DNA Live24 2015

जन आरोग्य योजनेंतर्गत दीड लाख रूपयापर्यंतची मोफत आरोग्य सेवा

सांगली :
महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत दीड लाख रूपयापर्यंतची मोफत आरोग्य सेवा रूग्णांना दिली जाते. आयुष्यमान भारत आरोग्य अभियान योजनेंतर्गत 5 लाख रूपये पर्यंतची मोफत आरोग्य सेवा दिली जाते. या योजनांचा गरजूंनी लाभ घ्यावा. या योजना तळागाळापर्यंत पोहचवून आरोग्य सेवा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य, परिवहन, कामगार व राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री विजय देशमुख यांनी केले.

आष्टा येथे आयुष्यमान भारत आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कृषि व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशीकांत पाटील, माजी आमदार भगवानराव साळुंखे, आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. पी. पी. धारूरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे आदी उपस्थित होते. 

श्री. देशमुख म्हणाले, आरोग्य विषयक विविध योजनांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारच्या आरोग्य सेवा देऊ. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधूनही गंभीर शस्त्रक्रियेसाठी मदत देण्यात येत आहे. रूग्णांना गरज असेल तेथे मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. बांधकाम क्षेत्रातील कामगारांनी आपले नाव कामगार आयुक्त कार्यालयाकडे नोंदवावे. नोंदणीकृत कामगारांना औजारे खरेदीसाठी 5 हजार रूपये देण्यात येतात. कामगार विभागाकडील योजनांचा कामगारांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, समाज सदृढ, निरोगी राहावा ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून आयुष्यमान भारत आरोग्य अभियान गावपातळीपर्यंत राबविण्यात येईल. सर्वसामान्य माणसाला रूग्णालयांमध्ये खर्चिक शस्त्रक्रिया करणे अवघड जाते. सर्वसामान्य माणसांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आयुष्यमान भारत आरोग्य अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता विभाग सुरू केला आहे. आतापर्यंत गोरगरीब लोकांना मोठी मदत मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधीमधून दिली आहे. ज्या मोठ्या शस्त्रक्रिया महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत बसत नाहीत त्यासाठी मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता कक्षामार्फत निधी उपलब्ध करून दिला जातो. 

यावेळी सहाय्यक आयुक्त कामगार कार्यालयातर्फे नोंदणीकृत कामगारांना बांधकाम हत्यारे खरेदी योजनेंतर्गत 224 कामगारांना प्रत्येकी 5 हजार रूपये प्रमाणे एकूण 11 लाख 20 हजार रूपयांचा धनादेश प्रातिनिधीक स्वरूपात कामगार राज्यमंत्री विजय देशमुख यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला. 

यावेळी इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशीकांत पाटील, माजी आमदार भगवानराव साळुंखे व वैभव शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना आरोग्य योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. 

या आरोग्य शिबीरामध्ये आष्टा नगरपालिका मलेरिया विभाग, सेवासदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चंदनवाडी, मिरज, ग्रामीण रूग्णालय आष्टा, विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान बामणोली लिंक वर्कर स्किम, प्रगती हॉस्पीटल सांगली, कुल्लोळी हॉस्पीटल सांगली, प्रकाश मेमोरियल क्लिनीक, जिल्हा हिवताप कार्यालय, आदित्य आर्थी व जनरल हॉस्पीटल आष्टा आदीमार्फत रूग्णांची विविध आजारांबाबत तपासणी करण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक विरोधी पक्ष नेता नगरसेवक वीर कुदळे यांनी केले. सूत्रसंचलन माजी नगरसेवक अमोल पडळकर यांनी केले.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget