DNA Live24 2015

चोर जोरात, सर्वसामान्य फेऱ्यात...

शेजारच्या पुण्यात लागू होणार म्हटल्यावर अहमदनगर पोलिसांनाही हुक्की आली आणि त्यांनी नगरात हेल्मेटसक्ती लागू केली. कॉपी करायची किंवा किरकोळ प्रकरणी नागरिकांना नियमाच्या फेऱ्यात अडकवून कार्यक्षमता सिद्ध करण्याची आपली प्रशासकीय परंपरा. त्यात आता सामान्य नगरकर अडकलेत...

नगर शहर असो की जिल्हा सगळीकडेच अवैध धंदे जोरात आहेत. पोलिसांच्या किंवा राजकीय पुढाऱ्यांच्या आश्रयाने गावोगावी हे व्यवसाय बोकाळले आहेत. शहरातही अशा व्यवसायिकांचा जोर आहे. रात्री-अपरात्रीच नाही तर, दिवसाढवळ्या चोऱ्या होताना नगरचे पोलीस ढिम्म आहेत. महिला व मुली असुरक्षित आहेत. कोपर्डी प्रकरण घडल्यावरही याची तीव्रता कमी न होता वाढली आहे. शहरी व ग्रामीण भागातील सर्वसामान्य पोलिसांच्या अकार्यक्षम कार्यपद्धतीमुळे हतबल आहेत.

गावपुढारी व अवैध धेंडांपुढे 'घालीन लोटांगण..' करणारे फक्त पोलिसच नाहीत. महसूल असो की झेडपी, यात एकमेकांपुढे आहेत. त्यावर सर्वपक्षीय पुढारी मूग गिळून गप्प आहेत, तर अधिकारी आपल्याच धुंदीत. अशावेळी मग हेल्मेटसक्तीचा फेरा सर्वसामान्य जनतेला टाकून पोलीस आपली कार्यक्षमता सिद्ध करीत आहेत.

माझा हेल्मेट वापरण्यास विरोध नाहीच. मी ते शक्यतो 85 % वेळा दुचाकीवर वापरतोच. पण ते आवडीने. त्याचीच काय कशाचीही सक्ती मला अमान्य आहे. नगर हे छोटे शहर (मोठे खेडे) आहे. इथे माझे एकदा 2 वर्षांपूर्वी हेल्मेटही चोरीला गेले होते. रस्त्यावरील खड्डे व इतर बाबी बोलायलाच नकोत. त्या समस्या मोठ्या करायला महापालिका व जिल्हा परिषद सक्षम आहेत.

बिगर नंबरच्या, फॅन्सी नंबर प्लेटच्या असोत की चोरीच्या गाड्या. नगर यात आघाडीवर आहे. त्यावर नगरी पोलीस अर्थपूर्ण ढिम्म आहेत. आणि पुढारी, त्यांचे चेले-चपटे आणि गुन्हेगार मस्तवाल आहेत. त्यावेळी पोलीस सामन्यांना हेल्मेटसक्तीच्या नावाखाली लुटत आहेत.

आणि जनताही हे मुकाट्याने सहन करतेय...

@सचिन मोहन चोभे

*(शेअर करण्याची इच्छा वाटल्यास नावानिशी वापरा, एव्हढीच विनंती)

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget