DNA Live24 2015

विशेष लेख : 'त्या' जेवणाचे कौतुक.. बिनडोकपणाच...


डिनर डिप्लोमसी ही परंपरा जगभर रूढ आहे. मात्र, भारतीयांनी यातही आघाडी घेऊन पोलिटिकल डिनर नावाची वेगळी परंपरा रूढ केली आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह असोत मणिशंकर अय्यर असोत की उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी असोत. सगळ्यांनी याचाच प्रत्यय दिला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांच्या टीममधील काहींनी असाच प्रयोग करून पाहिलेला आहे. संबंधित पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते यांना याचे कोण कोडकौतुक असते. महाराष्ट्र राज्यातही राज ठाकरे यांच्यासह चिटुकले-पिटुकले नेते असेच प्रयोग करतायेत. त्याने सोशल मीडियावर थैमान घातले आहे. त्यानिमित्ताने आपल्याला एक आठवण सांगावीशी वाटतेय... इतकेच...

आमचं गाव एकाच पक्षाचं होतं. म्हणजे निवडणुकीला गावात एकाच पक्षाचे दोन पॅनेल असायचे. मी चौथीला होतो. गावात कुणीतरी पुढारी येणार होता. आमची आई मागे कधीतरी सरपंच होती. गावात खालच्या आळीला मोक्कार गर्दी झाली होती. पुढारी आल्यावर सगळे त्यांच्या मागे गावभर फिरू लागले. मीही त्यांच्यात होतो. वरच्या आळीला गावातल्या मोठ्या हस्तीचा वाडा होता. तिथे त्यांना ओवाळले. सुदैवाने मी अगदीच पुढाऱ्याच्या शेजारी असल्याने ओवाळल्यावर त्यांच्या हातात दिलेली साखर त्यांनी मला भरवली. मी ती बकानाभर साखर तोंडात ठेऊन गावभर त्या पुढाऱ्यासोबत हिंडलो. तेव्हा आमची आई (माझी आजी) सगळ्यांना मोठ्या कौतुकाने सांगत होती की “पुढाऱ्यांनी आमच्या इनोदला साखर भरवली...” तिथून पुढे या पुढार्यांचा मीही फॅन झालो. हे पुढारी म्हणजे मा. मंत्री बबनदादा पाचपुते.

जसजसा मोठा होत गेलो. तसे वेगवेगळ्या वयात माझे राजकारणाबद्दल मत बदलत गेले. वेळ, काळ आणि व्यक्तिपरत्वे अजूनही बदलतात. पुढे या माणसाचे बरेच किस्से ऐकायला मिळायचे. उदारणार्थ काष्टीच्या बाजारात हा माणूस चालता-बोलता संवाद साधतो. "बैलजोडी कितीला आणली?" "म्हातारीला बरं आहे का?" असे प्रश्न शेतकऱ्याला विचारत सहजपणे भेटत असतो. समोरच्याला प्रश्न पडायचा की दादांकडे एवढी माहिती आली कुठून?

हा पुढारी माणूस एखाद्याच्या लग्नात गेला की, "गावात पाणी आहे का?" "पिकं कशी आलीत?" "छोकरा कितवीत शिकतो?" असे प्रश्न हमखास विचारायचा. आणि अजूनही विचारतो. आता चिकार नेते मंडळी जनसंपर्क अधिकारी ठेवतात. हा माणूस स्वतःच समाजात मिसळणारा असल्यामुळे यांना कधी जनसंपर्क अधिकाऱ्याची गरज भासली नसावी.

कुणाचा लग्न असू दे की वर्षश्राद्ध. सगळीकडे नेटाने बबनदादा हजर असणारच. नेहमीच जनतेत मिसळणाऱ्या ह्या मंत्र्याला कधी गरीबा घरी जेवातानाचे फोटो व्हायरल करण्याची गरज वाटली नाही. सध्या राजकारणात असा एक ट्रेंड चालू आहे. मात्र, असे सोशल मीडियातून 'पुअर' ट्रेंड करण्याची दादांना मुली गरजच नाही. आंदोलन किंवा दौरा असो. या दरम्यान कुठल्याही शेतकऱ्याच्या घरी ते अगदी हक्काने जाणार. आनंदात जेवण करणार. दुसरे आपले भले २ च घास खातात... खाताना दोन बोटे निवडून खातात... आणि याच गरिबाळू ग्लोबल इव्हेंटचे फोटो काढून समाजमाध्यमांमध्ये व्हायरल करणार. हेच नेते जर सत्ताधारी असतील तर त्यांची दाखल राज्यस्तरीय वर्तमानपत्रे घेणार. याची गरज दादांना कधीच वाटली नाही.

सध्या हा ट्रेंड जोरात सुरू असल्यानेच बबन दादा पाचपुते या नेत्याची आठवण झाली. काही दिवसांपूर्वी या ट्रेंडची सुरुवात केली मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी. खर तर त्याआधीही पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण हे हल्लाबोल आंदोलनावेळी कार्यकर्त्यांसोबत जेवले होते. पण शेवटी या ट्रेंडचं क्रेडीट राज साहेबांना द्यावच लागेल. त्यानंतर सदाभाऊ खोत, नगरचे पालकमंत्री राम शिंदे, अजितदादा पवार आणि एका मागून एक दुसऱ्या फळीतील नेते सुद्धा असे फोटो व्हायरल करायला लागले. 

आम्ही कसे सामान्य आहोत हे दाखवण्यासाठी नेत्यांना सामान्यांत जेवण करावे लागते याचाच अर्थ हे नेते स्वताला सामान्य समजत नाहीत. कार्यकर्तेसुद्धा गैबान्यासारखे फोटोला कॅप्शन देतात “साहेब चटईवर बसून जेवण करताना...”

एखाद्या माणसाचे चटईवर बसून जेवण करणे तुम्हाला जर कौतुकाचे वाटत असेल तर चटईवर बसून जेवण करणारा माणूस सामान्य नाहीच.

हा ट्रेंड म्हणजे स्पर्धाच झाली की काय असेच चित्र आहे. कारण सदाभाऊंचे (खोत) आणि अजित दादांचे (पवार) जुनेच फोटो व्हायरल होत आहेत. त्याचा अगदी भडीमार सुरू आहे. मात्र, या ट्रेंडमुळे या नेत्यांबाबतीत काही प्रश्न उपस्थित होतात.

गरीबाच्या पडवीत रेबॅनचा ब्रांडेड गॉगल लाऊन त्यांच्याशी चर्चा करणारे राजसाहेब एवढेच सामान्य आहेत तर त्यांचा एकच आमदार का?

झाडाखाली बसून कांदा भाकरी खाणारे राम शिंदे एवढे सामान्य आहेत तर, त्यांना स्वतःच्या जिल्ह्यात फिरकायलाही वेळ का मिळत नाही?

खूप वर्षे वडाप चालवणारे सदाभाऊ एवढे सामान्य आहेत तर, सामान्य शेतकऱ्यांच्या समस्या शासन दरबारी का मांडत नाहीत?

आणि शेवटचा प्रश्न की वरचे सगळे प्रश्न त्यांच्या अगाध ज्ञानी असलेल्या कार्यकर्त्यांना का पडत नाहीत ???

राजकारणी जेव्हा लोकांपासून दुरावले जातात त्यावेळी लोकांमध्ये येण्यासाठी त्यांना असे पोलिटिकल स्टंट करावेच लागतात. त्याशिवाय ते सामान्य आहेत हे त्यांना दाखवून देता येणार नाही.

आमच्या तालुक्याचे बबनदादा पाचपुते हेही सामान्य घरातलेच होते. तालुक्याच्या आताच्या आमदारांनी (राहुल जगताप) तालुक्याचा दौरा केला असेल असे मला तरी वाटत नाही.

खऱ्या अर्थाने सामन्यांचे नेतृत्व म्हणजे कै. आर. आर. पाटील, जयंत पाटील, बबन पाचपुते ही मंडळी आहेत. (त्यातले पाचपुते सध्या पोलिटिकल स्टंटबाजीत पीएचडी केलेल्या भाजपा पक्षामध्ये आहेत हा भाग अलाहिदा)  पाचपुते यांना हा वारसा थोरल्या पवारसाहेबांकडून (माजी कृषिमंत्री शरद पवार) मिळाला असणार. पवारसाहेबांना जिथे जायचे असते तेथील महिती ते अगोदरच घेऊन ठेवतात. 
ही चाणक्यनीती केल्यामुळे राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदार व खासदारांना असे पोलिटिकल स्टंट करायची गरज भासत नाही.

नेते स्टंट करत राहतील. ट्रेंड बनत राहतील. त्यामध्ये स्पर्धा सुरु होतील-थांबतील. कोणी विजयी तर कोणाची हार होईल. पण यामध्ये सामान्य माणूस कुठेच नसेल. कारण तो चटईवर नाही तर जमिनीवर (मग ती सरावलेली जमीन असो की फारशी असोत) बसूनच रोजचे जेवण घेणार आहे. तर, असे जेवण घेतल्याचे नाटक नेतेमंडळी करणारच आहेत...

- विनोदकुमार सुर्यवंशी (श्रीगोंदा, जि. अहमदनगर)

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget