DNA Live24 2015

यशकथा I थेट विक्रीतंत्राच्या राजमार्गातून मिळाले यश


उपलब्ध मनुष्यबळ व पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन करून शेतीतूनही भरघोस नफा मिळविलेल्या शेतकर्यांची हजारो उदाहरणे आहेत. अशाच प्रयोगशिल शेतकर्यांकडून प्रेरणा घेऊन अनेकांनी आपली कोरडवाहू शेती फुलविल्याचे दिसते. त्यापैकीच एक म्हणजे नगर तालुक्यातील चास या नगर-पुणे राज्यमार्गावरील गावातील शेतकरी शिवाजी नामदेव फलके. आपल्याच शेतात पिकविलेली फळे प्रवाशांना विकून कृषी मार्केटिंगचा नवा राजमार्ग फलके यांनी परिसरातील शेतकर्यांसमोर ठेवला आहे. फलके यांचा मागील पंधरा वर्षांपासून सुरू असलेला हा थेट किरकोळ विक्रीचा पर्याय आता नगरसह पुण्यातील शेतकर्यांनीही राबविला आहे. परिणामी पुणे-औरंगाबाद हायवे लगतच्या शेेतकर्यांना प्रगतीचा मार्ग खुला झाला आहे.

याविषयी माहिती देताना फलके सांगतात की, दहावी पास होऊन वडिलोपार्जिंत 15 एकरांची शेती कसण्यास सुरूवात केली. सुरूवातीला पारंपारिक गहू, बाजरी, हरभरा, भाजीपाला या पारंपारिक पिकांच्या फेर्यात अडकलो. परिणामी शेती तोट्यात जाऊन कर्जबाजारी झालो. मात्र, 1990 मध्ये गावातील भिकाजी देवकर या प्रयोगशील फळबाग उत्पादक शेतकर्याकडून चिकू लागवडीची प्रेरणा मिळाली. चिकुचे आगार म्हणून डहाणूची ओळख असल्याचे समजल्याने तेथे जाऊन चिकूच्या बागांची पाहणी केली. डहाणूतील चिकू उत्पादकांनीही चांगले मार्गदर्शन करून धीर दिला. सुरूवातील प्रयोग म्हणून राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ दादाभाऊ ठुबे यांच्या मार्गदर्शनाखाली चिकुची 155 झाडे लावली. त्यानंतर कृषी विभागातील अधिकार्यांच्या सल्ल्याने 2002 ला 225 सिताफळ कलमे व 2005 मध्ये 50 केशर आंब्याच्या कलमांचीही लागवड केली. या फळांचे उत्पादन बाजारात विकण्यापेक्षा नगर-पुणे रस्त्यावरील प्रवाशांनाच विकण्याची कल्पना डोक्यात आली. त्यानुसार मागील 15 वर्षांपासून या राज्यमार्गावरच स्टॉल लावून माल विकतोय. त्यामुळे घरची हालाखीही परिस्थिती इतिहासजमा झाली आहे.

पाण्याचे व्यवस्थापन
परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठीही अनेकांची पायपीट ठरलेलीच. पाण्याच्या कमतरतेमुळे फलके यांनी ही तीनही फळपिके टप्याटप्याने लावली. एप्रिलमध्ये चिकूला पाण्याची गरज नसते. तर त्याचदरम्यान सीताफळाला पाणी लागते, हे ओळखून त्यांनी बागेची लागवड केली आहे. म्हणूनच कमी पाण्यात जास्त उत्पादन काढण्याची किमया साध्य झाल्याचे फलके सांगतात. वर्षभर आपल्याच शेतात पिकविलेल्या फळांची विक्री ते करतात. औरंगाबाद किंवा नगर-पुणे असा प्रवास करणार्या अनेक कार रोज किंवा दिवसाआड त्यांच्याकडून ही ताजी फळे नेतात. याकामी त्यांना पत्नी नर्मदा, मुलगा प्रताप मदत करतात.

प्रक्रिया गरजेची
रासायनिक खतांमुळे फळांवर काही दुष्परिणाम होत असल्याने गांडूळ खत, सेंद्रीय खत, शेणखत वापरून भरघोस उत्पादन मिळते. बागेवर रोगांचा प्रार्दुभाव होऊ नये म्हणूनही गोमूत्र, लिंबोळ्यांपासून घरीच तयार केलेले लिंबोळी अर्क तसेच फळमाशीच्या नियंत्रणासाठी घरगुती बनविलेले लाईटच्या बल्बचे ट्रॅप यांचा वापर करत असल्याचे फलके सांगतात. शेतमालाला बाजारात योग्य भाव मिळत नसल्याची खंत बालून दाखवितानाच ते म्हणाले की, शेतीमालावर प्रक्रिया करणारे लघु उद्योग शेतकर्यांनीच सुरू करण्याची गरज आहे. कोणतेही शिक्षण घेतले तरी नोकरीची हमी नाही. त्यामुळेच छोटा मुलगा अशोक यास शेतीमालावर प्रक्रिया करण्याचे शिक्षण ते देत आहोत. मुलाच्या मदतीने फळांवर प्रक्रिया करून जास्तीत -जास्त दिवस टिकतील, असे पदार्थ तयार करण्याचे स्वप्न आहे.

थेट विक्रीतून फायदा
फलके सांगतात की, सुरूवातीला नगर किंवा पुण्याच्या गुलटेकडी मार्केटला चिकूची विक्री केली. मात्र, त्यातून व्यापार्यांचीच चांदी होत. त्यावर पर्याय म्हणून घराजवळ थेट रस्त्यावरच स्टॉल मांडून चिकू विकण्यास सुरूवात केली. किरकोळ बाजारातील भाव त्यामुळे थेट मिळतो. चिकूच्या झाडाला सरासरी एक क्विंटल उत्पादन मिळते. तर सिताफळ व आंब्यानेही चांगली साथ दिली. यातून आता वार्षिक सरासरी 4 लाख रुपयांपर्यंत उत्पादन मिळते. सुरूवातीच्या लागवडीसाठी मातीपरिक्षण केले नाही. मात्र, आता उरलेल्या क्षेत्रावर इतर फळरोपांची लागवड करण्यापूर्वी माती परिक्षण करूनच निर्णय घेणार आहे.

झाडांसाठी खत व्यवस्थापन
उन्हाळ्यात जमिनीची खोदणी किंवा नांगरणी करून बांधबंदीस्ती करण्याकडे कटाक्ष असल्याचे फलके सांगतात. ते म्हणाले की, त्यानंतर प्रत्येक झाडाला 30 किलो गांडूख खत, 10 किलो निंबोळी पेंड व चांगले कुजलेले शेणखत 5 किलो या प्रमाणात देतो. गरजेनुसार शेतजमिनीतील हुमणी किडींच्या नियंत्रणासाठी थिमेट द्यावे लागते. कलमांच्या चांगल्या वाढीसाठी तसेच अधिक उत्पादन मिळण्यासाठी लागवड केल्यानंतर पहिल्या वर्षी 150 ग्रॅम नत्र, 150 ग्रॅम स्फुरद व तितकेच पालाश या खतांची मात्रा द्यावी. त्याचबरोबर 10 किलो शेणखत द्यावे. दुसर्या वर्षी या मात्रेच्या दुप्पट अशा प्रकारे वीस वर्षांपर्यंत एका पटीने खतांचा डोस वाढवीत जावा. मात्रा दरवर्षी दोन सारख्या हफ्त्यांत द्याव्यात. पहिला हप्ता ऑगस्ट महिन्यात, तर दुसरा हप्ता जानेवारी महिन्यात द्यावा. खते बांगडी पद्धतीने चरामध्ये द्यावीत.

फलके सांगतात की, चिकूच्या जुन्या व घनदाट बागांमध्ये पुरेसा सूर्यप्रकाश पोचत नसल्याने फळधारणा व उत्पादनावर विपरीत परिणाम दिसतो. तसेच आंतमशागतीचेही प्रश्न येतात. त्यामुळेच अशा बागांमध्ये शास्त्रीय पद्धतीने छाटणी, खतांची योग्य मात्रा, छाटणीनंतरचे व्यवस्थापन व एकात्मिक कीड-रोगनियंत्रण महत्त्वाचे आहे. लागवडीवेळीच योग्य नियोजन करून चिकूव्दारे आर्थिक उन्नती शक्य आहे. त्यासाठी कलमांची लागवड केल्यानंतर मूळकांडावर येणारी फूट नियमितपणे काढून टाकावी. गरजेनुसार पाणी द्यावे. लागवडीनंतर पहिली तीन वर्षे कलमावर येणारी फुले खुडून टाकावीत, त्यानंतर जमिनीपासून दोन ते तीन फूट उंचीवरील फांद्या काढून टाकाव्यात. किडलेल्या व रोगट फांद्यांची वेळोवेळी छाटणी करावी. चिकूला वर्षभर पाण्याची गरज आहे. जमिनीची प्रत आणि हवामान यानुसार पाण्याचे प्रमाण व वेळ बदलत असते. पाणी देण्यासाठी झाडाच्या भोवती विस्ताराच्या आकाराचे गोल आळे करून पाणी द्यावे. चिकूच्या झाडाला सतत पाणी मिळाले पाहिजे, परंतु पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. च्माणापेक्षा जास्त पाणी जरी दिले तरी फुले व फळांची गळ होते किंवा प्रत खालवते. सध्याची पाणीटंचाई पाहता तुषार किँवा ठिबक सिंचनाचा वापर करावा. आळ्यामध्ये आच्छादनाचा वापर केल्याने उन्हाळ्यात मोठा फायदा होतो. 

बी पोखरणार्या अळीची समस्या 
गेल्या दहा-बारा वर्षांपासून चिकू बी पोखरणार्या अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. या किडीच्या प्रादुर्भावामुळे फळांचे उत्पादन घटते व गुणवत्ताही खालावते. या किडीचा प्रादुर्भाव होण्याची कारणे म्हणजे जुन्या बागेतील झाडांच्या एकमेकांत मिसळलेल्या फांद्यांमुळे पुरेसा सूर्यप्रकाश बागेत पोचत नाही. घनदाट बागांमध्ये फवारणी, आंतरमशागतीची कामे परिणामकारकरीत्या करता येत नाहीत. या किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीडनियंत्रण पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. त्यास सेंद्रिय व रासायनिक पद्धतीची जोड देण्याची गरज आहे. हे टाळण्यासाठी आम्ही बागेची स्वच्छता ठेवतो. बागेमध्ये पुरेसा सूर्यप्रकाश पोचण्यासाठी गरजेनुसार फांद्यांची छाटणी करतो.  तसेच कीडग्रस्त तसेच गळलेली फळे, पालापाचोळा गोळा करून जाळून टाकतो. शेतकर्यांनी किडीच्या नियंत्रणासाठी एक मि.लि. प्रोफेनोफॉस (40 टक्के प्रवाही) प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच कळी पोखरणार्या अळीच्या नियंत्रणासाठी (ही अळी शक्यतो नोव्हेंबर ते फेब्रुवारी तसेच मे-जून महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येते). याच्या नियंत्रणासाठी 0.45 ग्रॅम इनामेक्टीन बेन्झोएट (पाच एसजी) प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करतो. कीटकनाशक निवडताना कोणतेही कीटकनाशक लागोपाठच्या फवारणीत परत न वापरण्याची काळजी आम्ही घेतो.

***
श्री. शिवाजी नामदेव फलके
मोबाईल नंबर 9011115199
रा. चास, ता. नगर, जि. अहमदनगर

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget