहेर थोडं थांबा...'

मी म्हटलं, 'सॉरी, साहेब. पण दीडेक तास झाला हो. माझी बैगही आहे आत. ती घेऊन बाहेर लॉजिंगला जावं म्हंतोय. पण आतून उत्तरचं येईना...'

मग ते 'साहेब' म्हणाले, 'थांबा की थोडं. माझ्याबरोबरचेच आहेत. आम्ही क्लास टू अधिकारी आहोत. जरा तरी भान ठेवा. काय लुंगे-सुंगे समजले काय आम्हाला. लोकांत मैनर्स नावाची चीजच उरली नाही हल्ली... मी फोन लावतो. लगीच उघडतील...'

हे ऐकून मलाही हायसं वाटलं. त्यांनी फोन लावल्यावर मिनिटभरात दरवाजाही उघडला. इतका वेळ मनात काहीबाही विचार येत होते. पण आता बरं वाटलं. आत घुसलो तर, साहेबांचा टाय-सूट व अमेरिकन टुरिस्टर बैग गादीवर पडलेले अन् दुस-या गादीवर साहेब.

मी म्हटलं, 'माफ करा. तुमची झोपमोड झालीय. मी कालपासून इथं राहतेय. हरकत नाही. तुमची हरकत नसेल तर आज राहुयात की आपण दोघंही. तेव्हढ्याच गप्पाही होतील...'

साहेब म्हणाले, 'कसल्या गप्पा करताय? आम्हाला कामं असतात. तुम्ही दुसरी रूम शोधा बरं. माझ्या अधिकारी मित्राबरोबरही मी नाही राहत. तुम्ही तर बिगर ओळखीचे. शोधा दुसरी रूम...'

आता झाली का पंचाईत..!
मी गपगुमानं माझी बैग भरली अन् बाहेर आलो. अन् काहीतरी विसरल्याची आठवण आल्यानं साहेबांना म्हटलं, 'सॉरी, माझी साबणं राहिलीय आत. तेव्हढी घेतो...'
साहेब म्हणाले, 'घ्या की. तुमचीच रूम आहे. पण कितीदा कडी वाजवायची याचं जरा गणित ठेवतं जा...'
त्यांच्या तोंडातून येणारा जोरदार भपका, लालावलेले डोळे व साहेबी थाट पाहून मीही मग काहीचं न बोलता बाहेर निघून आलो. चार नंबर रुमवालेही बाहेरचं होते. मला 'गुड नाईट' म्हणून तेही आत गेले.

माझा रागाचा पारा चढल्याने मीही जिना उतरून खाली आलो. तर, विश्रामगृहाचा कर्मचारी आत येत होता. तो म्हणाला, 'साहेब, जाऊ द्या. त्यांचं नेहमीचचं आहे. मोठे अधिकारी आहेत ते. तुम्हाला देतो दुसरी रूम...'
असं म्हणून माझी बैग घेऊन त्यानं दहा नंबरच्या रुममध्ये केली माझी सोय. पाणी बॉटल देऊन हा कर्मचारी 'शुभ रात्री' म्हणून गेला निघून. अन् मीही रूममधल्या गादीवर बसून विचारांत गढून लागलो मोबाईलवर व्हाटसऐप व फेसबुक खेळतं...

(संपली आमची गोष्ट न् बाबुर्डी पोष्ट...)

निवडणुका आल्या की अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाची हवा तापविली जाते. असे अनेकदा झाले आहे, आणि भविष्यातही हीच घोषणा कितीवेळा केली जाणार, असाच प्रश्न सामान्य नगरकरांना असतो. आताही पालकमंत्री राम शिंदे यांनी कोपरगावच्या कोकमठाण गावात जिल्हा विभाजनावर भाष्य केले आहे. तर, ज्येष्ठ श्रेष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबद्दलही राज्य सरकार 'सिरियस' असल्याचं म्हटलं आहे. मात्र, ही राजकीय पुडी आहे की, खरेच नगरकरांचे हे स्वप्न सत्यात उतरणार अशीच साशंकता कायम आहे. त्यामुळेच पालकमंत्र्यांसारख्या जबाबदार पदावरील व्यक्तीने ही घोषणा केल्यानंतरही सामान्य नगरकर शांत आहेत. मात्र, नगर दक्षिण जिल्ह्याच्या विकासासाठी हा निर्णय खूप महत्वाचा आहे.

पाच वर्षांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री बबनराव पाचपुते आणि कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विनायकराव देशमुख यांनी अशाच पद्धतीने नगर जिल्ह्याच्या विभाजनाची ‘चळवळ’ हाती घेतली होती. आता नाही तर कधीच नाही अशा थाटात यावर बैठका आणि चर्चासत्रांना उत आला होता. नगर शहरासह दक्षिण जिल्ह्यातील तालुक्यांच्या युवकांसह काही ज्येष्ठ राजकीय नेत्यांनीही यासाठी झोकून देऊन कामाला सुरुवात केली होती. मात्र, निवडणुका येऊनही या मुद्यावर अपेक्षित राजकीय वातावरण निर्मिती होऊ शकली नाही. तसेच उत्तर नगर जिल्ह्यातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांनी हा प्रश्नच नसल्याचे आपली कृतीतून दाखवून दिले. परिणामी दक्षिण नगर जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या हजारो राजकीय नेत्यांनी यावर ‘ठोस’ भूमिका घेऊनही या वातावरणनिर्मितीची हवा झटक्यात विरली. मग लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही प्रस्थापित पक्षाविरोधातील वातावरणात जिल्हा विभाजानासारखे प्रश्न निकाली निघून केंद्र आणि राज्यात सत्तांतर झाले. याच विरोधी लाटेवर स्वार होण्याच्या नादात माजी मंत्री पाचपुते यांची आमदारकी हाताची गेली. तर, राज्याच्या राजकारणात त्यावेळी विस्थापित असलेले भाजपा आणि शिवसेना या चार वर्षांत प्रस्थापित बनले. अशा राजकीय टप्प्यावर सगळ्यांनाच जिल्हा विभाजनाच्या मुद्याचा विसर पडला होता. मात्र, पालकमंत्री शिंदे यांनी या मुद्यावर बोलून पुन्हा एकदा या राजकीय विषयाला पटलावर आणले आहे. मात्र, इतके सगळे यापूर्वीच झाल्याने आता या मुद्यावर अजूनही कोणीच सिरीयस नसल्याचे दिसते.

वेगळा विदर्भ असो की महाराष्ट्र एक ठेवण्याची घोषणा असो, किंवा एखाद्या जिल्ह्याचे विभाजन असो. या सगळ्याच मुद्यावर चर्चा करताना राजकीय भावना आणि कुरघोडीचा डाव या एकाच चष्म्याने पाहण्याची आपल्याला सवय आहे. अशावेळी मग विदर्भाच्या प्रश्नावर विदर्भावासीय बोलण्याऐवजी मुंबईत बसून राज्यशकट हाकणारेच बोलतात आणि मूळ मुद्दा मागे पडून तोड-फोड भाषेला महत्व येते. त्याच पद्धतीने नगर जिल्ह्याच्या विभाजानावरही सामान्य नगरकरांच्या भावनेला बासनात गुंडाळले जात आहे. उत्तर जिल्हा सर्वच बाजूने संपन्न असताना दक्षिणेत विकासाची वानवा जाणवते. उत्तरेतील तालुक्यांत ७० टक्के साधन भाग आणि ३० टक्के कोरडवाहू भाग आहे. तर, दक्षिणेत याच्या नेमके उलटे चित्र आहे. त्यामुळेच जिल्ह्याच्या विकासाची सरासरी जास्त असतानाही दक्षिण भागातील आर्थिक अरीष्ट्य संपण्याचे नाव घेत नाही. महाराष्ट्रात जसा विदर्भाच्या विकासाचा अनुशेष बाकी आहे. तसाच नगर जिल्ह्यातही दक्षिण भागातील तालुक्यांत विकासाचा मोठा अनुशेष आहे. राज्यातून जिल्हानिहाय निधी देताना मग उत्तर भागातील साधन तालुक्यांमुळे निधी कमी मिळतो. त्यातही आलेला निधी उत्तर भागात पळविण्याची घटक परंपरा कायम आहे. परिणामी दक्षिण भागाच्या विकासाचा दुष्काळ कायम आहे. मात्र, या मुद्याकडे लक्ष देऊन जिल्हा विभाजनाच्या मुद्यावर चर्चा होण्याऐवजी राजकीय अंगाने याकडे पहिले जात आहे. तोच चष्मा यंदा गळून पडून सामन्याच्या विकासाच्या अंगाने साधक-बाधक चर्चा होऊन नगर जिल्ह्याचे विभाजन होणे गरजेचे आहे.

मुख्यालयाचा मुद्दाच गौण

नगर जिल्ह्याचे विभाजन झाल्यास उत्तर भागाच्या जिल्ह्याचे मुख्यालय कोणते असेल, यावरून वाद करण्याची आपली परंपरा आहे. उत्तरेत श्रीरामपूर, कोपरगाव, शिर्डी आणि संगमनेर यांच्यापैकी कोणाला मुख्यालयाचा मान द्यावा यावरून चर्चा रंगताना सामान्य नगरकरांच्या भावनेचा अवनाम होत असल्याचे कोणालाही सोयरसुतक उरलेले नाही. मुख्यालय कोणते असावे, यापेक्षा सामन्यांचे प्रश्न किती आणि कशा पद्धतीने सुटतील, यावर खरी चर्चा अपेक्षित आहे. आताही उत्तर भागातील राजकीय अतिक्रमण सहन करण्याची सवय दक्षिणेतील जनता आणि नेत्यांना झाली आहे. ‘लोकसभेसाठी उत्तरेतील आमक्या नेत्याची दक्षिणेत मोर्चेबांधणी’ अशा आशयाच्या बातम्यांचा पाउस त्यामुळेच पडतो. दक्षिण भाग सामाजिक व आर्थिक दृष्टीने अविकसित असतानाच राजकीय अर्थकारणातही मागे असल्याचेच हे द्योतक म्हणावे लागेल. अशा या अन्यायग्रस्त भागाला न्याय देण्यासाठी दक्षिण आणि उत्तर अशी विभागणी गरजेची आहे. त्यात उत्तरेत कोणत्या ठिकाणी मुख्यालय होते, याला सामान्य नगरकरांच्या दृष्टीने काडीचेही महत्व नाही. वरच्या चार शहरांपैकी एका ठिकाणी मुख्यालय होऊन हा प्रश्न एकदाचा निकाली निघावा अशीच नगरकरांची भावना आहे.

अकोल्यातील सामान्य नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयाचा हेलपाटा म्हणजे मोठी शिक्षा वाटत असेल. कारण, सुमारे शंभर किलोमीटर प्रवास करून आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी त्यांना नगर शहरात यावे लागते. यासाठी जाणारा वेळ आणि होणारी आर्थिक पिळवणूक ध्यानात घेऊन जवळच जिल्हाधिकारी कार्यालय असावे अशीच भावना अकोलेकरांसह कोपरगाव तालुक्याची आहे. मात्र, श्रीरामपूर आणि संगमनेर यांच्या भांडणात हा तिढा कायम आहे. अशावेळी सर्वांचे लाडके धार्मिक ठिकाण असलेल्या शिर्डीला मुख्यालय करून हा प्रश्न सोडविण्याची व्यावहारिकता राज्य सरकारने दाखविण्याची गरज आहे. या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्थळाचा हाच खर्या अर्थाने मोठा कौतुकसोहळा ठरेल.


पालकमंत्री शिंदे यांनी जिल्हा विभाजनाच्या या महत्वाच्या मुद्याला हात घातला आहे. त्यांच्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघासह श्रीगोंदा, नगर, पारनेर, पाथर्डी, शेवगाव या कोरडवाहू भागाच्या आर्थिक उन्नतीसाठी हा निर्णय होणे आवश्यक आहे. येथील शेतकरी आणि कष्टकरी बांधवांच्या भावनेचा विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तर, हा निर्णय तातडीने होण्यासाठी पालकमंत्री शिंदे यांनी आपली राजकीय ताकद पणाला लावावी, अशी सामान्य नगरकरांची भावना आहे. मात्र, आताही भाजपच्या राज्यात पालकमंत्री शिंदे यांची ताकद चालते की उत्तर नगर जिल्ह्यातील नेत्यांचाच राज्यातील राजकारणावर वरचष्मा कायम आहे. हेच यातून अधोरेखित होणार आहे.

मुंबई : प्रतिनिधी
कांदा उत्पादक शेतक-यांकडील कांदा संपल्यानंतर निर्यातमूल्य हटविण्याचा निर्णय घेऊन व्यापा-यांप्रती आपली कर्तव्यदक्षता पुन्हा एकदा भाजपाने सिद्ध केली आहे. आता व्यापारीप्रेमाने झालेल्या याच भाववाढीता थेट फटका भाजपाप्रेमी मध्यमवर्गीय भक्तांना सहन करावा लागणार आहे.

रांगडा कांदा आता शेतकरी बांधवांकडून व्यापारी 'मित्रों'च्या वखारीत स्थिरावला आहे. त्याचाच थेट लाभ उठविण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने निर्यातमूल्य हटवून शेटजींचा पक्ष म्हणून मान्यता पक्की केली आहे. यावर शेतकरी नेते गिरधर पाटील यांनी सोशल मिडियावर बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणतात की, आता शेतकऱ्यांकडचा उन्हाळी कांदा संपलाय. व्यापाऱ्यांनी स्वस्तात घेतलेल्या कांद्याला निर्यातीत चांगला नफा मिळेल. मात्र उन्हाळी कांदा बाजारात येऊ लागताच भाव पाडण्यासाठी नव्या क्लुप्त्या शोधल्या जातील. कांद्याचे सारे निर्णय दिल्लीत देवाण घेवाणीत होतात, ते आपल्या शेतकऱ्यांना कळत नाहीत. कांद्याचे निर्यात मूल्य हटवायचेच होते तर शेतकऱ्यांकडे कांदा असतांना का हटवले नाही याचे उत्तर यात आहे.

अशा पद्धतीने या अभ्यासपूर्ण नेत्याने सरकारी अर्थपूर्ण निर्णयावर नेमके बोट ठेवले आहे. अशाच पद्धतीच्या प्रतिक्रिया शेतकरी संघटनेच्या नेत्यांनीही व्यक्त केल्या आहेत.

धुळे : प्रतिनिधी
भुसंपादनात झालेला अन्याय दूर करण्याऐवजी सरकार दरबारी झालेल्या हेटाळणीमुळे धुळ्यातील धर्मा पाटील यांनी अखेर आत्महत्या केली. असाच अन्याय झाल्याचे आणखी एक प्रकरण पुढे आले आहे. सुरत-नागपूर महामार्गासाठी शहराबाहेरून गेलेल्या रस्त्यासाठी हा 'उद्योग' करून राजकीय नेते व प्रशासकीय अधिकारी आणि त्यांचे नातेवाईक मालामाल झाल्याचा आरोप होत आहे.

धुळ्यात आणखी एक मोठा भूसंपादन घोटाळा झाला आहे. सुरत-नागपूर महामार्ग हा शहऱापासून बाहेर काढण्याच्या आराखड्याची ज्यांनी आखणी केली त्यांनी मोहाडी व परिसरातील शेतकऱ्यांच्या जमीनी काहींनी कवडीमोल भावात खरेदी केल्या. या जमिनी खरेदी करून त्या बिनशेती करून त्यात प्लॉटही पाडण्यात आले. त्यानंतर हा आराखडा जाहीर झाला व आपण फसवले गेल्याचे शेतकऱ्याच्या लक्षात आले. या घोटाळ्यात अनेक महसूल अधिकारी, सार्वजनिक बांधकाम अधिकारी व खुद्द नॅशनल हायवेचे तांत्रिक अधिकारी ज्यांनी हा आराखडा तयार केला त्यांची पत्नी याची नावे उघड होऊनही सरकार काही करावयास तयार नाही, असा आरोप होत आहे.

धुळ्यातील प्रदीप पाटील, अतुलअजमेरा व भूपेंद्र परमार या प्रकरणाचा पाठपुरावा करीत असून शासनातर्फे काहीच सहकार्य होत नसल्याचे दिसते आहे. शेतकऱ्यांना या विकास प्रक्लपातील वाढीव किंमतीचा फायदा होण्यासाठी त्या भागातील सर्व जमीनींच्या खरेदी विक्रीची चौकशी होणे आवश्यक आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget