DNA Live24 2015

अपंग मतदार दिन कार्यक्रम संपन्न

अहमदनगर :
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्‍या निवडणूक प्रक्रियेमध्‍ये अपंग घटकांना सामावून घेण्‍याच्‍या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने “सुलभ निवडणुका”  (Accessible Elections) हे घोषवाक्‍य जाहीर केलेले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जागतिक अपंग दिनाचे औचित्‍य साधून अपंग मतदारांमध्‍ये लोकशाही व निवडणूक प्रक्रियेबाबत जागृती करण्‍यासाठी जिल्‍हास्‍तरावर जिल्हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी अहमदनगर यांच्या अध्‍यक्षतेखाली “अपंग मतदार दिन ” कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. जिल्‍हयामध्‍ये अपंग मतदारांची नाव नोंदणी कमी असून सर्व पात्र व्‍यक्‍तींनी मतदार नाव नोंदणी करावी व मोठया संख्‍येने आगामी निवडणुकांमध्‍ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

“अपंग मतदार दिन” निमित्‍त सकाळी 10 वाजता जानकीबाई आपटे, मुकबधिर विदयालय, टिळक रोड,  येथून जिल्‍हा महासैनिक लॉन, अहमदनगर पर्यंत दिव्‍यांग मतदारांची प्रभात फेरी काढणेत आली. या  रॅलीचे जिल्‍हा महासैनिक लॉन येथे आगमन झाल्‍यानंतर “अपंग मतदार दिन” च्‍या मुख्‍य कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाची सुरुवात मतिमंद मुलांची शाळा व कार्यशाळा, टिळक रोड अहमदनगर येथील विदयार्थ्‍यांनी सादर केलेल्‍या स्‍वागत गीताने करण्‍यात आली. त्‍यानंतर अपंग संजीवनी - मुक बधिर विदयालय, सावेडीच्‍या विदयार्थ्‍यांनी प्रबोधनपर गीत सादर केले.

उपजिल्‍हाधिकारी तथा उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, यांनी “अपंग मतदार दिन” कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक करुन लोकशाही व निवडणूक प्रक्रिया याबाबत अपंग मतदारांचे उचित प्रबोधन करण्‍यात येऊन, अपंग मतदारांना आयोगाकडून पुरविण्‍यात येणा-या सोई सुविधांबाबत माहिती दिली.  त्‍यानंतर मान्‍यवरांच्‍या हस्‍ते दिव्‍यांग मतदारांना बॅजेस देऊन सन्‍मानित करण्‍यात आले. तसेच जिल्‍हाधिकारी यांच्‍या हस्‍ते प्रातिनिधीक स्‍वरुपात दिव्‍यांग मतदारांना मतदार ओळखपत्राचे वाटप करण्‍यात आले. सदर कार्यक्रमाच्‍या निमित्‍ताने “अपंगांचा सहभाग आणि लोकशाहीचे समृध्‍दीकरण ” तसेच दिव्‍यांग मतदारांसाठी उपलब्‍ध असणा-या सोयी व सुविधा या विषयावर मान्‍यवरांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास उप जिल्‍हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, उपविभागीय अधिकारी श्रीमती उज्‍ज्‍वला गाडेकर, नगरचे तहसिलदार आप्‍पासाहेब शिंदे, तहसिलदार निवडणूक उमेश पाटील,  जिल्‍हा परिषदेचे जिल्‍हा समाज कल्‍याण अधिकारी नितीन उबाळे आदि उपस्थित होते. तसेच जानकीबाई आपटे, मुकबधिर विदयालयाचे मुख्‍याध्‍यापक विजय आरोटे, अपंग संजीवनी-मुक‍बधिर विदयालयाचे अध्‍यक्ष मधुकर भावले, मंतिमंद मुलांची शाळा व कार्यशाळाच्‍या मुख्‍याध्‍यापिका श्रीमती स्‍नेहा महाजन,   अनाम प्रेम-स्‍नेहालयाचे अजित कुलकर्णी  या शाळा व संस्‍था सहभागी झाल्‍या होत्‍या. तसेच राधाबाई काळे, कन्‍या महाविदयालयाच्‍या विदयार्थिनी उपस्थित होत्‍या.  डॉ. शंकर शेळके, श्री. जगन्‍नाथ मिसाळ, श्रीमती तेरेजा भिंगारदिवे, अॅड. लक्ष्‍मण पोकळे, जिल्‍हाध्‍यक्ष प्रहार संघटना, श्री. संतोष सरोदे, राज्‍य अपंग संघटनेचे पदाधिकारी इत्‍यादी जिल्‍हा संनियंत्रण समिती (सुलभ निवडणुका) चे सदस्‍य तसेच जिल्‍हा स्‍वीप समिती सदस्‍य उपस्थित होते.

श्री. उमेश पाटील, तहसिलदार निवडणूक यांनी उपस्थितांचे आभार मानले.  त्‍यानंतर उपस्थित मतदारांना मतदानाची शपथ देण्‍यात आली व राष्‍ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्‍यात आली.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget