DNA Live24 2015

Blog | आणि मी पत्रकार बनलो....

शालेय शिक्षण घेत असताना जडलेली वाचनाची आवड एक दिवस मला पत्रकारितेकडे घेऊन जाईल, असे कधीच वाटले नव्हते. चौथ्या इयत्तेपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत घेतले. त्यानंतर पाचवीच्या वर्गात लाकडी बेंचवर बसायला मिळणार म्हणून मी गावातीलच पंडिल जवाहरलाल नेहरु माध्यमिक विद्यालयात नाव घालण्यासाठी वडिलांच्या मागे लागलो. वर्गशिक्षक व मुख्याध्यापक शाळा सोडल्याचा दाखला सहजासहजी देत नव्हते. शेवटी मीच तगादा लावून दाखला मिळवला. एकदाचा हायस्कूलमध्ये दाखल झालो. बेंचवर बसल्यावर आकाश ठेंगणे वाटण्याचा प्रकार काय असतो, याची अनुभुती घेतली. प्राथमिक शिक्षण घेईपर्यंत शाळा सुटल्यावर खेळण्यात कुदण्यात सगळा वेळ जात असल्याने वाचन वगैरे काय माहित नव्हते. मात्र, पाचवीत गेल्यावर वाचनाची गोडी लागली. त्याला कारणीभूत ठरले लोकमत वृत्तपत्रासोबत त्यावेळी प्रकाशित होणारे कॅामिक्स.

शेजारी राहणाऱ्या नवल काकांकडे तेव्हा लोकमत पेपर येत असे. टीव्ही आणि त्यावरील कार्टुन शो सारखा प्रकार तेव्हा गावीही नव्हता. लोकमत कॅामिक्समुळे भन्नाट व सचित्र कथा वाचून तृप्त होऊन जायचो. शाळेत जाण्यास थोडा अवधी असल्यास कॅामिक्स वाचता वाचता सोबतच्या लोकमत पेपरवर थोडीफार नजर मारायचो. गावोगावच्या घटना, घडामोडी व समस्या याबाबतचे वृत्त लोकमतमध्ये सातत्याने वाचण्यात येत होते. त्याकाळी आतासारखा नदी व पर्वतांच्या नावाने स्वतंत्र आवृत्ती प्रकाशित करण्याचा पायंडा नव्हता. त्यामुळे संपर्ण जिल्ह्याची इत्यंभूत माहिती दररोज मिळायची. दिवसामागून दिवस जात होते, माझी वृत्तपत्र वाचनाची भूक वाढतच होती. वेळी- अवेळी केव्हाही पेपर वाचण्यासाठी येतो म्हूणून बऱ्याचवेळा नवलकाका रागावत. मात्र, माझ्या वागण्यात तसूभरही फरक पडत नसे.

लोकमत पेपर वाचत असताना त्यात आपल्या ममुराबादचे एक दिवस पण नाव येत नाही, याची खंत मनोमन वाटायची. पण सांगणार कोणाला ? पेपरात नाव छापून येण्यासाठी गावात वार्ताहर असावा लागतो, हे दहावीची परिक्षा उत्तीर्ण होऊन अकरावीच्या वर्गात प्रवेश घेतला तेव्हा कळले. दरम्यानच्या काळात डी.एड होऊन नुकताच शिक्षकी पेशा पत्करलेल्या वासुदेव पाटील या चुलत भावाजवळ वार्ताहर होण्यासाठी काय करावे लागते, याबाबतीत चर्चा केली. मास्तर भावाने त्यावेळी चौकशी करुन सांगतो, असे वेळ मारून नेली. गावाचे नाव पेपरमध्ये येत नाही म्हणून खंत कायम ठेवून मी महाविद्यालयीन शिक्षण घेत राहिलो. साधारण 1993 साल असेल. चुलत भावाने मला वार्ताहर होण्यासाठी थेट संपादकांना भेटण्याचा सल्ला दिला. कोणताच परिचय नसताना थेट संपादकांना भेटणे म्हणजे राष्ट्रपतिंना भेटण्यासारखे होते. परंतु, भावाने तेव्हा तारखेड्याचे कोण गुरुजी होते, त्यांचा संदर्भ देऊन मला संपादकांना भेटण्याचा धीर दिला.

त्यावेळी लोकमतचे संपादक धों.ज. गुरव सर होते. मी मोठ्या धाडसाने लोकमतच्या अजिंठा रस्त्यावरील मुख्य कार्यालयात पोचलो. गुरव सरांना तारखेड्याच्या गुरुजींचा संदर्भ दिला. ममुराबाद गावासाठी वार्ताहर म्हणून काम करण्याची माझी इच्छा बोलून दाखवली. त्यांनीही फार आढेवेढे न घेता शिक्षण वगैरे विचारून लगेच अर्ज करायला सांगितला. मी तयारीने गेलो नव्हतो. त्यामुळे उद्या अर्ज आणून देतो, असे सांगून घरी उड्या मारतच परतलो.

घरी आल्यावर आई- वडिलांना सर्व प्रकार सांगितला. मी आता वार्ताहर म्हणजे पत्रकार होणार, असे मोठ्या फुशारक्या मारत सांगितले. मात्र, माझे शब्द कानावर पडताच वडिलांनी विरोधाची सरबत्ती सुरु केली. कशाला रिकामे काम करतोय, गुपचुप शिक्षण घे, बातम्या दिल्यावर गावातील लोक तुझ्यावर डोळा ठेवतील, अशी बरीच कारणे देऊन त्यांनी माझी समजूत काढण्याचा प्रयत्न केला....संपले सगळे म्हणत मी सुद्धा वडिलांचा आदर राखत वार्ताहर होण्याचा विचार बाजुला ठेवण्याचा निर्णय घेतला. आणखी एक चुलतभाऊ धनंजयला सर्व विषय समजला. त्याने एक आयडीया सुचवली. वार्ताहर पदासाठी मी अर्ज करतो, तू बातम्या वगैरे लिहिण्यासाठी मला मदत करत जा. त्यामुळे तुझी लिखाणाची हौस पण भागेल, असे सांगून त्याने माझी मनधरणी केली. मग काय तेव्हापासून नवा अध्याय सुरु झाला. ममुराबाद गावाचे नाव अधुनमधुन छापून यायला लागले. धनंजयचे नाव असले तरी बातम्या लिहिण्यापासून त्या लोकमत कार्यालयात पोचविण्यासाठी मी मेहनत घेऊ लागलो. ममुराबादपासून लोकमत कार्यालय किमान 10 किलोमीटर होते. तेवढे अंतर सायकलीने कापायचो. बातम्यांचा धडाका लागल्यावर गावात चर्चा होऊ लागली. कोण हा वार्ताहर म्हणून लोक विचारणा करु लागले. दरम्यानच्या काळात धनंजय व्यवसायाच्या निमित्ताने शेंदुर्णी येथे स्थायिक झाला. घरी माझ्या पत्रकारितेबद्दल असलेला वडिलांचा विरोध सुद्धा मावळला होता. त्यामुळे आता मी स्वतः वार्ताहर म्हणून काम करणार असल्याचे लोकमत कार्यालयात सांगितले. धनंजयसोबत नेहमी येणे जाणे असल्याने तिथे मला सर्वजण अोळखत होतेच. संपादकांनी लगेच माझ्याकडे धुरा सोपवली आणि माझा पत्रकारितेचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरु झाला.

साधारण सहा वर्षे लोकमतसाठी काम केल्यानंतर मी थो़डा बदल केला. सकाळ दैनिकात बातमीदारी करण्यास सुरुवात केली. तत्कालिन संपादक दिलीप तिवारी सर यांनी माझ्यातील लिखाणाचे गुण हेरुन मला सकाळच्या शहर कार्यालयात बसून बातम्या लिहिण्याची तसेच संगणकावर टाईप करण्याची संधी उपलब्ध करुन दिली. त्या संधीमुळे माझ्यातील पत्रकाराने आणखी आकार घेतला. श्रीमंत माने सर संपादकपदी रुजू झाल्यावर त्यांनी ममुराबाद गावातील माझी बातमीदारी बघून मला जळगाव शहारातील बातमीदारीची संधी दिली. त्याचाच फायदा घेऊन नंतर मी सकाळमध्ये उपसंपादक पदापर्यंत मजल मारली. पुढे जाऊन अॅग्रोवन सारख्या कृषी दैनिकाचा खानदेश विभागाचा प्रतिनिधी झालो. उत्तर महाराष्ट्र विद्यापिठातून पत्रकारिता विषय घेऊन MA प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो.  शासनमान्य पत्रकारांच्या रांगेत जाऊन बसलो. 2012 मध्ये वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्काराचा मानकरी ठरलो.

- जितेंद्र रघुनाथ पाटील
ममुराबाद, ता. जळगाव
मो.9011047325

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget