DNA Live24 2015

दुधाला जाहिर केलेले दर मिळण्याची मागणी

अहमदनगर :
चौदाव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीचा निधी कपात करण्याचा निर्णय मागे घ्यावा व शासनाने ठरवलेल्या दराप्रमाणे दूध खरेदी करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना देण्यात आले. सदर मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार व कार्याध्यक्ष संजय कोळगे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी नगर तालुकाध्यक्ष मनोज भालसिंग, उपसभापती दिपक पवार, संदीप सोनवणे, धीरज पानसंबळ, शरद शिंदे, सदीप गांगर्डे, अमोल गिरमे, वैभव काळे, राजेंद्र आव्हाड, विठ्ठल कोकाटे, गणेश ठाणगे, गुरूचरणसिंग भटियाणी, आमोल जाधव, बाबाजी तरटे आदिंसह युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यात शेतकरी भीषण दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे. केंद्र व राज्य सरकारने चौदाव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीला विविध विकास कामे करण्यासाठी थेट निधी दिलेला आहे. परंतु राज्य सरकारने या निधीमध्ये 25 टक्के कपात करुन परस्पर हा निधी वीज बिल व पाणीपट्टीच्या नावाखाली संबंधित विभागाला वर्ग केला आहे. वास्तविक पाहता संबंधित पाणीपट्टी अथवा विद्युत देयके राज्य सरकारने माफ केले पाहिजे. परंतु अधिकाराचा दुरोपयोग करून चुकीच्या पद्धतीने 25 टक्के रक्कम ही वर्ग करून घेतलेली आहे. मुळात चालू वर्षी नोव्हेंबर महिन्यात पहिला हप्ता वर्ग करण्याचा विचाराधीन आहे. शासनाच्या निधीची रक्कम तुटपुंजी असताना त्यात कपात केल्याने ग्रामपंचायतीच्या विकास कामावर त्याचा परिणाम होणार आहे. मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायतीने हे देयके अदा केलेली आहेत. परंतु शासनाने त्याही निधीमध्ये कपात करून ग्रामपंचायतीस वेठीस धरण्याचे काम केले असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.
ग्रामपंचायतीचे निधीमध्ये कोणत्याही प्रकारचे कपात करू नये, शासनाने चार महिन्यापूर्वी 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ असलेल्या दुधाला 25 रुपये प्रति लिटर भाव जाहीर केला आहे. आजही ग्रामीण व शहरी भागातील डेअरी चालक हा दर देण्यास नकार देत आहेत. शासनाने अशा दूध संघावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय मुख्यमंत्री व दुग्धविकास मंत्री यांनी घेतला होता. परंतु आजही खाजगी दूध संघ 17 ते 18 रुपये अशा कवडीमोल दराने दूध खरेदी करत आहे. अशाप्रकारे शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे राज्यात शेतकर्‍यांचे शोषण चालू आहे. हे त्वरीत थांबवून दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या दुधाला शासनाने जाहिर केल्याप्रमाणे 25 रु. प्रति लिटर भाव मिळवून देण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget