Blog | सगळेच चौकीदार, मग चोर कोण..?

पप्पू म्हणून हिणवल्यानंतरही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शांत राहून त्यावर प्रतिक्रिया देणे टाळले. फक्त एकदाच संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झप्पी देऊन त्यांनी कृतीने प्रत्युत्तर दिले. त्याने तिळपापड झालेले भाजप भक्त व ट्रोलसैनिक मग पुन्हा नव्या दमाने गांधी यांच्यावर तुटून पडले. शेलकी विशेषणे वापरून भाजप आणि संघ परिवाराने गांधी देशाचे नेतृत्व करण्यास असमर्थ असल्याचे बिंबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोही लोकसभा निवडणुकीत उपयोगी ठरत नसल्याचे पाहून आता मोदी यांच्यासाठी पक्षाध्यक्ष अमित शाह आणि सगळेच चौकीदार बनून पुढे आले आहेत.

राफेल विमान खरेदी प्रकरणात केंद्र सरकार फसवणूक करीत असल्याचे जनमानसावर बिंबवण्यात काँग्रेस यशस्वी झालेली दिसते. तसेच शेतकरी व कष्टकरी यांच्या आर्थिक प्रश्नांमुळे आता 2014 ची काँग्रेसविरोधी लाट पूर्णपणे ओसरली आहे. त्यावेळी चहावाला म्हणून अच्छे दिनचे दाखविलेले स्वप्न पूर्ण करण्यात मोदी-शाह यशस्वी ठरले नाहीत. त्यामुळे यंदा ते पुन्हा नव्याने राष्ट्रवाद हा मुद्दा हातात घेत चौकीदार म्हणून पुढे येत आहेत. त्यासाठी भाजपच्या सगळ्यांनी मी चौकीदार हा ट्रेंड सेट केला आहे.

राफेल मुद्यावर चौकीदार चोर आहेत, अशी हाक देत राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या मनात जान आणली. त्यानंतर आपल्याकडे राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांनी हा नवा वाक्प्रचार जोरात वापरला. चौकीदार चोर आहे, हा ट्रेंड सेट करण्यात राहुल गांधी यशस्वी ठरले होते. त्यातच पुलावमा ही दुर्दैवी घटना घडली. अभिनंदन यास पाकमधून पाठीमागे आणण्यासाठी जगातील बहुसंख्य देशांनी मदत केली. पाकनेही मग आपण कसे दहशतवादी नाहीत, हे दाखविण्यात यश मिळवत चीनसह काही देशांची सहानुभूती मिळवली. मात्र, पुलावमा घटनेने भाजपच्या पोकळ शिडात खऱ्या अर्थाने हवा भरली.

पुलावमाचे राजकारण आणि राष्ट्रवाद चेतवून ही लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजप सरसावला आहे. त्यासाठी मी चौकीदार हा ट्रेंड करण्यात आला आहे. देशात असे सगळेच जर चौकीदार झाले, तर शेतकरी बांधवांना लुटणारे चोर कोण, हा कळीचा मुद्दा बाजूला नक्की पडतो. त्याचे भान शेतकऱ्यांना न उरल्यास पुन्हा एकदा या निवडणुकीत कुंपणच शेत खाण्याची शक्यता आहे. त्यातून चौकीदार शिरजोर होतील आणि शेतकरी व कष्टकरी चोर ठरतील. त्यासाठी जागतो रहो…

लेखक : सचिन चोभे, संपादक, कृषीरंग

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*