..तिथेही पाहिजे ‘जाती’चेच !

होय, सुरक्षिततेचं कवचकुंडल असणारी सरकारी (डबक्यातली) नोकरी असो की खासगीमधली वेठबिगारी ‘सेवा’. ती मिळवणंही बाता मारण्याइतकं सोप्पं नसतयं. त्यातही नोकरी मनाजोगती असल्यासही हरकत नाही. (अशा आवड व छंद म्हणून नोकरी करणा-यांवर हे नाही. त्यांची आधीच माफीही मागतो.) पण फक्त पैसे मिळतात म्हणून पोटार्थी नोकरदार होण्याचीच नवी परंपरा बहुजन समाजात रूजलीय. होय, ही परंपरा कोणी रुजविलेली नाही. बहुजन समाजाने झापडबंद राहुनचं ही परंपरा आपणहून लादून घेतलीय. नोकरी करणा-या बहुजनांवर आज हा का तोंडसुख घेतोय बुवा, असाच प्रश्न पडलाय ना? कारण धंदा करायलाही पाहिजेत ‘जाती’चेच…

होय काल सायंकाळच्या (चार तासांपूर्वीच्याच) एका घटनेनं अशा विचारांना चालना मिळाली. कारणही तसंच घडलं ना..! आईच्या आदेशानुसार नगर तालुका मार्केट कमिटीच्या आवारात काल पेंड खरेदीला गेलो होतो. दिवसभराच्या कामाच्या घबाडग्यात रात्री उशीराच म्हणजे आठनंतर पोहोचलो मार्केटात. काही दुकानं चालू होती. पण बहुसंख्य बंद…

तरीही एका चालू असलेल्या दुकानासमोर गाडी थांबविली. दुकानदार (‘शेठ’ म्हणायचं विसरलोच की… सॉरी) होते गल्ला मोजीत बसलेले. एकटेच. दुकानात मोठा फोटो दिसला छत्रपतींचा. शेजारीचं आमदारांसमवेतचाही झाक फोटो लक्ष वेधीत होता. दोन्हींपैकी एका महान व्यक्तिमत्वाला वंदन करून, तर दुस-यांबद्दल अनादर भावनेचा विचार करीत घुसलो आत. शेठच्या अंगावर कांजीचा पांढरा शर्ट अन् तोंडात ‘सु’गंधी मावा…
मी म्हटलं, ‘शेंगादाणा पेंड पाहिजेत…’
शेठ : हमाल गेलेत आता. उद्या सकाळीचं भेटलं.
मी : कशाला परत चक्कर मारायला लावताय? या बाहेरच्या दोन्हीपैकीच एक घेतो. टाकू आपणचं दोघं गाडीवर…
शेठ : नाही ओ. उद्याचं या. नाहीतर टाकताय का एकटेच? मग करतो बील…

एका तपापूर्वी रोजगार हमीचं काम ‘एंजॉय’ करणारा मी आता ‘पोटार्थी’ झालोय. त्यावेळी पोतं उचलणारा मीच आता गोणी उचलली की टिचं भरल्यानंतर दोनेक दिवस घरात बसतोय. असा मोठा बदल माझ्यातही झाल्यानं एकट्याला हे शक्य नसल्यानं नाईलाजास्तव मुकाट्यानं काढता पाय घेतला मीही…

म्हटलं उद्याचं यावं लागेल. ‘पण पहावं आहे का पुढचं एखादं दुकान उघडं आहे का,’ असा विचार करून गाडीचं बटण दाबलं. तीनेक मिनिटांतच एक दुकान दिसलं उघडं. बाहेर सगळ्या पेंडींसह वालीस व पशुखाद्याचे नमुने मस्त ठेवलेले. मी यापूर्वीही ब-याचदा येथून ‘शॉपिंग’ केलेली होती. गेल्यावर पाहिलं तर, एक ज्येष्ठ नागरिकवजा दुकानमालक गल्ला मोजत होते. मी म्हटलं, ‘इथंही नाही भेटणार वाटतयं पेंड.’ असा विचार करूनही म्हटलं, ‘ शेठजी, नमस्कार. हमाल नाहीत का?’
मालक : नाही गेलेत सगळेच. पण काय काम होतं?
मी : शेंगादाणा पेंडीची गोणी घ्यायची होती. पण जाऊ द्या. येतो मग उद्याचं.
मालक : अर्जंट होती का? मग घेऊनचं जा की. मुलगा येईलचं. तुम्ही न् तो उचलून टाका गाडीवर.
मी मनात साशंकचं होतो. हे तर ज्येष्ठ नागरिक अन् ह्यांच्या मुलानेही उचलायला नकार दिला तर…

इतक्यात त्यांचा मुलगाही आला मोपेडवरून. वय असेल पन्नाशीच्या दरम्यान. ते म्हणाले, ‘बाबा, झाला का हिशोब…’
मोठे मालक : होय झालाय. ह्यांना शेंगादाणा पेंड हवीय अर्जंट. दाखवं बरं.
लहान मालक : ह्या आहेत व्हरायटी. पाहून घ्या. मग आपण दोघंही मिळून टाकूयात गाडीवरती गोणी..!

मग मी एक व्हरायटी सिलेक्ट करून दाखविल्यावर बिल करून पैसे दिले. आम्ही दोघांनीही मिळून गाडीवरती पेंडीची गोणी ठेवली. मला गाडी डबल स्टैंडवरून काढून हेल्मेट चढवेपर्यंत लहान मालक गाडीजवळचं..! मग मीही त्यांचे आभार मानून गाडीचं बटणं दाबलं. निघताना दुकानातलं मोठ्या अक्षरातलं ‘जय जिनेंद्र’ दिसलं अन् गाडीबरोबरचं डोक्यातलं विचारचक्रही वेगानं फिरायला लागलं…

विचारादरम्यानं, मलाच माझी ‘जात’ आठवली. बहुजन समाजातील (सु)शिक्षित आडाण्यांचे गावोगावचे अड्डे आठवले. व्यवसाय व धंद्याबाबतची नकारात्मकता आठवली. बहुजन धंदेवाईकांमधील अपयशाची टक्केवारी आठवली. याच समाजाची नोकरीसाठी वट्टेल ते करण्याची वृत्ती आठवली. ह्यांच्या शिक्षितांची बेरोजगारी आठवली… अन् जुनी म्हणही डोक्यात घुमतं राहिली…

..तिथेही पाहिजे ‘जाती’चेच..!

(संपली आमची गोष्ट न् बाबुर्डी पोस्टं…)

@सचिन मोहन चोभे, अहमदनगर (मो. 9422462003)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*