दुष्काळी जिल्ह्यात वॉररुम..!

मुंबई :
राज्यातील दुष्काळाची तीव्रता पाहता पाणीपुरवठा योजना, जिल्हास्तर, विभागीयस्तर आणि राज्यस्तरावरील अर्धवट असलेल्या पाणीपुरवठा योजनांना तात्काळ मंजुरी देण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिले.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने गठीत केलेल्या समितीची बैठक मंत्रालयात आज पार पडली. या बैठकीत सर्व जिल्हा अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महसूल मंत्र्यांनी संवाद साधला. यावेळी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन विभागाचे अप्पर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महसूल मंत्री म्हणाले, दुष्काळाची परिस्थिती पाहता तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. जिल्हास्तरावरील पाणीपुरवठा योजनांना जिल्हा अधिकाऱ्यांनी तात्काळ परवानगी देऊन अर्धवट असलेल्या योजना सुरु कराव्यात. तसेच ज्या योजनांची परवानगी विभागीय आणि राज्यस्तरावर घेणे आवश्यक आहे त्यांनासुद्धा लवकर परवानगी देण्यात यावी. टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यापेक्षा पाईप लाईनद्वारे पाणीपुरवठा सुरु करणे आणि कायम स्वरुपी पाणी पुरवठ्यासाठी उपाययोजना करणे यावर सर्व जिल्हा अधिकाऱ्यांनी भर द्यावा, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*