DNA Live24 2015

किफायतशीर शेळीपालन तंत्रज्ञान (भाग 4)


किफायतशीर शेळीपालनासाठी उपाय :
- शेळीपालन करण्यापूर्वी या व्यवसायाची संपूर्ण काटेकोर माहिती कृषी विद्यापीठे, पशुवैद्यकीय महाविद्यालये, शेळी-मेंढी विकास महामंडळे अशा शासकीय संस्थांकडूनच करून घ्यावी.
- शेळ्यांच्या विविध जाती उपलब्ध असल्या तरी सर्व जाती ज्या त्या वातावरणात चांगल्या वाढतात. त्यामुळे नवीन जातींच्या नावाखाली वारेमाप पैसे खर्च करून नवीन जाती न आणता महाराष्ट्रात प्रभागनिहाय शिफारस केलेल्या जातींच्या शेळ्यांचेच संगोपन करावे.
1. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा : उस्मानाबादी
2. नगर, पुणे, नाशिक : संगमनेरी
3. विदर्भ : बेरारी
4. कोकण : कोकण कण्याळ

- शेळी 70 ते 80 टक्के भूक झाडपाला खाऊनच भागवतो. त्यासाठी शेताच्या कडेला, बांधावर दुहेरी उद्देशाच्या, उदा. शेवगा. हादगा, लिंब, बाभूळ, शेवरी, सुबाभूळ, बकान, हिरडा, बेहडा, वड, पिंपळ, उंबर अशा झाडांची लागवड करावी व चार्यावरचा खर्च कमी करावा.
- शेतातून मिळणारे दुय्यम पदार्थ, उदा. हरभरा, तूर, सोयाबीन यांचा भुसा, गहू, मका, भात, कडबा, ताटांचा वापर कोरडा चारा म्हणून करावा.
- शेळ्यांची खरेदी बाजारातून न करता शेतकर्यांकडून करावी. खरेदीपूर्वी अंत्रविषार, पीपीआर या आजारावर शेळ्यांचे प्रतिबंधक लसीकरण झाले असल्याची खात्री करून घ्यावी. शक्यतो जुळे, तीळे करडे देणार्या शेळ्यांचीच निवड करावी.
- शासनाच्या योजनांतून शेळ्या खरेदी करताना आपल्या भागातील शेळ्यांचीच खरेदी करावी.
- गोठा बांधण्यावर वारेमाप खर्च न करता गोठ्यात गव्हाणीचा वापर प्राधान्याने करावा.
- शेळ्यांना खुराक देण्यासाठी घरगुती धान्य, गहू, मका यांचा जास्त वापर करावा.
- शेळ्यांचे वेळेवर लसीकरण करावे. वर्षातून चार वेळा जंत निर्मूलन, गोचीड, पिसवा या बाह्य कृमींचा बंदोबस्त पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने करण्याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे.
- शेळीपालन व्यवसायात नव्यानेच पदार्पण करत असाल तर एकदम 100-200 शेळ्यांचा प्रकल्प न करता 20 शेळ्यास 1 नर अशा छोट्या युनिटपासून  सुरवात करावी.
- करडाची विक्री पैदाशीसाठी नर, ईदसाठी नर, गाभणपाठी विक्री व सर्वात शेवटी स्थानिक बाजारपेठेत विक्री अशा विविध टप्प्यांत करावी.
- शेळीपालनातून अधिक नफा मिळविण्यासाठी मूल्यवर्धित पदार्थांची निर्मिती करावी. उदा. लेंडीखत, गांडूळखत, शेळीचे दूध व दुग्ध पदार्थ यासाठी प्रचार प्रसार करून बाजारपेठ तयार करावी.
- शेळीपालन स्वबळावर करण्याचा प्रयत्न करावा. बँक लोन करणे शक्यतो टोळावे, म्हणजे नफ्याचे प्रमाण वाढेल.
- शासनाची सबसिडी मिळवून व्यवसाय करणार असाल तर जातिवंत जनावरे खरेदी करण्यावर भर द्यावा.
- व्यवसायातील नफा वाढविण्यासाठी नवीन जाहिरात तंत्रांचा अवलंब करावा. शक्य असल्यास मटण विक्री स्वतःच करावी.

*
लेखक
डॉ. संजय मंडकमाले,
वरिष्ठ शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वीत संगमनेरी शेळी संशोधन प्रकल्प,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर. फोन : 02426 243455

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget