शुटींगचे गाव, खामगाव..!

“पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेला वेल्हा नावाचा दुर्गम तालुका आहे. तालुक्यात खामगाव नावाचे सर्वसाधारण गाव आहे. निसर्गाची मुक्त उधळण गावात पहायला मिळते. ग्रामिण बाज टिकवणाऱ्या खामगावाची भुरळ अनेक दिग्दर्शकांना पडली. चित्रपटांच्या माध्यमातून घरा घरात पोहचलेले खामगाव “शुटींगचे गाव” नावाने प्रसिद्ध होत आहे.”

पुणे शहरापासून अवघ्या चाळीस कि.मी.वर खामगाव आहे. पावसाळ्यात भुई फोडणारा पाऊस खामगाव परिसरात पडतो. पावसाचे पाणी अडवण्याचा कोणताच पर्याय गावात उपलब्ध नाही.  थंडीच्या महिन्यातच महिला पाण्यासाठी पायपीट करतात.
पावसाळ्यानंतर गावात काहीच शिल्लक रहात नाही. रोजगाराच्या शोधात तरुणाई शहरात स्थलांतरित होते. त्यामुळे गावात आजी, अजोबा व नातवंडे असा,  कुटूंबाचा नवा पॅटर्न पहायला मिळतो.
खामगाव परिसराला खरीप हंगामच माहीती आहे. रब्बीत कोणतेच पिक हाताला येत नाही. त्यामुळे स्थानिक शेतकरी सुद्धा रब्बीच्या वाट्याला जात नाही.

रब्बीत येते शुटींगचे पिक ..
पावसाळा संपल्यानंतर गावात शुटींगला सुरवात होते. ग्रामिण बाजाच्या चित्रपटांसाठी दिग्दर्शकांना हव्या असलेल्या सर्वच गोष्टी गावात उपलब्ध आहेत. ग्रामिण घरे, बैलगाडी व भांडी गावात ठिक ठिकाणी पहायला मिळतात.  वरील बाबींचा उपयोग चित्रिकरणा दरम्यान झाल्यास त्याचा मोबदला संबंधीत व्यक्तीला मिळतो.
गावच्या प्रवेशद्वाराजवळच दानवे कुटुंबियांचे  पिढीजात दुकान आहे. दुकानासमोर परचुरे वाडा आहे. वाडा व दुकान ग्रामिण बाजाचे असल्याने चित्रिकरणासाठी त्याचा हमखास उपयोग होतो. परिणामी परचुरे व दानवे यांना चित्रिकरणाचे हमखास पैसे मिळतात.

बैलगाडी, विविध प्रकारची भांडी व  ग्रामस्थांना देखिल चित्रिकरणात सहभागी केले जाते. ग्रामस्थांच्या वस्तुंना देखिल शुटींगच्या माध्यमातून मोबदला मिळतो.
चित्रपटाचा दिग्दर्शक नावाजलेला असेल तर उत्तम मोबदला मिळत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. चित्रिकरणा दरम्यान गावकर्‍यांचा सहभाग असल्यास चहा, नाश्ता, भोजनाची व्यवस्था होते.

खामगावचा डाग..
गावातीलच दलित वस्ती जवळ डाग आहे. डाग याचा अर्थ आरामाची जागा असा आहे. वडाच्या झाडाखाली मोठे मोठे दगड आहे. दगडांवर ग्रामस्थ गप्पा मारत असतात. या डागाचा वापर चित्रिकरणा दरम्यान होत असतो. त्याचा मोबदला दलित वस्ती मधील लोकांना दिला पाहीजे, अशी मागणी गावचे माझी सरपंच कचरु मारुती भिंगारे यांनी केली आहे. भिंगारे सरपंच असताना खामगाव तालुक्यातील पहिले निर्मलग्राम असल्याचा जाहीर झाले होते. पुणे शहरातील राजकीय  नेते श्री दिपक पायगुडे खामगावचे रहिवासी आहेत.

दिग्गज कलाकारांची गावाला भेट..
निळु फुले, सदाशीव अमरापुरकर, अशोक सराफ , मकरंद अनासपुरे, सिध्दार्थ  जाधव, विजय चव्हाण, क्रांती रेडकर, निला कुलकर्णी, महेश टिळेकर, मिलिंद शिंदे, या सारख्या दिग्गज कलाकारांनी चित्रिकरणाच्या निमित्ताने गावाला भेट दिली आहे. निळु फुले यांच्या शेवटच्या चित्रपटाचे चित्रिकरण याच गावात झाले आहे.

कलाकारांचा विद्यार्थ्यांवर प्रभाव..
गावात येणारे कलाकार विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतात. कलाकरांनी शाळेला भेट दिल्यानंतर  विद्यार्थांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण होत असल्याचे , शिक्षिका स्वाती शिंदे यांचे म्हणने आहे. लहान मुले  मोठ्यांच अनुकरण करत असतात. कलाकार ज्या पध्दतीने इंग्रजी बोलतात त्याच पद्धतीने शाळकरी मुलं बोलण्याचा प्रयत्न करत असतात. कलाकारांच्या सहवासामुळे शाळेतील मुलांच्या व्यक्तीमत्वामध्ये बदल झाला असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे.

चित्रपटांचे चित्रिकरण ..
गेल्या आठ वर्षांपासून गावात विविध चित्रपट, मालिकांचे सातत्याने चित्रिकरण होत आहे. चित्रिकरणामुळे ग्रामस्थांना रोजगार मिळतो आहे. पाण्या अभावी रब्बी हंगामात पडणारे चेहरे चित्रिकरणामुळे टवटवीत होवू लागले आहेत.
आईच काळीज, गाव तसं चांगल, संत सखु, गोरा कुंभार, एक होती वादी, स्वामी,  मास्तर ऐके मास्तर, पारध, लक्ष्मी या सारख्या अनेक चित्रपटांचे चित्रिकरण गावात झाले आहे. उंच माझा झोका सारख्या गाजलेल्या मालिकेचे चित्रिकरण देखील या गावात झाले आहे.

चित्रीकरणासाठी ‘कर,आकारणी..
दोन वर्षापासून चित्रिकरणासाठी ग्रामपंचायती मार्फत कर अकारला जातो आहे. चित्रिकरणासाठी कर  अकारण्याचा निर्णय उपसरपंच मोहन तोडकर यांनी घेतला होता. कराच्या माध्यमातून गावात विविध सांस्कृतीक कार्यक्रम राबवले जातात. ग्राम उत्सव, शाळेतील स्नेह संम्मेलनासाठी चित्रिकरणामुळे हक्काची रक्कम मिळाली आहे.

ग्रामसंस्कृतीचे पर्यटन केंद्र..
विविध प्रकारच्या पर्यटनासाठी शासनस्तरावर मदत केली जाते. खामगावात ग्रामसंस्कृतीचे अस्सल दर्शन घडते.ग्राम संस्कृतीचे पर्यटन केंद्र म्हणून  गावाचा शासनाने विकास केल्यास स्थानिक लोकांच्या शेतीला जोड धंदा मिळेल. शासनाने पायाभुत सुविधा निर्माण करण्यासाठी सातत्याने गावकर्‍यांना मदत केली पाहिजे. या आशयाची मागणी पोलीस पाटील  तोडकर यांनी केली आहे.

लेखक व छायाचित्र : विशाल केदारी
Mobile : 91 7719860058

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*