DNA Live24 2015

#दुष्काळ गाथा | तर चाराही आणावा लागेल रेल्वेने..!

यंदाच्या दुष्काळाची भीषणता अजूनही कोणाच्याच लक्षात आलेली नाही. महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या (म्हटल्या जाणाऱ्या) राज्यासाठी हे चित्र नक्कीच भयावह आहे. कारण एकीकडे दुष्काळी वणवा पेटलेला असतानाच सध्या संपूर्ण राज्य धर्म आणि जातींच्या राजकारणात मश्गुल आहे. आरक्षणासारख्या महत्वाच्या विषयावर सर्वपक्षीय गोंधळ माजलेला आहे. अशावेळी सामाजिक संघटना आणि जनतेच्या आवाज बनलेल्या सामाजिक संस्थाही मूग गिळून बसल्या आहेत. आणि आपणही हा ..नाच उघड्या डोळ्यांनी पाहतोय. मात्र, आपल्या महाराष्ट्राला अजूनही दुष्काळाची तीव्रता लक्षात न आल्याने आपल्यापुढे काय वाढवून ठेवले जाणार आहे याचेही भान आपण हरपलोय. सरकार, सरकारी यंत्रणा आणि विरोधक आपल्याच धुंदीत आहेत आणि आपण आपल्याच... अशावेळी कदाचित पुढच्या एप्रिल-मे महिन्यात पुन्हा एकदा दुष्काळ आणि रेल्वे यांचे समीकरण आणखी घट्ट होईल...

दुष्काळ म्हटला की आपल्याला आठवते १९७२ हे वर्ष. अनेकांनी तो दुष्काळ अनुभवलाय. पण माझ्या पिढीने फक्त त्याची कवने ऐकलीत. आम्ही २००० नंतरचे दुष्काळ पाहिले.. सोसले आणि पचवलेही... २००३-०४ च्या दुष्काळात मीही रोजगार हमी एंजॉय केलीय. नंतरचे दुष्काळही अनुभवले. मात्र, आता आम्हाला दुष्काळ म्हटल्यावर आठवते ती लातूरची वॉटर ट्रेन. होय, कारण ती आम्ही टीव्हीत पाहिलीय. त्यावेळी दुष्काळ पडल्यावर तत्कालीन सरकारने स्वातंत्र्यानंतर कशी पहिल्यांदाच पाण्याची ट्रेन महाराष्ट्रातून फिरवली याची द्वाही जोरात फिरवली. '७० साल मे पहिली बार..'चा तो नारा पाणीदार रेल्वेसाठीही वापरला आणि चक्क या (आधुनिक विचारांच्या) महाराष्ट्रात तो गाजलाही... त्यावेळीच मला आपली पुढची दिशा स्पष्ट जाणवत होती. आणि दुर्दैवाने तेच कुस्वप्न खरे ठरले.

कोणावर राजकीय टीका करण्याचा हेतू नाही. पण फक्त उठसुठ खड्डे खोदून जलसंधारण नाही होत, हेही चार वर्षांपूर्वीच जाणवत होते. (रोजगार हमीतून गव्हासाठी काम करताना आमचाही थोडाफार अशास्त्रीय अभ्यास झालाच होता की..) त्यासाठी शास्त्र अभ्यासून तंत्रशुद्ध उपाययोजना कराव्या लागतात. यापूर्वी त्याच केल्या नाहीत म्हणून आपला ग्रामीण भाग पाण्यासाठी वणवण फिरलाय. आताही ठेकेदार आणि पीकपद्धतीवर अभ्यास असलेल्यांनी (कृषी विषयातील पदवीधर) महाराष्ट्रात जलसंधारण उपाययोजना आखल्या आणि राबविल्या. अशावेळी पाण्यावर अभ्यास असलेले कोणीही सरकारी यंत्रणांना सापडलेच नाहीत हे महाराष्ट्राचे दुर्दैव. तरीही काही ठिकाणी त्यातही चांगले काम झाले. पण तो अपवाद होता. जलसंधारण कार्यक्रम म्हणजे ठेकेदार आणि यंत्रणा यांना पोसणारा पांढरा हत्ती असल्याचाच नियम 'जलयुक्त शिवारा'त आणखी पक्का झाला.

पाण्याचा काटेकोर वापर करण्यासह जोडीने जलसंधारण उपाययोजना राबविण्याची गरज होती. पण आपल्याकडे आधी चुका करून मग त्यावर नियमांचे औषध शोधण्याची परंपरा आहे. तीच कायम ठेवल्याने शिवारे सध्या 'जलमुक्त' झाली आहेत. आमच्याच गावातही एक-सव्वा कोटींच्या जलसंधारण उपाययोजना राबविल्या गेल्या. मागच्या वर्षी पाऊसही उत्तम झाला. पण तरीही पाणी मात्र वर्षभरही टिकले नाही. मलाच आठवतेय आमच्या घराशेजारील तलाव एकदा भरला की किमान २ वर्षे गावात पाणीच-पाणी असे. मात्र, १० वर्षांत चित्र पालटले. एकाच वर्षात नव्हे सहाच महिन्यात तलाव कोरडाठाक पडू लागला आहे. शेतीसाठी पाण्याचा वापर ३०० टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे पाण्याचा योग्य वापर करण्यासाठीची चळवळ हाती घेण्याचा हा काळ आहे. त्यालाच जलसंधारणाची जोड द्यावी लागेल. तेंव्हा गावे खऱ्या अर्थाने पाणीदार होतील.

यंदा माझ्या गावासारखे असेच चित्र महाराष्ट्रात खेडोपाडी आहे. अशावेळी पाण्यासाठीची वणवण आणखी वाढणार आहे. आताच राज्यात हजारो टँकर पाणी वाटीत फिरत आहेत. सरकारी यंत्रणांनी टँकर सुरू करण्यास चालढकल केल्याने हजारो खासगी टँकर जनतेची तहान भागवीत आहेत. काहीजणांनी फळबागा टँकरवर जगविण्याचा नादही सोडून दिला आहे. कारण पंचक्रोशीत त्यासाठी पाणी तरी हवे ना..!

असेच चित्र नगरसह मराठवाड्यातही आहे. मागील दुष्काळात लातूरला टँकरने पाण्याचा पुरवठा करून सरकारी यंत्रणांनी 'कर्त्यव्यपूर्ती' साधली होती. परंतु, यंदा त्याच्याही पुढची पायरी आपला महाराष्ट्र गाठणार असल्याचे माझे मत आहे. यंदाच्या एप्रिल-मे महिन्यात कदाचित या महाराष्ट्रात रेल्वेने जनावरांचा चारा वाटावा लागेल असे दिसतेय. होय, मला याची खात्रीच वाटतेय. कारण मागच्या दुष्काळात आपल्याकडे किमान ऊस हा पदार्थ जनावरांच्या चाऱ्यासाठी तरी उपलब्ध होता. यंदा ज्वारीचा कडबा नाही. मक्याची लागवड खूपच कमी आहे आणि ऊस तर बहुतेक कालवा बागायतीच्या गावातूनच हद्दपार होत आहे. अशावेळी परराज्यातून चारा मागविण्याशिवाय आपल्याला पर्याय नाहीच की...

मग त्यावेळी असा चारा आला की आपले राज्यकर्तेही मोठ्या थाटात 'कर्त्यव्यपूर्ती' केल्यागत घोषणाबाजी करतील. आत्ताच टीव्हीची हेडलाईन कानात गुंजतेय... "आणि आपल्या कार्यक्षम सरकारने यंदा इतिहासात प्रथमच राज्यभर रेल्वेने जनावरांना चारा उपलब्ध करून दिला..."

हे टीव्हीवर पाहताना हा चारा नेमका कोणत्या जनावरांसाठी आणलाय, असाच प्रश्न माझ्या मनात असेल. कारण पाहणारे आणि ऐकणारेही नेमके कोण, असाच प्रश्न मलाही त्यावेळी पडेल. आणि याचे उत्तर देण्याची हिंमत मात्र माझीही नसेल...

- सचिन मोहन चोभे,
संपादक, कृषीरंग

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget