एका एकरात मिळाले ढोबळी मिरचीचे ४२ टन उत्पादन

शेतीत कष्ट करून १८ एकरांवर कष्टाचा मळा फुलविण्यात प्रयोगशील शेतकरी श्री. नागेश काळूनगे (रा. मंगळवेढा, जिल्हा : सोलापूर) यांना यश आले आहे. कोरडवाहू पट्ट्यातील नियमित येणाऱ्या दुष्काळ सामोरे जात त्यांनी त्यांच्या शेतात ज्वारी, करडई, ऊस, डाळिंबासह भाजीपाला पिकांची शेती केली आहे. मागील हंगामात त्यांनी एक एकरावरील शेडनेटमध्ये ढोबळी मिरचीचे ४२ टन उत्पादन घेऊन मुंबईच्या दादर मार्केटला विक्री केली होती. भाव तुलनेने कमी मिळाले. फक्त १८ ते २० रुपये किलोचाच भाव त्यांना मिळाला. मात्र, उत्पादन जास्त झाल्याने त्यातूनही त्यांना बऱ्यापैकी नफा मिळाला.

याबद्दल बोलताना ते सांगतात की, वाळवा तालुक्यातील (जिल्हा : सांगली) येडेनिपाणी येथील अष्टविनायक नर्सरी यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार नोन यू सीड कंपनीच्या आयेशा या ढोबळी मिरचीच्या जातीची लागवड केली. पाणी, खत व कीड-रोगांचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन केल्याने या प्लेटमधून ४२ टन उत्पादन मिळाले. आयेशा या जातीच्या ढोबळी मिरचीचे उत्पादन चांगले मिळते. तसेच मिरची गडद रंगाची व टिकवणक्षमता चांगली असल्याने मुंबईच्या दादर मार्केटला तिला तुलनेने चांगला भाव मिळाला. त्यावेळी आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने १८-२० रुपये किलो भाव मिळाला.

सध्या दुष्काळी परिस्थिती असूनही योग्य पाणी व्यवस्थापन करीत त्यांनी २ एकरावर मोगरा व अर्ध्या एकरावर निशिगंध या फुलांची शेती केली आहे. पुढील १५ दिवसांत त्या फुलांची काढणी सुरू होईल. उत्पादित फुले स्थानिक पंढरपूर मार्केट किंवा मुंबईत विकण्याचा त्यांचा मानस आहे. मुंबईत ते ट्रॅव्हल्सनी फुले व इतर शेतमाल पाठवितात. विहीर व बोअरवेलच्या पाण्यावर योग्य व्यवस्थापन करतानाच आधुनिक शेतीची सांगड घालून त्यांनी शेती फुलविली आहे. मात्र, यंदाच्या कडक दुष्काळाने शेतकरी हवालदिल झाला असल्याची खंत ते व्यक्त करतात.

“शेती म्हणजे कष्टकरी मंडळींच्या जीवनाचा आधार. हाच आधार अनेकदा शेतकरी कुटुंबांना आर्थिक गर्तेतून बाहेर काढतो तर, काहीवेळा त्यात ढकलतोही. चांगला भाव मिळाल्यास शेती नफ्यात असते आणि खूप उत्पादन काढूनही भाव पडल्यास कष्ट करून पदरात तोटा पडतो. शेडनेट करूनही सोलापूर जिल्ह्यात काहींना भाव न मिळाल्याने कर्जबाजारी व्हावे लागले आहे. मात्र, माझ्यासारखे कमी शेतकरी भाव मिळाल्याने बॅंकेचे कर्ज फेडू शकलो. अनेकांना भाव व उत्पादनाचे गणित न जुळल्याने शेडनेट व पॉलिहाऊस विकण्याची वेळ आलेली आहे. इतरांनीही आधुनिक तंत्रज्ञानाचा विचारपूर्वक शेतीसाठी वापर करावा”, असे आवाहन करण्यास प्रयोगशील शेतकरी श्री. नागेश काळूनगे विसरत नाहीत. एका एकरात ढोबळी मिरचीचे ४२ टन असे भरघोस उत्पादन घेतलेल्या प्रयोगशील शेतकरी श्री. काळूनगे यांचे अनुभवाचे बोल नक्कीच शेतीबद्दल विचार करायला लावणारे आहेत.

  • श्री. प्रकाश काळूनगे (मो. ९८२२८२२८२५)
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*