DNA Live24 2015

यशकथा : सॅनिटरी नॅपकिन निर्मितीतून महिलांनी धरली उद्योगाची वाट

उघडपणे चर्चा न करता येणारा महिलांच्या मासिक पाळीचा विषय आणि त्यांची कुचंबणा पॅडमॅन चित्रपटामुळे सर्वांसमोर आली. आता या विषयावर पुरुष सुद्धा महिलांच्या आरोग्यविषयक जनजागृतीसाठी पुढे येत आहेत. भारतात या उद्योगाला पोषक वातावरण तयार होत आहे याचा वेध घेत आष्टी तालुक्यातील महिलांनी सॅनिटरी नॅपकिनच्या निर्मितीतून स्वयंरोजगार उभारला आहे. मुख्य म्हणजे कोणत्याही आंतरराष्ट्रीय कंपनीला मागे टाकतील इतके दर्जेदार नॅपकिन या महिलांनी तयार केले आहेत. 

ओम स्वयं सहाय्यता बचत गटाच्या महिलांची ही गगन भरारी चेतन कडू या पॅडमॅनमुळे शक्य झाली. कॉमन सर्व्हिस सेंटर चालविणाऱ्या चेतन कडू यांना कॉमन सर्व्हिस सेंटरकडून अशा पद्धतीच्या उद्योगासाठी प्रस्ताव मागितल्याची माहिती मिळाली. त्यांनी पहिल्यांदा पत्नीला याविषयी विचारले. कुटुंबियांचा पाठिंबा मिळाला तर बचत गटाच्या महिलांसोबत हा व्यवसाय सुरू करू शकते असे अपर्णा कडू यांनी सांगितले. त्यानंतर ओम स्वयं सहाय्यता बचत गटातील महिलांनी सुद्धा यासाठी तयारी दर्शविली. मनाची तयारी असली तरी पैशांची अडचण होतीच. पण म्हणतात ना 'इच्छा असेल तिथे मार्ग सापडतोच', त्याचप्रमाणे जिजामाता पतसंस्था या महिलांच्या मदतीला धावून आली. गटातील धनश्री देशमुख, मंजुश्री काळे, अपर्णा कडू, संध्या काळे, वर्षा देशमुख, रफाक काझी या ६ महिलांनी प्रत्येकी ५० हजार रुपयांचे कर्ज काढले. नॅपिकीन बनविण्यासाठी महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. उद्योगाची उभारणी झाली आणि ३० जून २०१८ ला जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली गेली.

पहिलाच धक्का

महिलांनी पहिल्यांदा तयार केलेले नॅपकिन शाळेतील मुलींना मोफत वाटले. 'अस्मिता' या प्रकल्पासाठी त्यांनी या नॅपकिनचा पुरवठा केला. पण दुसऱ्यांदा पुन्हा शाळेतील मुलींना नॅपकिन देण्यासाठी त्या गेल्या असता त्यांना मुलींनी नॅपकिन घेण्यास नकार दिला. कारण त्याची गुणवत्ता चांगली नाही असे मुलींनी सांगितले. महिलांसाठी हा धक्का होता.

ट्रायल अँड फेल

महिला हे ऐकून नाराज न होता त्यांचा ट्रायल अँड फेलचा प्रयोग सुरू झाला. ६३ कंपन्यांचा सर्व्हे आणि त्यातल्या काही कंपन्यांना प्रत्यक्ष भेट देऊन नॅपकीनच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न सुरू झाले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कंपन्यांच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर त्यांच्यापेक्षा उत्तम दर्जाचे उत्पादन बनविण्यावर त्यांनी भर दिला. त्याचबरोबर त्याची किंमतही माफक राहील याचीही काळजी घेतली. यासाठी लागणारा कच्चा माल त्यांनी बदलला. बनविण्याच्या पद्धतीतही बदल केला.

स्वच्छ आणि सिक्युअर

दोन महिन्यांच्या ट्रायल आणि फेल नंतर उत्तम दर्जाचे 'स्वच्छ सिक्युअर' हे नवीन नाव आणि रूप घेऊन हे नॅपकिन बाजारात दाखल झाले. यामध्ये महिलांची जिद्द, मेहनत आणि हार न मानण्याची त्यांच्यातील गुणवत्ता यांचा चांगलाच कस लागला. तरीही मार्केटिंगचा प्रश्न होताच. इतर उत्पादनांच्या तुलनेत आपले उत्पादन चांगले आहे, हे पहिल्यांदा पटवून देण्यासाठी महिलांनी आष्टीतील सर्व मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन सदर नॅपकिन अतिशय कमी किंमतीत उपलब्ध करून दिले आहेत. आज त्यांच्या नॅपकीनला चांगली मागणी आहे. मुख्य म्हणजे आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या तुलनेत अतिशय स्वच्छ आणि सिक्युअर तर आहेच पण हे पर्यावरण पूरक आहे. जमिनीत गाडल्यावर काही दिवसात त्याचे मातीत रूपांतर होते. केवळ 2 महिन्यात महिलांनी २ लाख रुपयांचा व्यवसाय केला असून सध्या त्यांच्याकडे १ लाख नॅपकिनची ऑर्डर आहे.

पॅड मॅन चा पुढाकार

महिलांना हा व्यवसाय करण्यासाठी अपर्णा कडू यांचे पती चेतन कडू यांनी प्रोत्साहन देण्यासोबतच नॅपकीनच्या गुणवत्तेसाठी संशोधन करण्यात पुढाकार घेतला. अनेक कंपन्यांच्या प्रकल्पाला भेट दिली. त्याचबरोबर विविध कंपन्यांचे नॅपकिन विकत घेतले. हे करतेवेळी अनेकांनी त्यांची कुत्सितपणे खिल्ली उडवली. पण ते महिलांसोबत खंबीरपणे उभे राहिले. आज या पॅडमॅनमुळे महिलांनी वेगळ्या व्यवसायाची वाट धरली आहे. 

- मनिषा सावळे
जिल्हा माहिती अधिकारी, वर्धा
@'महान्यूज'

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget