Blog | शेतात गाळ टाका, उत्पादनवाढ करा

भारतात शेत जमिनीतून दर वर्षी ६०० कोटी टन गाळमाती व ५० लाख टन नत्र ,स्फुरद व पालाश, तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील जमिनीतून ५० कोटी टन माती व ४.५ लाख टन नत्र ,स्फुरद व पालाश हि अन्नद्रव्ये पावसाच्या वाहणाऱ्या पाण्यामुळे वाहून जातात. संशोधनांअती असे दिसून आले आहे कि, गेल्या ६५ वर्षाच्या काळात, ४५ से.मी.पेक्षा जास्त खोल असलेल्या जमिनीचे प्रमाण ४६ टक्क्यावरून २९ टक्क्यापर्यंत कमी झाले आहे, तर ४५ से. मी. पेक्षा कमी खोल असलेल्या जमिनीचे प्रमाण ५४ टक्क्यावरून ७१ टक्क्यापर्यंत झाल्याचे निदर्शनास आले आहे.या जमिनीवरून गाळ वाहून जाण्याचे प्रमाण किती आहे हे लक्षात येते.प्रती वर्षी काळ्या जमिनीतून गाळ्याच्या रुपाने वाहून जाणाऱ्या मातीचे प्रमाण ५२ टनापर्यंत आढळून आले आहे. साधारणपणे १ से.मी. जाडीचा थर गाळ्याच्या रुपाने वाहून जाण्यास २६ ते ५१ वर्ष लागतात.परिणामी जमिनी निकृष्ट बनून तिची उत्पादन क्षमता कमी होते.हि जमीन पूर्ववत आणण्यासाठी वाहून जाणारी गाळाची माती, परत शेतात पिकाचे शाश्वत उत्पादन ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. या दोन संपत्तीचे जतन व विकास करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने जवळ जवळ ९० टक्के क्षेत्रावर पावसाचे वाहणारे पाणी व माती जमा करण्याकरिता पाझर तलाव, साठवण तलाव, सिमेंट बंधारे आणि शेततळी इत्यादी कामे विविध योजनेतून करण्यात येत आहे.

सध्या सम्पूर्ण महाराष्ट्रात जलयुक्त शिवाराच्या अभियानाच्या माध्यमातून मोठया प्रमाणात पाणी साठवण तलाव, पाझर तलाव, नाला बांध, सिमेंट नाला बांध,शेततळी,लघु व मध्यम पाटबंधारे प्रकल्प इत्यादीतील गाळ माती काढण्याचे काम चालू आहे, परंतु या गाळमातीचा वापर कसा करावा या बाबत शेतकरी अनभिन्न आहेत. प्रस्तुत लेखात गाळमातीचा योग्य वापर कसा करावा या विषयी माहिती शेतकऱ्यांच्या तसेच जलयुक्त शिवाराच्या अभियाना सबंधीत कार्यकर्त्यांच्या उपयोगी पडेल.

पावसाळ्यात जास्त तीव्रतेच्या पडणाऱ्या पावसामुळे मातीचे कण मोकळे होऊन,पाण्याच्या प्रवाह बरोबर वाहून जातात आणि पाणी साठवण,यांत्रिकी मृद व जल संधारण पद्धतीत जमा होतात. त्यास गाळमाती असे संबोधले जाते.अशा प्रकारे सतत गाळ साठत जात असल्यामुळे ग्रामीण भागातील पाणी साठवण तलाव, पाझर तलाव, नाला बांध, सिमेंट नाला बांध,शेततळी,लघु व मध्यम पाटबंधारे प्रकल्प इत्यादीची पाणी साठवण क्षमता कमी होत आहे.त्यामुळे या मृद व जलसंधारण कामांची उपयुक्तता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.परंतु या जमा झालेल्या गाळमातीत पिकांना पोषक अन्नद्रव्ये आणि चिकण मातीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यांमुळे शेतीतील पिकांच्या वाढीसाठी फार उपयोगाची आहेत.गाळमाती वापरामुळे हलक्या व मध्यम जमिनीची कमी असलेली सुपिकता वाढविता येतेच परंतु तिची ओलावा साठवण क्षमता सुद्धा पूर्ववत वाढविली जाते.तसेच अशा गाळमातीत नैसेर्गिक अन्नद्रव्ये,सेंद्रिय पदार्थ आणि चिकन मातीचे प्रमाण जास्त असल्यामुळे ती परत जमिनीत टाकल्यामुळे त्यांचा परत पिकास चांगला उपयोग होतो. या सर्व बाबी विचारात घेता पाणी साठवण पद्धतीतील निरुपयोगी अवस्थेत पडून असणार गाळ दर पाच वर्षांनी उन्हाळी हंगामात काढून तो हलक्या आणि मध्यम जमिनीत मिसळणे हा एक आकर्षक आणि फायदेशीर मार्ग आहे.त्यामुळे कमी झालेली पाणी साठवण क्षमता पूर्ववत ठेवली जाते.

सर्वसाधारण शेतकरी बंधू,तलावामधील साठलेली गाळमाती फळबाग लागवड करताना खड्डे भरण्यासाठी वापरतात किंवा उथळ हलक्या जमिनीत सुपिकता वाढवण्याच्या उद्देशाने शेतात पसरतात.गाळमाती टाकत असताना तिच्या भौतीक, रासायनिक आणि जैविक गुणधर्माचा अभ्यास केला जात नाही. त्याकडे दुर्लक्ष केले जाते.हि गाळमाती टाकताना निरनिराळ्या प्रमाणात, शेताच्या गरजेचा जमिनीच्या मगदुराचा, शेतीचा सुपिकतेचा विचार न करता टाकली जाते, त्यामुळे काही वेळा जास्त प्रमाणात गाळ मातीचा वापर केला गेल्यास अशा जमिनी पाणथळ किंवा चोपण होण्याचा धोका संभवतो.गाळमातीची मर्यादित उपलब्धतता वाढवण्यासाठी, प्रत्येक शेतात गाळ वापराची मर्यादा निश्चित करणे आवश्यक आणि महत्वाचे आहे.यासाठी पारंपारिक पद्धतीत सुधारणा करून, गाळ मातीचा वापर करावयास हवा.
शेतीसाठी,पावसाचे पाणी साठविणे आणि भूजलसाठा पूर्ववत करण्याच्या उद्देशाने पाझर तलाव, पाणी साठवण तलाव, शेततळी, नालाबांध, सिमेंट नाला बांध, लघु व मध्यम पाटबंधारे प्रकल्प निरनिरळ्या योजनेमार्फत पूर्ण केले आहेत. परंतु प्रकल्पाच्य देखभाल व निगा याकडे दुर्लक्ष होत असल्याने या साठवण पद्धतीत सतत गाळ साठवण्याची क्रिया होत असल्यामुळे पाणी साठवण क्षमता कमी होत आहे. तसेच पाण्याचा निचरा, जमिनिचा वापर आणि पाण्याची प्रत या बाबीवर विपारित परिणाम दिसून येतो. कोरडवाहू शेतीत पुरेसा जलसाठा जो जमिनीवरून किंवा जमिनीतून निचरा होऊन जातो तो साठविणे आणि साठीवलेला पाणी साठा पिक उत्पादन वाढीसाठी उपयोगात आणता येतो. याकरिता दर पाच वर्षांनी पाणी साठविण्याचा मृद व जलसंधारण यांत्रिक पध्दतीतील गाळ बाहेर काढून त्याचा शाश्वत पिक उत्पादनासाठी कार्यक्षम वापर करणे हा एक महत्वपूर्ण नैसर्गिक उपाय आहे. जेणे करून पाण्याची उपलब्धतता व प्रत वाढेल.
गाळमाती मात्रा निश्चित पद्धती

शेतात उपयोगात आणावयाच्या गाळमातीचे आणि ज्या शेतात गाळमाती वापरावयाची आहे, त्या ठिकाणच्या मातीचे भौतिक व रासायनिक पृथःकरण करणे आवश्यक आहे. त्यातील चिकनमातीचे प्रमाण अजमावणे महत्वाचे आहे. गाळमातीची मात्रा निर्धारित करण्यासाठी (www.cridaernet.in) या संकेतस्थळी खालील अग्रलेख केल्याप्रमाणे सूत्र विकसित करण्यात आले आहे.

एक्स

* शेतात गाळमाती टाकण्या करीताचे सूत्र एन = ——————
२५ वाय

एन= एक हेक्टर क्षेत्रासाठी गाळमातीच्या वापराव्या लागणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॅाल्या.
एक्स=रब्बी ज्वारीसाठी नत्र खताची शिफारस खतमात्रा ५० किलो/हेक्टर
वाय= गाळमातीतील उपलब्ध नत्राचे शेकडा प्रमाण (0.0४१२%)

वरील सूत्रानुसार एक हेक्टर क्षेत्राकरिता ४९ ट्रक्टर ट्रोल्या गाळमातीच्या लागतील.त्याकरिता शेतकरीबंधुनी वरील सूत्रांचा वापर करावा. सर्वसाधारणपणे रब्बी पिकाची काढणी झालेल्या शेतात एप्रिल/मे महिन्यात गाळमाती टाकावी.
गाळमातीमध्ये नत्र, स्फुरद व पालाश हि प्रमुख अन्नद्रव्ये आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे जमिनीचे भौतिक,रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारण्यासाठी मदत होते. गाळाची माती वापरल्यामुळे रासायनिक खत वापराचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि जमिनीत ओलावा साठविण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी निश्चितच उपयोगाचे आहे.गाळमातीचा वापर उथळ व मध्यम खोलीच्या जमिनीत केला असता,त्यातील पोषक अन्न्द्रव्यांमुळे जमिनीची सुपिकता वाढते आणि पिक उत्पादनात शाश्वतता येते. गाळमातीच्य वापरामुळे पडीक जमिनीसुद्धा पिक लागवडीखाली आणता येतात.तत्पुर्वी गाळमातीची प्रत व प्रमाण निश्चित करणे आवश्यक आहे.
सोलापूर जिल्ह्यात घेतलेल्या गाळमातीच्या प्रात्यक्षिकातून रब्बी ज्वारीच्या धान्य व कडबा उत्पादनात आणि ओलावा वापर क्षमता वाढल्याचे दिसून आले आहे. अशा रीतीने गाळमातीचा कार्यक्षम वापर केल्यास निकृष्ट जमिनीची उत्पादनक्षमता, सुपिकता व ओलावा साठवण क्षमता वाढविता येते.
गाळमाती वापरताना घ्यावयाची काळजी
गाळमाती वापराचा चांगल परिणाम साध्या करण्यासाठी फक्त गाळमाती जमा करून शेतातील मातीत चांगली मिसळावी.
हलक्या आणि कमी पाणी धरून ठेवण्याची क्षमता असलेल्या जमिनीस गाळमाती वापरताना प्राधन्य यावे.
गाळमाती व शेतजमिनीतील चिकणमातीच्या प्रकारानुसार गाळवापर मात्रा निर्धारित करावी, त्यामुळे गाळमातीचा कार्यक्षम वापर करता येईल.
सर्वसाधारणपणे मार्च-एप्रिल महिन्यात पाणी साठवण पद्धीतीतील पाणी आटल्यामुळे कोरड्या पडतात, त्याचवेळी गाळमाती साठवण पद्धीतीतून बाहेर काढणे सोयीचे ठरते, अशावेळी गाळमाती शेतात पसरावी. पाच वर्षातून एकदा साठवण पद्धीतीतील शेतात गाळमाती बाहेर काढून शेतात पसरावी.
गाळमातीत जास्त प्रमाणात ओलावा धरून ठेवण्यासाठी गाळमाती पसरलेल्या शेतात खरीप हंगामात मूलस्थानी जलसंधारण पद्धतीपैकी जमिनीच्या मगदुरानुसार व उतारानुसार बंधिस्त वाफे, सपाट वाफे व सरी वरंबे करून त्या शेतात रब्बी हंगामातील पिकांची लागवड करावी.
हलक्या व मध्यम जमिनीत फळबाग लागवड करताना खोदलेल्या खड्ड्यात किंवा शेताच्या उतारास आडवे चर खोडून त्यामध्ये गाळमाती भरावी, तत्पूर्वी गाल्मातीच्या प्रत व मातीची तपासणी करणे आवश्यक.
गाळमातीचा सामू ८.५ पेक्षा जास्त आणि २.५ डेसिसायमन प्रती मीटर जास्त असल्यास गाळमाती शेतात पसरू नये.
पाणी साठवण पद्धतीतील काठावरील माती खोदुन शेतात पसरू नये.
चांगल्या प्रतीची गाळमाती बांधकामासाठी लागणाऱ्या विटा तयार करण्यासाठी किंवा बिगर शेतीसाठी वापरू नये.
चुनखडीयुक्त गाळमाती शेतात पसरण्यासाठी वापरू नये, अशा गाळतीचा वापर केल्यास जमिनीतील उपलब्ध अन्न्द्रव्यांवर विपरीत परिणाम होतो आणि पिकाची उत्पादकता घटते.

लेखक : डॉ. आदिनाथ ताकटे,
प्रभारी अधिकारी,
मध्यवर्ती रोपवाटिका ( बियाणे ),
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
O- 02426-243338 Mo. ९४०४०३२३८९

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*