यशकथा I दूधामुळे मिळाली सारोळा कासार गावाला बरकत…!

राज्याची दूध पंढरी म्हणून असलेला मान वर्षानुवर्षे अहमदनगर जिल्ह्याने कायम राखला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील गावागावांत पशुधनाचा व्यवसाय करणार्या शेतकर्यांचे हात रोजच्या रोज कबाडकष्ट वाहतात. असाच दुष्काळी नगर तालुक्यातील सारोळा कासार हे दुध धंद्यातील कष्टकरी शेतकर्यांचा गाव. या गावाला बरकत आणाण्यात दूधाच्या धंद्याचा मोठा वाटा असल्याने आता गावचे दूध पुण्यातील मगरपट्टा सिटीतील नागरिकांच्याही पसंतीस उतरले आहे.

नगर तालुक्यातील प्रत्येक निवडणूकीत कुकडी धरणातून पाण्याचे लोट आणण्याची लोकप्रिय घोषणा ठरलेली. वर्षानुवर्षे या आवर्षणप्रवण तालुक्याने याच मुद्यावर नेत्यांना मोठे केले. तर नेत्यांनीही तरूणांना कामाला लावणार्या उद्योगांपेक्षा निवडणूकीसाठीचे फंडे वापरून राजकारणाच्या फडात रंग भरून उखळ पांढरे करून घेतले. त्यापैकीच एक राजकीयदृष्टया सक्रीय असलेले गाव म्हणजे रेल्वेचे स्टेशन असलेले सारोळा कासार हे गाव.

या गावातील हजार एकर पडीत जमिनीसह शेजारील घोसपुरी, चिखली, हिवरे झरे या गावातील जमिनींसाठीही नगर व पुणे-मुंबईतील गुंठामंत्र्यांच्या चकरा ठरलेल्या आहेत. गावातील अनेकजण शेतीला कंटाळल्याने एमआयडीसी किंवा कशातही जमिनी गेल्यानंतर मिळणार्या पैशांची चातकासारखी वाट पाहतात. मात्र, तरीही काही शेतकरी दुषकाळावर मात करण्याचा चंग बाधून शेतीसह पशुपालनाचा धंदा करून टामटूमित जगताना याच गावात दिसतात. या गावाला रेल्वेचा परिसस्पर्श लाभल्याचाही मोठा फायदाच झाला. कारण मागील तीस वर्षांत सहकारी दूध डेअर्यांना बरकत असतानाही सारोळकर शेतकरी सकाळच्या पुणे-मनमाड पॅसेंजर गाडीतून नगरला दूधाचे रतीब घालण्यासाठीच जात होते. काळानुरूप मोटारसायकलींचा घरोघर राबता वाढल्याने आता मोजकेचे दूग्धोत्पादक शेतकरी रेल्वेने नगरला दूध देतात. पण आता गावातील दूध टँकरने थेट पुणे शहरातील मगरपट्टा सिटीतील उच्चभ्रू वस्तीची भल्या सकाळी चहाची लज्जत वाढवीत आहे.

सारोळकरांचा दिवस भल्या पहाटेच सुरू होतो. दहा वर्षांपूर्वी तर सहकारी व शासकीय डेअर्यांची चलती असताना दुधवाल्यांना पहाटे तीनलाच उठून कामाला जुपून घ्यावे लागत. आता निवांत सहाला उठूनही खाजगी प्लांटवाल्यांच्या दूध संकलनाच्या गाड्या थेट घरांपर्यंतही येऊ लागल्या आहेत. गावातील 60 टक्के शेतकर्यांकडे म्हशी असून म्हशीचे दूध थेट नगरकरांना रतीबाने देण्यातच मोठा फायदा होत असल्याचे पशुपालक शेतकरी संजय काळे सांगतात. ते म्हणाले की, आम्ही डेअरीला म्हशीचे दूध घातल्यास वीस रुपये लिटरचा भाव मिळतो. तर थोडे कष्ट घेऊन मोटारसायकलव्दारे नगरला जाऊन रतीब घातल्यास 35 ते 40 रुपये लिटरचा भाव मिळतो. पिशव्यांची पॅकिंग करताना कस काढलेल्या दुधाला तीस लिटरचा भाव सरकार देत असतानाच दूध उत्पादक शेतकर्यावर सर्रास अन्याय होत आहे. दुधाला आता सरकारने 25 ते 30 रुपयांचा फि क्स भाव देण्याची गरज आहे.

पुण्यातही दूध विक्री
गावातील उच्चशिक्षीत तरूण सागर गुलाबराव काळे यांनी घेतलेल्या पुढाकाराने काळाबरोबर चालत येथील दूध उत्पादकांनी खाजगीकरणातून उदारीकरणाकडेही वाटचाल केली आहे. याविषयी काळे सांगतात की, मागील वीस वर्षांपासून मी गावातील शेतकर्यांना सहकारी डेअर्या व रतीब घालताना पाहतोय. काळानुरूप झालेल्या बदलातून सहकारी डेअरीला घरघर लागल्याने आमच्या दुष्काळी तालुक्यात खाजगी डेअर्या सुरू झाल्या. परिणामी शेतकर्यांना दूध विकण्याचे पर्याय मिळाले. पण त्याचवेळी जागतिक बाजारातील न्युझिलंड, नॉर्वे, स्विडन आदी देशांतील दूधाची पावडर व दुग्धजन्य पदार्थांनी मोठ्या शहरातील मार्केटवर कब्जा केल्याने आपल्याकडे अजूनही शेतकर्यांना चांगला भाव मिळण्याची वाट पहावी लागत आहे. थंड प्रदेशात होलस्टन फ्रिजीअन, जर्सी यांसारख्या गायी भरपूर दूध देतात. त्याच गायी आपल्याकडील उष्ण हवामानामुळे तत्काळ आजारांना बळी पडतात. परिणामी आपल्याकडे अजूनही संकरित गायींची टक्केवारी कमीच ठेवावी लागत आहे. कमी टक्केवारीमुळे दूधाच्या उत्पन्नावरही विपरित परिणाम होणे सहाजिकच आहे.

हवामानासह दुष्काळही शेतकर्यांची पाढ सोडत नसल्याने आपल्याकडे दूध धंद्याला अजूनही चांगले दिवस येण्याची वाट पहावी लागतेय. आम्ही  पुण्यात दूध नेण्यास सुरूवात केल्याने गावातील शेतकर्यांचाही फायदा झाला आहे. सध्या पुण्यात तीन तर नगरमध्ये दोन हजार लिटर दूध कोणतीही प्रक्रिया न करता विकले जात आहे. लवकरच गावच्या दूधाच्या ब्रँडने प्रक्रिया न केलेल्या स्वच्छ दूधासह होमोजिनाईज्ड व पाश्चराईज्ड दूधाच्या पॅकिंग केलेल्या पिशव्या विकण्यासाठीचे युनिट टाकण्यासाठी आम्ही गावकरी प्रयत्नशील आहोत.

कमी भाव का मिळतोय ?
माझ्या वडिलांनी दूधाच्या धंद्यावरच आम्हा भावंडाना मोठं कलं. सोसायटीच्या डेअरीत दूध घालतानाच आमचं शिक्षाण झालं न् अजूनही दूध काढूनच जगतोय. किराणा दुकानात असलेल्या वानसामानाचे रेट सहा महिन्यांत वाढताना पाहतोय. त्यामुळं किराणा सामानाच्या यादीचा आकडाही वाढतोय. पण याचवेळी आमच्या शेतीतून पिकलेल्या मालाबरूबरच दुधाचा भाव वाढण्यापेक्षा दुषकाळातही कमीच झालाय. नेमकं कोणतं गणित लावून सरकार आमच्या दूधाला बिसलेरी पाण्याच्या बाटलीपेक्षाही कमी भाव देतं, याचंच आम्हाला कोडं पडलंय.
मुकिंदा धामणे, दूध उत्पादक शेतकरी

कोणीच दूधाला वाली नसतोय
आम्ही पंधरा वर्षांपासून जर्सी गायांच्या दुधाचा धंदा करतो. पाच वर्षांपूर्वी गावात असलेल्या सोसायटीत कमी भावातच दूध घालायचो. ती बंद पडून खाजगी चिंलींग प्लँटवाल्यांच्या संकलन केंद्रांना सुरूवात झाल्यावर पहिली तीन वर्षे चांगली गेली. पण आता सरकारने भाव कमी केल्याने व त्यातच खाजगीवाल्यांली मनमानी केल्याने आमची गोची होतेय. नगरच्या एमआयडीसीत असलेल्या डेअर्यांनी अनेकदा जास्तीचे दूध आल्याने फॅट किंवा डिग्री कमी असल्याची बतावणी करून दूधाचे कॅन्ड मागे पाठवलेत. या धंद्यावरचे सरकारी नियंत्रण फक्त भावापुरतेच असल्याचा हा परिणाम आहे. सरकारबरोबरच खाजगीवाले आमच्या दूधाला वाली नसल्यासारखेच दिसतेय.
संदीप जाधव, पशुपालक शेतकरी

धंद्याचे गणित न जुळणारे
दूधाचा धंदा म्हणजे मोठी तारेवरची कसरत असते. आपल्याकडील गावरान, खिलार व सिंधी गायांना कमी दूध येते. तर जर्सी गायांना चांगले दूध येऊनही आजारावरील औषधांचाही खर्च मोठाच असतो. मग या त्रांगड्यात अडकलेल्या पशुपालक शेतकर्यांना या जोडधंद्यातून अनेकदा तोटाच होतो. जागतिक मार्केटचा परिणाम थेट दिसत असल्याने आपल्याकडील दुधाला अजूनही कमीच भाव मिळतात. रोजचा वैरण-पाण्याचा खर्च आता दुषकाळात वाढला आहे. त्यामुळे एका लिटरसाठी सरासरी शेतकर्यांना मजूरीसह वीस ते बावीस रुपयांचा खर्च होत आहे. तर बाजारभावानुसार फक्त पंधरा लिटरचा भाव मिळत असल्याने कबाडकष्ट करून जगविलेल्या जनावरांकडून आता या शेतकर्यांना फुकटातच ही कसरत करावी लागत आहे.
डॉ. श्रीकांत देशपांडे, खाजगी पुशू चिकित्सालय चालक
*
संपर्क
सागर काळे, मो. 9561354495
डॉ. श्रीकांत देशपांडे, मो. 9420746667

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*