DNA Live24 2015

यशकथा : शेततळ्याच्या पाण्यावर… समृद्धीच्या मार्गावर..!

हरणखेड येथील शेतकरी किरण चोपडे यांनी शेततळ्याच्या पाण्यावर शेडनेटमध्ये शिमला मिरची शेती केली आहे. भर उन्हाळ्यातही त्यांच्या शेततळ्यात पाणी आहे. 40 फूट खोल असलेल्या शेततळ्यात सध्या 18 फूट पाणी आहे. सन 2016-17 मध्ये फळबाग मिशन अंतर्गत त्यांनी शेतात शेततळे घेतले आणि पावसाच्या खंड काळात, रब्बी हंगामात पिकांना पाणी देण्याची त्यांची चिंता मिटली. शेततळ्यामध्ये अस्तरीकरण केले. अस्तरीकरणामुळे साठलेल्या प्रत्येक पाण्याचा थेंबन् थेंब उपयोगात आणता येणे शक्य आहे. शेततळ्याची लांबी व रूंदी 52 बाय 42 आहे. त्यांना या शेततळ्यापोटी अनुदानाची 3.25 लक्ष रक्कम मिळाली आहे. शेततळे घेतल्यानंतर लगेच शेड नेटसाठी अर्ज केला. मलकापूर तालुका कृषि अधिकारी कार्यालयातून अर्ज संमत झाल्याचे व शेडनेट मिळाल्याचे कळाले. आनंद झाला आणि आधुनिक शेती करण्यासाठी त्यांची पावले आणखी सरसावली. शिक्षणाने कृषि व दुग्धव्यवसायातील पदविका मिळविल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता.. आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे किरण चोपडे यांनी ठरविले. कुटुंबियांच्या 7 एकर शेतीवर न थांबता त्यांनी 14 एकर शेती ठोका पद्धतीने केली.

या संपूर्ण 21 एकर शेतीवर आज ठिबक सिंचन पद्धतीने सिंचनाची व्यवस्था केली आहे. संपूर्ण शेतात ठिबकच्या नळ्यांचे अंथरण आहे. पाऊस लांबल्यानंतर किंवा खंड पडल्यानंतर पिकांना सिंचन देऊन त्यांचे संरक्षण कसे करायचे हा मोठा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर असायचा. शेतातील निंबू, सिताफळ यांच्यासह कापूस व तूर पिकाला कसे तारायचे या चिंतेने त्यांना ग्रासलेले असायचे. मात्र शेततळ्याने त्यांचे संपूर्ण प्रश्न मार्गी लावले आहे. शेततळ्यातील पाण्यावर पावसाच्या खंड काळात कापूस व तूर पिकाला त्यांनी सिंचन दिले. तसेच निंबू फळपिकाला पाणी देऊन दमदार उत्पादन त्यांनी घेतले. निंबाची 125 झाडे त्यांनी अडीच एकर क्षेत्रावर लावली आहेत. ही झाडे या भर उन्हाळ्यातही टवटवीत आहेत. कारण शेततळ्याच्या पाण्यावर त्यांना सिंचन मिळत आहे.

त्याचप्रमाणे बांधावर लावलेली सिताफळाची झाडेही याच पाण्यामुळे वाचली आहेत. मान्सूनपूर्व कापूस व तूर पिकालाही शेततळ्यातील पाण्यामुळे शाश्वत सिंचन मिळत आहे. तूरीचे उत्पादन त्यांना एकरी 7 क्विंटल मिळाले आहे. ते केवळ या शेततळ्यामुळे मिळाले असल्याचे किरण चोपडे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे कापसाचे एकरी 10 ते 11 क्विंटल उत्पादन या अवर्षण परिस्थितीतही त्यांना घेता आले तेही केवळ या शेततळ्याच्या पाण्यावरच. केवळ पारंपारिक पिकांना शाश्वत सिंचन म्हणून त्यांनी शेततळ्याकडे पाहिले नाही, तर शेडनेटची व्यवस्थाही केली. सध्या अर्धा एकर शेत व्यापणारे शेडनेट त्यांच्याकडे आहे. त्यामध्ये शिमला मिरचीचे उत्पादन ते घेत आहे. बेड पद्धतीने शिमला मिरची त्यांनी लावली आहे. या मिरचीला ठिबक सिंचन केले आहे. तसेच शेततळ्यातील पाण्यावर संरक्षित सिंचन आहेच.

केवळ शेती परवडत नाही.. म्हणत बसण्यापेक्षा काहीतरी बदल करीत शेती केल्याशिवाय पर्याय नाही. हे किरण चोपडे यांना कळाले. त्यांनी शेततळे घेतले आणि ते शक्य करून दाखविले. त्यांनी शेतीसोबतच जोडधंदा असलेल्या दुग्धव्यवसायाचाही आधार घेतला आहे. त्यांच्याकडे गीर जातीच्या 4 गावरान गायी आहेत. या गायींवर त्यांच्या कुटंबाचा दुधाची गरज भागते. तसेच शेतात शेणखत, फवारणीसाठी गोमूत्र मिळते, असा दुहेरी उपयोग ते गोपालनातून करीत असतात. या कामी त्यांना त्यांची आई श्रीमती शोभाबाई भानुदास चोपडे, भाऊ संदीप चोपडे व दिनेश चोपडे यांची सार्थ मिळते. त्यामुळे हरणखेडसारख्या अवर्षणग्रस्त परिसरामध्ये शेततळ्याच्या पाण्यावर शाश्वत व संरक्षित सिंचनाची सुविधा किरण चोपडे यांनी करून दाखविली आहे. तसेच तालुका कृषि अधिकारी श्री.पवार व त्यांची चमू त्यांच्या नेहमी मार्गदर्शनासाठी सज्ज असतात. या सर्वांचा परिपाक म्हणजे त्यांची समृद्धीच्या मार्गावर असलेली शेती. त्यांच्या या कामामुळे परीसरात त्यांचा आदर्श निर्माण झाला आहे. एवढे मात्र नक्की…!

- निलेश तायडे,
माहिती सहायक, जिमाका, बुलडाणा
@'महान्यूज'

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget