DNA Live24 2015

यशकथा : सौर ऊर्जेवर शंभर हेक्टर क्षेत्राला सिंचन


कोरडवाहू शेतीला सौर ऊर्जेच्या माध्यमातून कायमस्वरुपी सिंचनाची व्यवस्था निर्माण करुन शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल. सौर ऊर्जेवर आधारित उपसा सिंचन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आर्वी तालुक्यातील बोथली नटाळा व पिंपळगाव भोसले या दोन गावांत यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. या अभिनव प्रकल्पासाठी चीनच्या युनॉन रिनेव्हेबल एनर्जी या कंपनीने सौर ऊर्जेवर आधारित यंत्रणा उपलब्ध करुन दिल्यामुळे दोन्ही गावांत शंभर हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. अशा प्रकारचा हा राज्यातील पहिला प्रकल्प ठरला आहे.

आर्वी तालुक्यातील बोथली नटाळा व पिंपळगाव भोसले ही गावे सुकळी मध्यम प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात असूनही येथील शेतकऱ्यांनी कठीण स्वरुपाच्या खडकाच्या भूगर्भाची रचना असल्यामुळे सिंचनाचा या गावांना लाभ मिळत नव्हता. शेतकऱ्यांची बऱ्याच वर्षाची मागणी लक्षात घेऊन नानाजी देशमुख प्रतिष्ठान, जिल्हाधिकारी शैलेश नवाल तसेच मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी सुमीत वानखेडे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर आधारित सिंचन विहिरी उपलब्ध झाल्या आहेत. या प्रकल्पासाठी वर्धा जिल्हा प्रशासनाने वितरण प्रणालीसाठी 30 लक्ष रुपये उपलब्ध करुन दिल्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ मिळाला आहे.

बोथली नटाळा आणि पिंपळगाव भोसले या दोन्ही गावांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी चीनच्या दुतावासाकडून सौर ऊर्जा संच उपलब्ध करुन दिल्यामुळे या दोन्ही गावांना 30 के.व्ही. ऊर्जा निर्मिती सुरु झाली त्यामुळे 30 एच. पी. क्षमतेची विद्युत मोटारपंप कार्यान्वित झाली आहेत. सुकळी मध्यम प्रकल्पातून दिवसातून किमान 5 लक्ष लिटर उपसा होत असून सात ते आठ तास विनाखंड सिंचन करणे शेतकऱ्यांना शक्य झाले आहे. सौर ऊर्जेवर या प्रकल्पामुळे प्रत्येक गावाची सिंचन क्षमता 50 हेक्टर म्हणजे दोन्ही गावांना शंभर हेक्टर सिंचन उपलब्ध झाले आहे. यामध्ये सौर ऊर्जा संच, मोटरपंप आणि मुख्य वहन नलिका चीनच्या दुतावासामार्फत उपलब्ध करुन देण्यात आली. वितरण प्रणालीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे 30 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.सौर ऊर्जेवर आधारित या सिंचन योजनेसाठी बंद नलिका वितरण प्रणालीचा वापर करण्यात येत असल्यामुळे पाण्याचा अपव्यय कमी होऊन प्रत्येक शेतकऱ्यांना समप्रमाणात पाणी उपलब्ध होत आहे. शेतकऱ्यांना सारख्या प्रमाणात नैसर्गिक पद्धतीने पाणी मिळत नसल्यामुळे कोठेही वॉटर मीटरचा वापर न करता वहनाच्या नैसर्गिक नियमातील तत्त्व स्वीकारण्यात आले. यासाठी मुख्य वितरण टाकी बांधण्यात आली असून पन्नास आऊटलेटच्या माध्यमातून पाच भागात विभाजित करण्यात आली आहे. यासाठी दहा शेतकऱ्यांचा समूह तयार करण्यात आला असून पाणी वाहून नेण्यासाठी 110 मि.मी. व्यासाच्या पाईपलाईनचा वापर करण्यात आला आणि शेतीमध्ये 90 मि.मी. व्यासाच्या भूगर्भातील पाईपलाईनद्वारे समप्रमाणात पाणी उपलब्ध झाले. या योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातील दोन झोनमधील 20 हेक्टरचे प्रत्यक्ष सिंचन सुरु झाले.

सिंचन व्यवस्थापनाच्या तत्त्वानुसार लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी पाणी वापर संस्था निर्माण करण्यात येत असून यामधून देखभाल व दुरुस्तीचा खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे शासनावर अवलंबून न राहता संपूर्ण खर्च पाणी वापर संस्थेच्या माध्यमातूनच होणार आहे. त्यासोबतच पाण्याच्या सूक्ष्म नियोजनांतर्गत प्रत्येक शेतकरी शेतात पाण्याच्या साठवणुकीसाठी शेततळे बांधणार असून शेतात येणारे पाणी साठवून घेण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध होणार आहे. या शेततळ्यांच्या माध्यमातून आवश्यकतेनुसार ठीबक व तुषार सिंचन पद्धतीने पिकांचे नियोजन होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली आणणे शक्य होणार असून पिकांना आवश्यक असणारे पाणी नियमितपणे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे उत्पादन वाढीला निश्चितच चालना मिळणार आहे.

आर्वी तालुक्यातील बोथली नटाळा व पिंपळगाव भोसले ही दोन्ही गावे लाभक्षेत्रातील असले तरी कठीण खडकाचा भाग असल्यामुळे पाण्याची पातळी अत्यंत खोल आहे. त्यामुळे बारमाही सिंचन शक्य नव्हते. या योजनेमुळे वर्षभर पाणी मिळणार असून कापूस, ज्वारी, सोयाबीन या पारंपरिक पिकांऐवजी बारमाही ओलिताखालील पिके घेणे शक्य झाले आहे. या प्रकल्पासाठी मृद व जलसंधारण विभागाचे उपविभागीय अधिकारी सुदेश ससाणे तसेच चीनच्या युनॉन रेनिव्हेबल एनर्जी कंपनीच्या सौर प्रणाली व चीन कॉन्सुलेट यांच्या समन्वयाने हा प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. या प्रकल्पाच्या संकल्पनेला जिल्हाधिकारी शैलेश नवल व विशेष कार्य अधिकारी सुमीत वानखेडे यांच्यामुळे मूर्तरुप आले आहे. सौर ऊर्जेवर आधारित उपसा सिंचन प्रकल्प हा पारंपरिक विजेवर अवलंबून न राहता कमी खर्चात जास्तीत-जास्त क्षेत्राला सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करुन देणारा ठरला आहे.

सौर ऊर्जेवर सिंचन ही अभिनव संकल्पना जिल्हाधिकारी शैलेश नवाल जलसंधारण उपविभागीय अधिकारी सुदेश ससाणे तसेच जिल्हा परिषदेचे सहायक अभियंता श्री.लांडगे व कनिष्ठ अभियंता विनित साबळे यांच्या परिश्रमातून वर्धा जिल्ह्यातील बोथली नटाळा व पिंपळगाव भोसले येथे प्रत्यक्ष साकारली आहे.


पावसाच्या लहरीपणापासून मुक्तता

यावर्षी पाऊस लवकर गेल्यामुळे आमची खडकाळ जमीन लवकर कोरडी होऊन लावलेले कपाशी व तुरीचे पीक वाळून गेले असते पण या सोलर प्रकल्पामुळे वेळेवर पिकांना पाणी मिळाले. त्यामुळे पिके तर वाळली पण आमच्या डोंगराळ जमिनीवर येणाऱ्या कापसाच्या उत्पादनात एकरी दोन क्विंटलनी वाढ झाली आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल व चीनच्या दुतावासाच्या प्रयत्नातून हा प्रकल्प साकार झाल्याची प्रतिक्रिया नटाळ्याचे शेतकरी महेंद्र रणनवरे यांनी व्यक्त केली.

सौर ऊर्जेवरील प्रकल्पामुळे पहिल्यांदाच आमच्या शेतात चना व गहू घेत आहोत. त्यासोबत भाजीपाला व मक्याचे पीक घेणार आहोत. या योजनेमुळे आम्ही बारमाही शेती करु शकतो अशी भावनिक प्रतिक्रिया नरेश पंधराम, फकीरचंद कुलसंगे, सचिन पवार आदी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

- अनिल गडेकर
जिल्हा माहिती अधिकारी, नागपूर
9890157788
@ 'महान्यूज' 

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget