DNA Live24 2015

यशकथा : इच्छाशक्तीमुळे तलाव झाले पाणीदार

अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातील नांदखेड हे गाव एका शेतकरी व्यक्तीच्या इच्छाशक्तीमुळे पाणीदार झाले आहे. या गावातील गणेश पाकदूने यांनी चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर गावाला पाण्याच्या दुर्भिक्षातून बाहेर काढले आहे. आज त्यांच्यामुळे गावातील दोन तलाव पाण्याने डबडबले आहेत. त्याच्या या जिद्दीला लोकसहभागाबरोबरच पाणी फाउंडेशन, भारतीय जैन संघटना आणि अनुलोम संस्था यांची समर्थ साथ लाभली.

नांदखेड हे साधारण १६०० लोकसंख्येच गाव. शेती हाच ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय. कमी पर्जन्यमानामुळे गावात पाण्याचे दुर्भिक्ष असे. गुरा-ढोरांनाही पाण्यासाठी रानोमाळ भटकावे लागत असे. अशा या वातावरणाला गावकरीही कंटाळून गेले होते. तीन वर्षापुर्वी गणेश पाकदूने यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी गावातील पूर्व आणि पश्चिम बाजूला असणाऱ्या तलावातून गाळ काढण्याचा विचार गावकऱ्यांसमोर मांडला. त्यांच्या विचाराला गावकऱ्यांनी साथ दिली. आणि लोकसहभागातून पूर्वेकडे असणाऱ्या तलावातून गाळ काढण्यात आला. त्यानंतर पश्चिमेकडील तलावातील गाळ काढण्यात आला. यासाठी अनुलोम, भारतीय जैन संघटना आणि पाणी फाउंडेशनने यांनी त्यांना मार्गदर्शन करण्याबरोबरच जेसीबी व साहित्यही उपलब्ध करुन दिले. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत तलावातील काढलेला गाळ शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात आल्याने जमीन सुपीक झाली. १०० रुपये ट्रॉलीप्रमाणे शेतकऱ्यांनी आपल्यात शेतात गाळ नेला. साधारण २५०० ट्रीपद्वारे तलावातील गाळ काढण्यात आला.

या उपक्रमासाठी अनुलोम, गावातील विठ्ठल नागरी पतसंस्थेने आर्थिक मदत केली. अनुलोमने केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे दोन्ही तलाव आज गाळमुक्त झाले आहेत. ४५ बाय ७ मीटर लांबीच्या या तलावात आज घडीला सहा मीटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. गणेश यांनी दाखवलेल्या धाडसामुळे गाव आता पाणीदार झाले आहे. गुराढुरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असून जमिनीतील पाणी पातळीतही वाढ झाली आहे. गणेश यांच्या कार्यास गावाचे सरपंच देविदास म्हैसने, विठ्ठल नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष निळकंठ म्हैसने, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद टिकार यांची साथ लाभली.

जिल्हा माहिती कार्यालय
अकोला
@'महान्यूज'

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget