DNA Live24 2015

Blog : इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो !

"बळी ! सात काळजांच्या आत जपून ठेवावा, असा निरागस माणूस ! आपल्या प्रजेतील प्रत्येक व्यक्तीला तिच्या कष्टाचे व हक्काचे फळ सम्यक रीतीने विभागून देणारा संविभागी नेता !! भारतीयांचे वास्तव आणि विधायक संचित असलेला कृती, प्रकृती आणि संस्कृती यांचा तजेलदार मोहर !!! बळी - हिरण्यकशिपूचा पणतू, प्रल्हादाचा नातू, विरोचनाचा पुत्र, कपिलाचा पुतण्या आणि बाणाचा पिता. भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व ! भारतीय बहुजन समाजाचा महानायक, एक महातत्ववेत्ता !"

"बळीवंश"  या पुस्तकातील प्रस्तावनेत डॉ. आ.ह. साळुंखे सरांनी वर्णन केलेले बळीचे चित्र व चरित्र अंतर्बाह्य हलवून टाकणारे आहे. प्रवासात कुठेही शेतकरी दिसला की या बळीराजाची हमखास आठवण येते. बिहारमध्ये प्रवास करत असताना शेत नांगरणारा शेतकरी दिसला. सरांनी त्यावेळी त्याची अत्यंत आस्थेने चौकशी करत त्याचा नांगर सफाईने चालवून दाखवला. सरांसोबत बैलगाडीत बसण्याचा योग आज गांधी जयंती दिनी आजरा येथे आला. लोकशाहीर द.ना. गवाणकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी साळुंखे सर आजरात आले होते. बैलगाडीत बसलेल्या सरांचे द्रकश्राव्य चित्रीकरण करायचे होतेच. आम्ही उशिरा पोचल्याने नियोजित बैलगाडीवाला तेथे नव्हता. अमरावतीचे शंकरराव पाते, आजराचे राजाभाऊ शिरगुप्पे, नवनाथ शिंदे आदी प्रयत्न करत होते. आजरा या तालुक्याच्या गावी बैलगाडी मिळू नये, याचे वैषम्य वाटत होते. तेवढयात दूरवर बैलगाडी जाताना दिसली. शंकरराव पाते यांनी बैलगाडी बघितली आणि अर्धा किमी सुसाट धावत बैलगाडीवाल्याला थांबवले. अर्जून सावरतकर यांनी सरांसोबत काढलेला फोटो आपल्या मुलाला व्हाटस्अपवर पाठवावा किंवा फैसबुकवर टॕग करावा, अशी अट घालून गाडी परत वळवली. खरे तर सरांच्या कार्यक्रमाची वेळ होत आली होती. तरीही त्यांनी आमच्या आग्रहापोटी बैलगाडी हाकून दाखवली. महात्मा बळी व त्याचे प्रतीक असलेला शेतकरी याची इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो, अशी चर्चा सुरू असतानाच बातमी आली.

अहिंसा व सत्याचा आग्रह धरणारे महात्मा गांधी आणि जय जवान जय किसान नारा देणारे लालबहादूर शास्त्री यांच्या जन्मदिनीच राजधानी दिल्लीत सनदशीर  मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांचा निष्ठूर लाठीमार सुरू झाल्याची ! त्याचे तीव्र पडसाद पुरस्कार वितरण समारंभातही उमटले !!

@प्रभाकर ढगे,
गोवा
Labels:

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget