भाजपला झटका; कर्डिले राष्ट्रवादीत..?

अहमदनगर :
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या पक्ष बदलाच्या हालचाली वेगाने घडत आहेत. नगर जिल्ह्यातही सुजय विखे यांनी उमेदवारीसाठी भाजपावासी होण्याचा निर्णय घेतला तर, आता नगर तालुक्यातील बुर्‍हाणनगर येथील रोहिदास कर्डिले यांनी राष्ट्रवादीशी घरोबा करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. भाजपला हा मोठा झटका मनाला जात आहे. तसेच कर्डीले गट दुभंगण्याची शक्यता आहे.

राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांची भाजपमध्ये मोठी ताकत आहे. त्याच ताकदीच्या भरवशावर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे पुत्र सुजय विखे यांनी लोकसभा निवडणूक भाजपतर्फे लढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते भाजपमध्ये गेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत वजन वापरून त्यांच्यासाठी नगर दक्षिणेतून उमेदवारीही मिळवली आहे. नगर दक्षिणेत कर्डिले यांच्यासह आमदार मोनिका राजळे व पालकमंत्री राम शिंदे यांचीही साथ सुजय विखे यांना मिळणार आहे. मात्र, राष्ट्रवादीने या मतदारसंघातून आमदार कर्डिले यांचे जावई व नगरचे आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी देत कर्डिले यांना कोंडीत पकडले आहे.

ही कोंडी कर्डिले कशी फोडणार असा प्रश्न असतानाच कर्डिले यांचे पुतणे व बानेश्वर दूध संघाचे चेअरमन रोहिदास कर्डिले यांनी राष्ट्रवादीशी घरोबा करीत भाजीपाला झटका देण्याची तयारी केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत पुढील दोन दिवसात रोहिदास कर्डिले राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासमवेत कर्डिले गटाचे किती समर्थक राष्ट्रवादीमय होतात यावर जगतापांच्या विजयाचे गणित ठरणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*