DNA Live24 2015

बचत गटातील महिलांनी स्वत:चा उद्योग उभारावा : पंकजा मुंडे

बीड : 
शहरी व ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या महिलांचे बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील बचत गटातील महिलांनी स्वत:चा उद्योग उभारल्यास त्यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होईल. यासाठी बचत गटांना शासनस्तरावरुन आवश्यक असणारी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी केले.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने अंबाजोगाई येथे आयोजित महिलांसाठी उपजीविका वृद्धी-प्रक्रिया उद्योग कार्यक्रमाच्या शुभारंभ पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास आमदार संगीता ठोंबरे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती दिपक ठाकरे, माविमच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालिका श्रद्धा जोशी, महिला आयोगाच्या सदस्या गयाबाई कराड, अंबाजोगाई नगर परिषदेचे अध्यक्षा रचना मोदी, माविमच्या जनरल मॅनेजर कुसुम बाळसराफ, उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार श्री.रुईकर, माविमचे जिल्हा समन्वयक अधिकारी सुखदेव चिंचोलीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिलांना उद्योजक बनविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. महिला उपजीविका वृद्धी प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून जिल्ह्यातील १६ गावांमधल्या ६७५ महिलांसाठी सिताफळ प्रक्रिया उद्योग व खवा प्रक्रिया उद्योगाचा शुभारंभ करण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये सर्वोत्तम खवा व सिताफळ तयार होतात पण यामध्ये महिलांना योग्य बाजार भाव मिळत नाही. यासाठी आाधुनिक तंत्रज्ञान असलेल्या मशीन वापरून दर्जेदार मालाचे उत्पादन केल्यास त्यास योग्य भाव मिळेल आणि त्याचा फायदा या बचत गटातील महिलांना होईल. यामुळे माविमच्या माध्यमातून जिल्ह्यातील बचत गटातील महिलांना त्यांच्या विविध प्रक्रिया उद्योगासाठी आधुनिक मशिनरी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच या महिलांना विविध प्रक्रिया उद्योगाची माहिती होण्यासाठी तज्ञाकडून मार्गदर्शन करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

राज्यात माविमचे 91 हजार 416 बचत गट असून 11 लाख महिला संघटीत आहेत. यातील जवळपास 74 टक्के महिला आर्थिक सामाजिकदृष्ट्या मागासप्रवर्गातील आहेत. यातील 5 लाख 75 महिला लघुउद्योगात असून 2122 कोटी रुपयांचे बँक कर्ज वाटप करण्यात आले असून 48 टक्के महिलांचे 25 हजाराने उत्पन्न वाढले आहे. माविम जिल्ह्यातील तळागळातील व गरजू महिलांसोबत काम करत असून माविमने घालून दिलेली शिस्त व महिलांचे कष्ट यातून महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने उद्योजक बनतील, असेही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले. 

यावेळी बोलतांना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष श्रीमती ज्योती ठाकरे म्हणाल्या की, महिलांनी २ हजार कोटींचे कर्ज घेऊन त्याची १०० टक्के परतफेड केलेली आहे. बचत गटातील महिला स्त्रीभ्रुण हत्या, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी यासारख्या विविध उपक्रमात काम करत आहेत. या महिलांना माहिमच्या माध्यमातून उभारी देण्याचे काम करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आमदार श्रीमती संगीता ठोंबरे यांचे समयोचित भाषण झाले. बचत गटातील श्रीमती रेखा वेडे आणि श्रीमती सुनिता गर्जे या महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माविमच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी यांनी केले. आपल्या प्रस्ताविकात माविमने महाराष्ट्रातील भौगोलिक विविधतेच्या आधारे विविध उद्योगांना चालना देण्याचे भरीव प्रयत्न केले आहे. विदर्भात बांबू व मोहाचे लाडू; कोकणात नाचणी, काजू तर मराठवाड्यात सिताफळ व खवा तर पश्चिम महाराष्ट्रात दूध. अशा विविध प्रकल्पांना Backward/forward linkages माविमने देऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादक कंपन्या बनविण्याच्या प्रक्रियेत महामंडळ आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रारंभी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सिताफळ व खवा प्रक्रिया उद्योगाचे फित कापून शुभारंभ केला. तसेच बचत गटाच्या महिलांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास पदाधिकारी, माविमचे अधिकारी, बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

@'महान्यूज' 

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget