DNA Live24 2015

आदिवासी समाजाला वनजमीन पट्टे डिसेंबरअखेरपर्यंत देणार : मुख्यमंत्री

शिर्डी :
राज्यातील आदिवासी समाजाला डिसेंबर 2018 अखेरपर्यंत वनजमीनपट्टे देण्याचे काम पूर्ण करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

शिर्डी येथील वीर राघोजी भांगरे नगर येथे अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम आयोजित अखिल भारतीय कार्यकर्ता संमेलनात ते बोलत होते.  यावेळी अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमचे अध्यक्ष जगदेवराम ओराम, मेघालयचे माजी राज्यपाल रंजीत शेखर मुशाहारी, महंत रामगिरीजी महाराज, श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे अध्यक्ष सुरेश हावरे, स्वागत समितीचे अध्यक्ष सुरेश कोते, पद्मश्री लक्ष्मीकुटी अम्मा, निलीमा पट्टे, डॉ. दासरी श्रीनिवासन, कल्याण आश्रमाचे अध्यक्ष लक्ष्मणराव टोकले, कमलचंद भजदेव आदी उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले, राज्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी राज्य शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. आदिवासी क्षेत्रात विविध विकासकामांच्या माध्यमातून आदिवासी  समाजाला सक्षम बनविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पेसा कायदा लागू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले असून त्यानुसार पाच टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना देण्यात येत आहे.  आदिवासी मुलामुलींना चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आदिवासींना जमीन अधिकार प्राप्त व्हावा, यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला असून डिसेंबर अखेरीस जमीन पट्टे देण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

आदिवासी समाजाने आपली संस्कृती जतन करण्याचा प्रयत्न केला असून ब्रिटीशांच्या आक्रमणानंतरही त्यांनी आपली भाषा, संस्कृती आणि परंपरा टिकवून ठेवली आहे . छत्रपती शिवाजी महाराज आणि इंग्रजांच्या काळात अदिवासी बांधवानी पराक्रम गाजविला. जल, जमीन आणि जंगलाच्या अधिकारासाठी बिहारमधील तिखामाजी, महाराष्ट्रातील बाबुराव शरमाके, बिरसा मुंडा आदींनी अपार साहस दाखवले, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

देशात विविध भाषा, परंपरा आहेत, मात्र विविधतेतून एकता हे देशाचे वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य जपत वनवासी कल्याण आश्रमाने शिक्षण आणि संस्कृतीच्या प्रसारात महत्वाचे योगदान दिले. ब्रिटीशांनी शिक्षणापासून जाणीवपूर्वक दूर ठेवलेल्या वनवासी समाजाला वनवासी कल्याण आश्रमाने शिक्षणाशी जोडले. त्यांच्या मुलभूत क्रीडा कौशल्याला वाव दिला. त्यामुळे विविध क्रीड़ा प्रकारात या समाजातील तरुण-तरुणी देशाचे नाव उंचावताना दिसतात, असे ते म्हणाले.

साईबाबांनी सर्वांना श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र दिला. विचारांवर श्रद्धा आणि मानवतेच्या स्थापनेसाठी श्रद्धा आवश्यक आहे, असे श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

डॉ. मुशाहिरी यांनी देशातील वैविध्यता हे वैशिष्ट्य असल्याचे सांगत आदिवासींनी ही परंपरा जोपासल्याचे सांगितले. जातीभेद विसरुन सर्वांनी मानवधर्माचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले. श्री. ओराम यांनी आदिवासी समाज मुख्य प्रवाहात यावा, त्याच्यापर्यंत शासनाच्या योजना पोहचाव्यात यासाठी वनवासी कल्याण आश्रमाचे काम सुरु असल्याचे सांगितले.

यावेळी महंत रामगिरीजी महाराज यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.  श्री. कोते यांना प्रास्ताविकात अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे हे संमेलन इतिहासातील सर्वांत मोठे संमेलन आहे, असे सांगितले.

श्री. हावरे यांनी यावेळी शिर्डी संस्थानच्या माध्यमातुन महिला बचत गटांना रोजगार, रक्तदानासारखे उपक्रम, साईसेवक योजना आदी उपक्रम राबविले असल्याची माहिती दिली.

गेल्यावर्षी वनवासी कल्याण आश्रमाद्वारा भोपाळ येथे  आयोजित तिरंदाजी स्पर्धेत एकावेळी  306 तिरंदाजांचा समावेश होता. या विक्रमाची नोंद  गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मध्ये करण्यात आली. त्याचे प्रमाणपत्र आशिया विभागाचे प्रमुख मनीष बिष्णोई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत कल्याण आश्रमांच्या अध्यक्षांना प्रदान करण्यात आले.

तत्पूर्वी, मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी श्री साईबाबा समाधी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी खासदार दिलीप गांधी, आमदार स्नेहलता कोल्हे, संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, राहाताच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget