DNA Live24 2015

जैवइंधनाच्या निर्मिती आणि वापरावर भर हवा : गडकरी

शिर्डी :
कृषि  शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षणात विद्यापीठाचे मोलाचे योगदान असून सन 2020 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या केंद्र शासनाच्या महत्वपूर्ण उपक्रमात विद्यापीठाचा सक्रीय सहभाग आहे. मात्र, आगामी काळात जैवइंधनाचे महत्व ओळखून त्याच्या निर्मिती आणि वापराबाबत प्रयत्न होण्याची गरज आहे. या क्षेत्रात मोठी बाजारपेठ उपलब्ध असून त्याचा थेट लाभ शेतकर्‍यांना होईल, असे प्रतिपादन रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, जलवाहतूक, जलसंपदा, नदी विकास आणि गंगा सुधार विभागाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या तेहतीसाव्या पदवीप्रदान समारंभात स्नातकांना उद्देशून दीक्षांत भाषण करताना श्री. गडकरी बोलत होते. पदवीप्रदान समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती  चे. विद्यासागर राव होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे जलसंधारण, राजशिष्टाचार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  प्रा. राम शिंदे, कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य आ. शिवाजीराव कर्डिले, आ. भाऊसाहेब कांबळे , आ. प्रकाश गजभिये, अधिष्ठाता (कृषि) डॉ. अशोक फरांदे, कुलसचिव डॉ. दिलिप पवार आदीची उपस्थिती होती.

श्री. गडकरी म्हणाले, खाजगी क्षेत्र वेगाने विस्तारत आहे. तंत्रज्ञान विकास कार्यक्रमांतर्गत’ मेक इन इंडिया’ सारख्या संकल्पना त्याला आधार देत आहेत. उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन करण्याची आपली जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. सध्याची पीकपद्धती ही पारंपरिक आहे. ती बदलून नफ्याची आणि किफायतशीर शेतीची आवश्यकता आहे. त्यासाठी संशोधनाची आणि मार्गदर्शनाची गरज विद्यापीठाने पूर्ण करावी, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंची दरवाढ होते, मात्र शेतमालाला दर मिळत नाही. जागतिक अर्थव्यवस्थेमुळे गरज ओळखून त्याप्रमाणे पीक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. जागतिक स्थितीच्या आधारावर पीक पद्धती विकसित केली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

सध्या जैवइंधनाला खूप महत्व आहे. बाजारपेठेतील या घटकाची गरज आपण ओळखली पाहिजे. इथेनाल, मिथेनालचा वापर अत्यावश्यक झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळेल, असे ते म्हणाले.

केंद्र शासनाने बांबू मिशन अंतर्गत बांबू लागवडीची मोहिम हाती घेतली आहे. सध्या आपण कागदाची आयात करतो. ही आयात थांबवून आपल्या येथील बांबूला बाजारपेठ मिळवून दिली तर शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू शकेल, असे ते म्हणाले.

राज्यपाल आणि कृषि विद्यापीठाचे कुलपती  चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते 45 विद्यार्थ्यांना पीएच.डी., 401 विद्यार्थ्यांना पद्व्युत्तर पदवी व 4010 विद्यार्थ्यांना पदवी असे एकुण 4 हजार 11 पदव्या प्रदान करण्यात आल्या. राज्यपाल राव यांचे हस्ते सन 2017-18 मध्ये बी.एस्स.सी (कृषि) प्रथम आलेली  रुपाली प्रभाकर शिंगारे, बी.एस्स.सी (उद्यान विद्या) मध्ये प्रथम आलेली श्रृती संदिप सावंत, कृषि अभियांत्रिकी मध्ये प्रथम आलेली शिवाणी सर्जेराव देसाई यांना सुवर्णपदक व इतर यशस्वी विद्यार्थ्यांना पदके प्रदान करण्यात आली. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांनी विद्यापीठाचा कृषि शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षणाचा अहवाल सादर केला.

सकाळी साडे दहा वाजता राज्यपाल राव  आणि श्री. गडकरी यांचे कृषी विद्यापीठात आग झाले. सुरुवातीला त्यांनी विद्यापीठ आवारातील महा्त्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील प्रदर्शनालाही भेट दिली. विद्यापीठाने गेल्या ५० वर्षात विकसित केलेल्या विविध वाणांची माहिती याठिकाणी मांडण्यात आली होती.

पदवीप्रदान समारंभास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने तसेच  डॉ. के.व्ही. प्रसाद, डॉ. भास्कर पाटील, श्री. तुषार पवार, श्री. नाथाजी चौगुले, सौ. सुनिता पाटील, डॉ. पंकजकुमार महाले,  डॉ. विजयप्रकाश ठोंबरे,  विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, नियंत्रक श्री. विजय कोते उपस्थित होते. कार्यक्रमास  सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, अधिकारी, शास्त्रज्ञ, प्रगतीशील शेतकरी, विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन डॉ. आनंद सोळंके यांनी केले.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget