DNA Live24 2015

हॉर्टीकल्चर संशोधन केंद्र सुरु करू : वनमंत्री

पुणे : 
नर्सरी व्यावसायिकांना शोभिवंत रोपांच्या उत्पादनात येणाऱ्या अडचणींसह अन्य समस्या सोडविण्यासाठी, कृषी विद्यापीठात हॉर्टीकल्चर संशोधन सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन वित्त व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. 

महाराष्ट्र नर्सरीमेन असोसिएशन व ग्लोबल कन्सल्टिंग यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी येथील हिन्दुस्थान अँटीबॉयोटिक्सच्या मैदानावर हॉर्टीकल्चरवर आधारित ‘हॉर्टीप्रो- २०१८’ हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वन सचिव विकास खारगे, महाराष्ट्र नर्सरीमेन असोसिएशनचे अध्यक्ष संतोष सितोले, युएनआईडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमीत पराशर उपस्थित होते.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे कृषी व वनप्रेम आपण सर्वजण जाणतो आहोत. त्यांच्या प्रेरणेतूनच महाराष्ट्रातल्या जनतेने वन व कृषीप्रेमाची कास धरली आहे. या कार्याचा जागतिक पातळीवर प्रसार देखील महाराष्ट्राच्या भूमीतून होत आहे. अशा प्रकारचे प्रदर्शन भरवून महाराष्ट्र नर्सरीमेन असोसिएशनने नर्सरी उद्योगास एक नवी दिशा दिली आहे. आज भारतात असलेल्या एकूण रोजगारापैकी पन्नास टक्क्यांहून अधिक रोजगार कृषीवर अवलंबून आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे कृषी क्षेत्राचा व पर्यायाने देशाचा विकास होण्यास मदत होते. भारतातील कृषी, नर्सरी व हॉर्टीकल्चर उद्योगाचा विकास करण्यासाठी प्रत्येक कृषी विद्यापीठात नर्सरी व हॉर्टीकल्चर संशोधन केंद्र स्थापन करणे गरजेचे आहे. त्याकरिता कृषि विभागाच्या सहकार्याने प्रयत्न करण्यात येईल. शेतीत किंवा नर्सरीत काम करताना एखादे संशोधन विकसीत होऊ शकते. अशा संशोधनाचा फायदा सर्वांना मिळायला हवा, जेणेकरुन या क्षेत्राचा विकास होईल.

सन २०५० पर्यंत पारंपरिक ऊर्जास्त्रोतांचा वापर बंद न केल्यास पृथ्वीवरील जीवन धोक्यात येण्याची शक्यता आहे, असे संशोधनातून लक्षात आले आहे. यासाठी नवीन ऊर्जास्त्रोतांचा वापर करणे काळाची गरज आहे. निसर्गाचा समतोल राखण्याचे कार्य वने करत असतात, त्यामुळे वनसंवर्धन व त्यातून आधुनिक विकास साधणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. प्रदर्शनात उभारण्यात आलेल्या विविध संस्थांच्या स्टॉलला वनमंत्र्यांनी भेट दिली व उत्पादनांची माहिती घेतली.

महाराष्ट्र नर्सरीमेन असोसिएशनचे अध्यक्ष संतोष सितोले यांनी हॉर्टीकल्चर क्षेत्राने सर्वात मोठा निर्यातदार, रोजगार पुरवठादार, गरीब आणि किरकोळ शेतकऱ्यांसाठी दारिद्य्र निर्मूलक आणि लाखो भारतीयांसाठी जीवन परिवर्तक म्हणून स्थापित केले आहे, असे सांगितले. प्रदर्शनादरम्यान दहा चर्चासत्रांचे आयोजन केले असून त्याद्वारे तंत्रज्ञान, वैज्ञानिक नवकल्पना, व्यवसाय मॉडेल, नेटवर्किंग आणि सहयोग संधीवर प्रदर्शन आणि कल्पना करण्याच्या संधी मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली.

युएनआईडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमीत पराशर यांनी, हॉर्टिप्रो-इंडिया बागकाम क्षेत्रातील नामवंत संस्थांबरोबर नेटवर्किंग, कल्पनांची देवाण-घेवाण आणि व्यावसायिक भागीदारीच्या संधी प्रदान करेल असा विश्वास यावेळी बोलताना व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय क्षेत्रातील प्रसिध्द व्यक्तींनी या कार्यक्रमात त्यांच्या पूर्ण क्षमतेने सहभाग घेतला आहे. त्यामुळे नवीन व होतकरू व्यावसायिकांना आपल्या व्यवसायात येणाऱ्या काळात भागीदार देखील करून घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

हॉर्टीप्रो-२०१८ या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व परिषदेत शेती, बागकाम, फ्लोरिकल्चर, एग्रीप्रिनेरशिप आणि हाय-एंड टेक्नॉलॉजीचा वापर करून त्याचा विकास करण्यावर भर देण्यात आला आहे. यामुळे शेतकरी व शेतीपूरक व्यावसायिकांना त्याचा फायदा होणार आहे. या प्रदर्शनात पीककापणी आधी व नंतरच्या अडचणी, बाजारपेठ जोडणी तसेच स्टार्ट अप व्यवसायातील संधी यासारख्या अनेक विषयांवर कार्यशाळा घेण्यात येणार आहे. संशोधक, तंत्रज्ञ, विद्यार्थी, सल्लागार, इंजिनियर, विस्तार एजंट, उत्पादक, व्यापारीवर्ग, पॉलिसी मेकर्स व अन्य लोकांना प्रदर्शनाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. ४० हजार स्क्वेअर मीटरच्या विस्तीर्ण परिसरात प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात हॉर्टीकल्चरवर आधारित व्यवसायाच्या संधीवर मार्गदर्शन करण्यात येणार असून आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या विविध विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत.

केंद्र सरकारचे कृषि व प्रक्रिया खाद्य उत्पादन निर्यात प्राधिकरण, नेदरलँडचा दूतावास, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन हॉर्टीकल्चर, इंडो-इटालियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, ब्रिक्स अलियान्झ, इंडियन सोसायटी ऑफ ॲग्री बिझनेस प्रोफेशनल्स, आन्त्रप्रेनर असोसिएशन ऑफ इंडिया, स्टार्ट अप इंडिया, बिहार आन्त्रप्रेनर असोसिएशन, बोउगैनविला सोसायटी ऑफ इंडिया, इंडियन सोसायटी ऑफ ओर्नामेंटल हॉर्टीकल्चर संस्थांच्या सहकार्याने आयोजित प्रदर्शन 18 नोव्हेंबरपर्यत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

@'महान्यूज' 

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget