DNA Live24 2015

Blog : हवामान खाते व स्कायमेट यांचा अंदाज समजून घ्या...

वास्तव सांगण्याऐवजी फक्त गोंधळ उडेल अशा प्रकारे चुकीच्याच पद्धतीने बातम्या द्यायचा विडाच प्रिंट आणि इलेकट्रोनिक मीडियाने उचलला आहे का अशी शंका यावी अशा पातळीवर पत्रकारिता आली आहे. 

आज काही वर्तमानपत्रांमधे स्कायमेटच्या एका माहितीचा संदर्भ देऊन पाऊस संपला अशा बातम्या दिल्या गेल्या आहेत. याने दुष्काळाने आधीच चिंताक्रांत असलेला शेतकरी आणखीनच धास्तावून गेला आहे. पण स्कायमेटने फक्त पावसाळ्याच्या मुख्य महिन्यात देशभरात किती पाऊस झालाय हे सांगितले आहे. ती आकडेवारी पाहून लगेच पाऊस संपला अशी बोंब मारायची गरज नाही. महाराष्ट्रातून अजूनही परतीचा मान्सून गेलेला नाही. त्यालाही तीन चार दिवस आहेत अजून. दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण इथे मागील पाच सहा दिवसापासून लहान मोठा पाऊस चालू आहे. उर्वरित महाराष्ट्र सध्या तरी कोरडाच आहे, आणि इथे परतीच्या पावसाचा जास्त फायदा होण्याची शक्यता नाही. पण म्हणून लगेच पाऊस संपला अशी आरोळी कुणी ठोकू नये.

अजून अरबी समुद्रात दर वर्षीप्रमाणे वादळ सुरु व्हायचे आहे, त्याचा रोख मुख्यत्वे आखाती देशाकडे असतो. पण ते आपल्या किनाऱ्याजवळून जाणार असेल तर पश्चिम महाराष्ट्र, कोकण, पश्चिम मराठवाडा, खान्देश या प्रदेशात पाऊस पडू शकतो. बंगालच्या उपसागरात दरवर्षी किमान दोन वादळे येतात. त्यातील एक कमी दाबाच्या पट्ट्याच्या स्वरूपात येऊन गेले आहे, एक अजून यायचे आहे, त्याचा फायदा विदर्भाला आणि पूर्व मराठवाड्याला होतो. हे वादळ जर आंध्रच्या किनारपट्टीला धडकले तर विदर्भात चांगला पाऊस होतो. हि दोन वादळे येऊन जाईपर्यंत वृत्तपत्रांनी लगेच कुणाला टेन्शन देण्याचा प्रयत्न करू नये.

दुष्काळाने पिके गेलीत हे मात्र खरे आहे, या आपत्तीला आपण थांबवू शकत नाही. पण पाऊस पूर्ण गेलाय म्हटल्यावर पिकं तर गेलीत पण पाऊस संपला म्हणजे चाऱ्याची सुद्धा टंचाई होईल, मग जनावरं जगवायची कशी या भीतीने शेतकरी आणखी गारठून जाईल. मागच्या काही वर्षाच्या दुष्काळाचा अनुभव असल्यामुळे  दुष्काळात कमी किमतीत आपली जनावरे विकण्यापेक्षा कदाचित तो या भीतीने आत्ताच ती मिळेल त्या किमतीत विकू शकतो याचाही विचार करायला हवा. आजच्या बातमीवर शेतकरी वर्ग पुढच्या सहा महिन्याचे नियोजन करणार असतो याचे भान पत्रकारांना असायला हवे. 

पाऊस अजून संपला नाहीये. मान्सून येत्या आठवडाभरात पूर्ण माघारी फिरेल पण त्यानंतर या दोनीही वादळांचा परिणाम ऑक्टोबर च्या शेवटपर्यंत किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या पंढरवाड्यापर्यंत जाणवू शकतो. त्यांनतर चाऱ्याची टंचाई असेल कि नाही, आणि दुष्काळ किती मोठ्या प्रमाणात असेल हे ठरवणे योग्य होईल. 

मीडियाने सारासार विचार करून बातम्या द्याव्यात. आपले काम लोकांना घाबरण्याचे नसून बातमी आहे तशी, कोणताही तडका न करता, फक्त वास्तव माहित करून देण्याइतकीच बातमी देणे इतकेच आहे हे मीडियाने लक्षात घ्यावे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्कायमेट आणि हवामान खाते यात गल्लत करून लोकांची दिशाभूल करू नये. स्कायमेट च्या बातम्या हवामान खात्याच्या माथी मारू नयेत.

@श्रीकांत आव्हाड
अहमदनगर
Labels:

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget