हवामान बदलामुळे जनावरांना न्यूमोनिया

हिवाळ्यानंतर आता उन्हाळ्याच्या तोंडावर पुन्हा एकदा थंडी वाढली आहे. हवामानातील बदलामुळे आता जनावरांना ताप आणि इतर आजार यांची लागण वाढत आहे. श्रीगोंदा तालुक्यातील (जि. अहमदनगर) काही जनावरांना न्यूमोनियाचीही लागण झाली आहे.

न्यूमोनिया मुख्यतः जंतुसंसर्गामुळे होतो. यामुळे श्वासोच्छवासात अनियमितता येऊन जनावरे ठसकतात. तसेच थंडी व ताप यासह फुफ्फुसात पाणी साठल्याने अनेकदा फुफ्फुसांना सूज येऊन श्‍वासोच्छवासाचा वेग वाढतो. चिकट आवरण असलेले शेण पडते. डोळ्यांतून पाणी वाहत राहते. तसेच वजनात लक्षणीय घट दिसते. वातावरणातील बदलांसह गोठ्यातील ओलसर जागेमुळेही या आजाराचा प्रादुर्भाव होतो.

हा आजार टाळण्यासाठी जनावरांचा गोठा स्वच्छ असावा. गोठा बांधतानाच कोरड्या व उंच ठिकाणी असलेली जागा निवडावी. शक्य असल्यास तापमान नियंत्रित करावे. आजारी जनावरांना तातडीने वैद्यकीय उपचार करून घेऊन प्रतिजैविके द्यावीत. कोमट पाण्यामध्ये पोटॅशियम मिसळून त्या पाण्याने वेळोवेळी जनावरांचे नाक स्वच्छ करीत राहावे. कृत्रिम ऊब देण्यासाठी स्वच्छ गोणपाटाचा वापर करण्यासह जनावरांना पौष्टिक आहार देण्याची गरज असते. इतर जनावरांना बाधा होणार नाही यासाठी बाधित जनावरे स्वतंत्ररीत्या वेगळ्या ठिकाणी बांधावे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*