DNA Live24 2015

निवडणूक काळात सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे : शेखर चन्ने

अहमदनगर :
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची प्रशासनाने चांगली तयारी केली असल्याचे प्रतिपादन राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांनी केले. मात्र, निवडणूक प्रक्रियेच्या आगामी काळात सर्व यंत्रणांनी सतर्क राहून महापालिका निवडणूक शांत आणि निर्भय वातावरणात पार पडतील, यासाठी तत्पर राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात महापालिका निवडणुकीची संबंधित यंत्रणांच्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांची बैठक घेऊन त्यांनी तयारीचा आढावा घेतला. महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, परिवक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी प्रजित नायर, उपायुक्त सुनील पवार आदींची यावेळी उपस्थिती होती. श्री. चन्ने यांनी निवडणूक प्रक्रियेतील सर्व घटकांचा तपशीलवार आढावा घेतला, नामनिर्देशनपत्र भरण्याची प्रक्रिया, मतदार यादी, राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणे मॉडेल मतदान केंद्रांची उभारणी आदींबाबत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांना सूचना दिल्या.

उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाबाबत खर्च नियंत्रण पथकाने दक्ष राहावे, तसेच निवडणूक काळात बॅंकामधून होणार्‍या विविध खात्यांमधील मोठ्या प्रमाणातील निधीच्या हस्तांतरणावरही लक्ष ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. कोणत्याही बॅ्ंकांतून मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण झाल्यास त्याची माहिती तात्काळ निवडणूक यंत्रणेला बॅंकांनी द्यावी, असे निर्देश त्यांनी  बॅंकांच्या जिल्हा अग्रणी अधिकार्‍यांना दिले. याशिवाय, सहकारी बॅंकांतील व्यवहारांवरही लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या. निवडणूक काळात दारु वाटप, पैसे वाटप अशा घटनांवर बारकाईने लक्ष ठेवावे आणि त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करावी. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारु विक्री व साठा यांच्यावर बारकाईने नजर ठेवावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

अहमदनगर महापालिका निवडणूक ही शांततेत पार पडावी, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सांगितले. आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसंदर्भात नेमलेल्या पथकांनी त्यांची दैनंदिन अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने करावी. गरज पडल्यास अधिक पथकांची स्थापना करावी. उमेदवारांच्या विविध ठिकाणच्या बैठका, कार्यक्रम, सभा यांचे चित्रीकरण केले जावे, त्याच्या खर्चाचा तपशील उमेदवाराने दिलेल्या खर्चाच्या विवरणात आहे की नाही, याची खातरजमा करावी, अन्यथा तो नोंदविण्यात यावा, अशा सूचना त्यांनी केल्या. दरम्यान, श्री. चन्ने यांनी श्री. द्विवेदी यांच्यासह सावेडी येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget