यशकथा | महिलांनी यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने पडीक जमिनीवर फुलविली भात शेती..!

आज महिला अवकाश यानापासून वैमानिक, लष्करात तसेच अगदी रेल्वे इंजिन चालकापर्यंत सर्वच क्षेत्रात हिरिरीने कार्य करताना दिसत आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा निर्माण करून ‘हम भी कुछ कम नही’ याचं प्रत्यंतर देत आहेत. वेंगुर्ला तालुक्यातील हरितक्रांती गटातील महिलांनी यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने भात लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. चांदा ते बांदा अंतर्गत कृषी व आत्मा विभागाच्या सहयोगाने त्यांनी तीन एकर क्षेत्रावर रत्नागिरी 24 या भाताची यशस्वी लागवड केली आहे. सिंधुदुर्ग व चंद्रपूर या दोन जिल्ह्यांसाठी शासनाने चांदा ते बांदा ही महत्वाकांक्षी व अभिनव अशी योजना सिंधुदुर्गात राबविली आहे. या अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण योजनेतून भात लावणी यंत्र, ट्रॅक्टर, पॉवर टीलर आदी यंत्रे पुरविली जातात.

रेडी गावात हरितक्रांती महिला बचत गट आहे. चित्रा कानयाळकर, विद्या नाईक, अंकिता गावडे यांच्यासह एकूण 11 महिलांनी हा बचतगट स्थापन केला आहे. नेहमीची म्हणजे केवळ लोणची, पापड अशा खाद्य पदार्थांची निर्मितीची वाट न चोखाळता त्यांनी शेतीचा ध्यास धरून वेगळी वाट चोखाळली आहे. या गटाकडे स्वतःची जमीन नव्हती, त्यांनी गावातीलच तीन एकर शेती भात लागवडीसाठी भाडेतत्वावर घेतली. या तीन एकरात कृषि विभागाकडून उन्नत शेती अंतर्गत मोफत भात बियाणे मिळाले. चांदा ते बांदा अंतर्गत कृषी विभाग व आत्माच्या सहयोगाने ट्रॅक्टर, भात लावणी यंत्र मिळाले. तरवा तयार करून रोपांची निर्मिती झाली. आत्माच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत प्रशिक्षण दिले. ‘अनुगामी लोकराज्य महाअभियान’चे अमित नाईक यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं.

गेली 20 वर्षे पडिक असणाऱ्या जमिनीवर हरितक्रांतीच्या महिलांनी रत्नागिरी-24 भात रोपांची भात लावणी यंत्राच्या सहाय्याने यशस्वी केली आहे. या आगळ्यावेगळ्या प्रयत्नांबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. बचत गटातील या महिलांनी कृषि क्षेत्रात रोजगाराची मोठी संधी असते हे सिद्ध केले आहे. कृषि विभागाच्या तांडेल मॅडम, कृषि मित्र सिताराम राणे यांनी या महिलांना भात लागवडीबाबत बहुमोल मार्गदर्शन केले.

– मिलिंद बांदिवडेकर,
जिल्हा माहिती अधिकारी, सिंधुदुर्ग

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*