
भाजपचे नेते नितीन उदमले यांचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन
अहमदनगर :
दुष्काळाची तीव्रता वाढली असून श्रीरामपूर तालुक्यातील जनतेला यामुळे पाणी व जनावरांच्या चारा टंचाईच्या प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. सरकारने बेलापूर महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र, संपूर्ण तालुकाच त्यात होरपळून निघत असल्याने तालुक्यातील उरलेल्या मंडळांत दुष्काळ जाहीर करण्याची मागणी भाजपचे नेते व माजी प्रशासकीय अधिकारी नितीन उदमले यांनी केली आहे.
महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची कोल्हापूर येथील निवासस्थानी भेट घेऊन उदमले यांनी निवेदन दिले. या सविस्तर निवेदनात त्यांनी श्रीरामपूर तालुक्याचे दुष्काळी प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने कार्यवाहीसाठी आवश्यक उपाययोजना सांगितल्या आहेत. त्यानुसार गावोगावी महसूल प्रशासन याचा आढावा घेऊन पुढील कार्यवाही आठवड्यात पूर्ण करील असे आश्वासन मंत्री पाटील यांनी दिले.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या प्रशासनाने बेलापूर महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला आहे. तिथे त्याबाबत कार्यवाही सुरू झाली आहे. मात्र, उंदिरगाव, टाकली भान व गोंदवणे येथे मात्र अजूनही दुष्काळ जाहीर न झाल्याने प्रशासनाकडून या भागातील गावात टँकर, रोहयोची कामे, चारा छावण्या आदी दुष्काळी उपाययोजना सुरू होऊ शकलेल्या नाहीत. उभा गावातील भीषण पाणीटंचाई व दुष्काळी समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी.
Be the first to comment