DNA Live24 2015

शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून केंद्र व राज्य शासनाची वाटचाल : सदाभाऊ खोत

सांगली :
शेतीमालाला हमीभाव, शेतकरी कर्जमाफी, पीकविमा, बाजारपेठांचे मजबुतीकरण, जलयुक्त शिवार योजना, अपूर्ण सिंचन योजनांना पाठबळ अशा विविध गोष्टींच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासन शेतकरी बांधवाला केंद्रबिंदू मानून काम करत आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाणी योजनांसाठीही मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे, असे प्रतिपादन कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज केले.

पलुस तालुक्यातील कुंडल येथे ट्रॅक्टर वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. क्रांतिअग्रणी डॉ.जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रांती उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख अरुण लाड होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हा परिषद गटनेते शरद लाड, तहसीलदार राजेंद्र पोळ, कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप पाटील, कार्यकारी संचालक सी. एस गव्हाणे, कृष्णाकाठ उद्योग समूहाचे प्रमुख जे. के. जाधव, किरण लाड, योगेश लाड, तालुका कृषि अधिकारी श्री. निकम, आदी उपस्थित होते. कारखान्याच्या वतीने तोडणी वाहतूक कंत्राटदार संघटनेला 113 ट्रॅक्टर वितरण करण्यात आले. त्याचे प्रातिनिधीक किल्ली वितरण राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते करण्यात आले. या ट्रॅक्टरसाठी कारखान्याच्या वतीने हमीपत्र देण्यात आले आहे. 

क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याने परिसराचा कायापालट केला आहे. रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत. तसेच, शैक्षणिक चळवळीलाही चालना दिली आहे, असे स्पष्ट करून राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, जागतिक बाजारपेठेची तुलना करून केंद्र शासनाने अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. साखर कारखानदारी टिकली पाहिजे, यासाठी आयात होणाऱ्या साखरेवर 100 टक्के कर व इथेनॉलच्या दरात वाढ असे निर्णय घेतले आहेत. 2022 पर्यंत उत्पादन दुप्पट झाले पाहिजे, यासाठी शासन प्रयत्नशील असून, त्यासाठी बाजारपेठाही मजबूत केल्या पाहिजेत. तसेच अपूर्ण सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः प्रयत्नशील आहेत. जलयुक्त शिवार योजना, कृषि यांत्रिकीकरण या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला आहे. पाणी योजनांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे स्पष्ट करून बोंड अळी प्रादुर्भावावर नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न व जनजागृती केली असल्याचे त्यांनी सांगितले. 

एक ट्रॅक्टर अनेकांचे कुटुंब चालवतो. त्यामुळे ट्रॅक्टर वितरणाच्या माध्यमातून क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याने एक चांगला प्रयत्न केला आहे. उत्तम कारखानदारीचाही हा एक आदर्श आहे, असे कौतुकोद्गार काढून जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख म्हणाले, राज्य शासनाने कृषि विकासाला चालना दिली असून, वैयक्तिक व सार्वजनिक लाभाच्या योजना ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होते. तसेच, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यासारख्या शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकरी व सामान्य जनतेला न्याय देण्यात येत आहे. 


अरूण लाड यांनी कारखान्याचे विविध उपक्रम आणि ट्रॅक्टर वितरणाच्या उपक्रमाचा हेतू विषद केला. तसेच, साखर उद्योगाचे प्रश्नांवर शासन स्तरावर तोडगा निघावा, कारखान्यालाही कृषि महाविद्यालयाची संधी द्यावी, असेही आवाहन केले. 

यावेळी जे. के. जाधव यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी महिंद्रा ट्रॅक्टर्सचे कस्टमर केअर मॅनेजर रमेश खराडे, बसवराज जेवरगी, सुमीत चौधरी यांच्यासह बाजीराव पाटील, हेमंत भावसार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

स्वागत व प्रास्ताविकात किरण लाड यानी कारखान्याच्या स्थापनेपासूनचा आढावा घेत विविध उपक्रमांची माहिती दिली. आभार कुंडलिक एडके यांनी मानले. कार्यक्रमास कारखान्याचे पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

@'महान्यूज' 

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget