शेळीचे दुध : बहुगुणी आणि आरोग्यदायी

शेतासह जंगलातील कोणताही झाडपाला सहजपणे खाणारी शेळी आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. अनेकांना मटन खाण्यासह दुधासाठीही शेळीचे महत्व वाटते. तर, काहींना शेळीच्या दुधाला येणाऱ्या विशिष्ठ वासामुळे हे बहुगुणी व आरोग्यदायी असे दुध नकोसे वाटते. मात्र, या दुधातून आपल्याला बरीच पोषक तत्त्वे मिळतात. या दुधात जीवनसत्त्वे, प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, खनिजे असे महत्वपूर्ण घटक असतात.

बहुगुणी असे हे दुध पचनास हलके असते. या दुधातील स्निग्ध पदार्थाच्या कणांचा आकार गाय व म्हशीच्या दुधापेक्षा सूक्ष्म असतो. म्हणूनच मातेचे दुध बाळाला मिळत अससल्यास शेळीचे दूध बालकांना पाजले जाते. हे दुध पचवताना हानिकारक जिवाणूंपासून संरक्षण देणारे काही जीवाणू आपोआपच तयार होतात. यातील काही घटक नंतर प्रोबायोटीक म्हणून कार्य करतात. यातून रोगकारक जिवाणूंची वाढ रोखली गेल्याने संसर्गजन्य आजारांपासून दुध पिणाऱ्या व्यक्ती व बालकांचे संरक्षण होते.

यात अ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असते. शरीराच्या समतोल व सदृढ वाढीसह डोळ्यांचे आरोग्य यामुळे उत्तम राहते. शरीरात तयार होऊ न शकणारी, वाढ व रोगप्रतिकारक शक्ती आणि संपूर्ण आरोग्यासाठी गरजेची असणारी अमिनो आम्ले शेळीच्या दुधात मोठ्या प्रमाणात असतात. हे आम्ल हृदय व रक्तवाहिन्यांच्या सक्षम कार्यास उपयोगी आहे. यामुळे रक्तदाब नियमन होते. तसेच मेंदूची क्षमता वाढते. या दुधात कॅल्शिअम, फाॅस्फरस, पोटॅशिअम व मॅग्नेशिअम ही खनिजेद्रव्ये मुबलक असतात. यामुळे हाडे मजबूत होतात. तसेच या दुधाच्या गुणधर्मामुळे आतड्यांचा दाह कमी करण्यासाठी मदत होते. असे हे दुध लहान बालकांसह मोठ्यासाठीही आरोग्यदायी आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*