DNA Live24 2015

Blog : का होतोय शेतकरी संतप्त..?

मीच उत्पादन घ्यायचं आणि त्यापोटी तोटा पिकवायचा... मीच राबायचं आणि डोळ्यादेखत चोरांना मोठं झालेलं पाहायचं... मीच राबायचं आणि त्याचे भाव कवडीमोल करणारे सरकार निवडायचे... मीच अवहेलना सहन करायची आणि बळीराजा म्हणवून घ्यायचं...?

असेच प्रश्न भारतीय शेतकरी बांधवांना पडत असतील. म्हणूनच तो बळीराजा आक्रमक होऊन लढाईस सज्ज होत असेल. आजही महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने शेतकरी क्रांती यात्रा दिल्लीत दाखल झाली. उठता-बसता, झोपता-उठता गांधी वंदनीय असल्याचे सांगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने या अन्यायग्रस्त बळीराजावर लाठीचार्ज केला. कर्तव्यभावणेतून काम करण्याऐवजी सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्याचेच हे उदाहरण...

सरकार कोणाचेही असो, मरण मात्र गरीब कष्टकरी व शेतकऱ्यांचेच असते. आघाडीने न्याय न दिल्याने मोठ्या आशेने देशात सत्तापालट करीत शेतकऱ्यांनी भाजपला उजवा कौल दिला. मात्र, तो कौल चुकल्याची बोच आता बळीराजाला सतावत आहे.

याच निराशेतून आज उत्तराखंड आणि हरियाणा येथील शेतकऱ्यांनी दिल्लीवर स्वारी केली. गांधीजींच्या विचारांना जागून मोदीजी न्याय देतील ही वेडी आशा त्यांना होती. पण उजव्यांचे डावेपण त्यांना माहीत नव्हते. त्यातूनच त्यांना जखमी होऊन पुन्हा अन्याय सहन करावा लागला.

व्यवस्था व सरकार आणि बेभरवशाचा पाऊस यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. जगभरात हे संकट आहे. ग्राहक खुश असताना कंपन्या समाधानी असतात. मात्र, हाच अर्थव्यवस्थेचा नियम शेतीत लागू होत नाही. इथले ग्राहक आणि शेतकरी असे दोन्ही असमाधानी आहेत. त्याला जबाबदार आहे सरकारचे धरसोड धोरण. आताही आघाडी सरकारच्या पुढचा बेभरवशी कित्ता मोदी सरकारने गिरवला आहे. त्याचे फलित म्हणून बळीराजा आणखी संतप्त होत आहे.

@सचिन मोहन चोभे,
संपादक, कृषीरंग
Labels:

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget