DNA Live24 2015

Blog | #शेवटी_खलनायक_शेतकरीच?


पर्यावरण सुरक्षिततेच्या दृष्टीने भारताचा क्रमांक जगात आज अत्यंत खाली गेलेला आहे. खुद्द राजधानीचं शहर असलेली दिल्ली अत्यंत वाईट हवेसाठी कुप्रसिद्ध आहे. काही दिवसांपूर्वीच खराब हवेमुळे तिथे शाळा कॉलेजं आणि कार्यालयं बंद ठेवायची पाळी आली होती.

सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेतली. प्रदूषण नियंत्रण मंडळाला त्यानंतर शोध लागला की दिल्लीजवळच्या पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये शेतकरी या काळात आपल्या खरीप पिकाचे जमिनीत उरलेले काड (कापणी झाल्यानंतर उरलेले देठ) जाळून ती जमीन रब्बी पिकासाठी तयार करतात. म्हणजे खरिपामध्ये घेतलेल्या भातशेतीचे काड जाळून ती जमीन गव्हाच्या पेरणीसाठी तयार करतात. गव्हाची शेती १५० दिवसांची असल्यामुळे जमीन पेरणीसाठी तयार करायला शेतकऱ्यांना जेमतेम पंधरा दिवस मिळतात. त्यामुळे झटपट काड जळणं हा एकच सोपा उपाय शेतकऱ्यांकडे असतो. हा काळा धूर जवळच्या दिल्लीत पसरतो आणि हवा दूषित करतो असा एक सरधोपट निष्कर्ष प्रदूषण मंडळाने काढला आणि शेतकऱ्यांना काळ जाळल्यास एकरी अडीच हजार रुपये दंड ठोठावला.

प्रदूषणाची समस्या ही गंभीर आहे यात काही शंका नाही. आपल्या शेतीमुळे कोणाचं आयुष्य धोक्यात यावं अशी शेतकऱ्यांची सुद्धा इच्छा नसते. मग यावर काही उपाय आहे का? काड, ज्याला इंग्रजीत स्ट्रॉ म्हणतात, त्याचं व्यवस्थापन तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. त्यात एक विशिष्ट प्रकारचा यांत्रिकी नांगर असतो. जो ट्रॅक्टरने ओढावा लागतो. त्यामध्ये काड आपोआप उपटला जातो. पण तो १००% उपटला जात नाही. त्यामुळे नवी पेरणी केल्यानंतर गव्हाचं उत्पादन कमी होतं ही वस्तुस्थिती आहे. ट्रॅक्टरचा आणि डिझेलचा खर्च, शिवाय ही यांत्रिक उपकरणं यांची एकूण किंमत १५ लाख रुपये आहे. सरकार त्यावर ५०% टक्के सबसिडी देतं. तरीही या तीन राज्यांमध्ये मिळून फक्त २०% शेतकरी त्याचा वापर करतात. हे २०% प्रामुख्याने काही शे किंवा हजार एकर जमिनीच्या मालकीचे शेतकरी असतात. पण उरलेल्या ८०% छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना हा खर्च परवडणं शक्य नाही. शिवाय ही यंत्रणा वर्षातून उरलेले अकरा महिने धूळ खात पडून राहणार. आधीच सर्व बाजूंनी आर्थिक कोंडी झालेल्या शेतकऱ्यांनी हा अतिरिक्त बोजा का उचलावा हा खरा प्रश्न आहे.

काड जाळल्यामुळे जो धूर तयार होतो त्याचा त्रास जर दिल्लीकरांना होतो तसाच तो खुद्द त्या शेतकऱ्याला, त्याच्या मुलाबाळांना सुद्धा होत असणार ना? शिवाय शहरात राहणाऱ्या माणसांच्या प्रश्नांबाबत शेतकरी अतिशय संवेदनशील आहे हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे. नाशिकहून मुंबईवर चालत मोर्चा नेलेल्या शेतकऱ्यांनी मुलांच्या परीक्षा चालू आहेत हे लक्षात घेऊन ऐन मध्यरात्री, मुंबईकरांना काडीचा त्रास होउ न देता आझाद मैदान गाठलं होतं. भले ते सुशिक्षित, उच्चशिक्षित नसतील, पण सूटबूटवाल्या सुशिक्षितांपेक्षा नक्कीच जास्त सुसंस्कृत आहेत.

प्रदूषण मंडळाने दंड जाहीर केल्यानंतर सुद्धा उत्तर भारतातले शेतकरी काड जाळत आहेत अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. एका पत्रकाराने एका शेतकऱ्याशी बातचीत केली तेव्हा त्या शेतकऱ्याने पत्रकाराची बोलतीच बंद केली. "आम्ही काड जाळला की तुमचे डोळे चुरचुरतात, पण दिल्लीच्या रस्त्यांवरून दहा वर्षांपेक्षा जुनी मालवाहतूक वाहनं ये जा करतात त्यावर तुम्ही काय कारवाई करता? पाश्चात्त्य देशात दहा वर्षापेक्षा जुन्या मालवाहतूक वाहनाचा परवाना आपोआप रद्द होत असतो आणि त्याच्या मालकाला ते भंगारमध्ये विकावं लागतं. तुम्ही तो नियम इथे लागू करता का? म्हणून १५ लाख रुपयांपेक्षा १ रुपयाची काडेपेटी आम्हाला स्वस्त पडते."

आर्थिक विवंचनांनी त्रस्त झालेल्या पोतन्‍ना राजन्ना बोमपिलवाड या शेतकऱ्याने नांदेडच्या उमरी तालुक्यातील तुराटी गावात, परवा शेतात स्वतःची चिता रचली आणि त्यात उडी घेऊन आत्महत्या केली. आपल्या डोळ्यात अश्रू आले. सरकार आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं असेल. पण ते दुःखाने नाही. चितेच्या धुरामुळे डोळे चुरचुरले असतील ना? कारण भाजपा सरकारच्या मते, शेवटी शेतकरीच खलनायक आहे.

#बाळासाहेब_थोरात

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget