
पक्ष्यांच्या किलबिलाट, गायींचे हंबरणे, झाडांचा मंद वारा, झाडाच्या गर्द सावलीत मारलेली दुपारची वामकुक्षी, आजुबाजूला पसरलेला रानफुलांचा गंध आणि स्वच्छ हवा. हे वाचायला किती छान वाटतं. असं जगायला मिळालं तर. खरंच असं सुंदर जगायला कुणाला नाही आवडणार. हा अनुभव घेऊन गुप्ते काकांच्या घरातून बाहेर पडताना मला सुद्धा हेवा वाटला. आजच्या धकाधकीच्या आणि पैशाच्या जोरावर सर्व सुख विकत घेण्याची भाषा करणा-या तरूण पिढीसाठी प्रकाश आणि यतीन गुप्ते या पिता-पुत्रांनी निवडलेली वाट भलेही आडवळाणाची असेल पण प्रत्येकाला हेवा वाटेल अशीच आहे. प्रकाश गुप्ते यांनी आता वयाची सत्तरी ओलांडलेली आहे. परंतु आजही त्यांचा उत्साह एखाद्या तरूणाला लाजवेल असाच असतो. तर यतीनने त्याच्या करिअरची दिशा शिक्षण आटोपल्यावर लगेच निश्चित केली होती. वडिलांनी सुरू केलेला हा गावरान वसा त्यालाही पुढं चालवायचा होता आणि हेच त्याचं ध्येय आहे.
गुप्ते पिता-पुत्रांनी उभ्या केलेल्या या रानातील घरात आज आनंदानं आंब्याची १०० झाडं, काजूची २९ झाडं, नारळाची ६० झाडं. विविध प्रकारचा भाजीपाला, देशी साहिवाल गायींचा शास्त्रशुद्ध गोठा आणि गावरान कोंबडयांसह अनेक पशु- पक्षी वास करून आहेत. उच्चशिक्षित तरूण शेती किंवा शेती आधारित जोडधंद्यात येत नाहीत. त्यांना गलेलठ्ठ पगाराच्या नोक-या आणि भौतिक सुख-सुविधांनी भरलेलं जगणं आवडत असतं म्हणून शेती किंवा शेती आधारित व्यवसायांना दुय्यम
मानतात असं नेहमीच बोललं जातं. हे खरं असलं तरी आजही गुप्ते पिता-पुत्रांसारखे तरूण आहेत जे शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून शेतीला फायदेशिर व्यवसाय बनवण्याचं धाडस दाखवत आहेत. तेही देशी वाणांची आणि प्राचीन संस्कृतीची जपणूक करत. म्हणूनच त्यांच्या कामाला सलाम करावासा वाटतो. चिपळूणपासून साधारणतः २५ किमी अंतरावर वसलेलं ढोक्रवली हे जवळपास २००० वस्तीचं गाव. तिथेच आता गुप्ते कुटुंबियांनी गावाला नवी ओळख दिली आहे. तसं पाहिला गेलं तर गुप्तेंचे वडील एअर इंडियामधून निवृत्त झाले आहेत.
मनात आणलं असतं तर ते आपल्या आणि कुटुंबाच्या आय़ुष्याला अधिक ऐहिक सुखात ठेऊ शकले असते. परंतु मुंबईतील राहतं घर आणि चांगली नोकरी सोडून ते आज आंब्याची, रानमेव्याची शेती करतात. जोडीला साहिवाल गायींचा गोठा आणि गावरान कोंबडी पालनही सुरू आहे. त्यांच्या घराची वाट धरली की गोठ्यातीस शेणाचा वास सुरू होतो आणि नजरेस पडतात मोकळ्या वातावरणात वावरणा-या गावरान कोंबड्यांचे आवाज. शेजारीच अंगणात उभी असलेली विविध जातींची मोहराने लगडलेली आंब्यांची झाडं. सुख यापेक्षा वेगळं ते काय. आता गुप्तेंनी देशी गायींच्या दुधापासून विविध प्रकारचे पदार्थ बनवून त्याचं मार्केटिंग करण्याचं सुरू केलं आहे. त्यांच्या तुपाचा दर आहे रू ३००० किलो. तुप विकत घेण्यासाठी ग्राहकाला सहा महिने अगोदर बुकींग करावं लागतं. बरं इतकी
डिमांड आहे म्हणून काही त्यांनी भारंभार गायी वाढवून व्यवसाय मोठा केला नाही किंवा तसं करण्याचा त्यांचा अजिबात विचारही नाही. कारण सुखाला शॉर्टकट नसतो यावर दोन्ही पिता- पुत्रांचा विश्वास आहे. एकीकडे वाढती मागणी पुरी करण्यासाठी कोणत्याही थराला जाणारी बाजारपेठ पाहिली की मग गुप्तें काकांच्या कामाचं मोठेपण मनात दृढ व्हायला सुरू होतं. गायीच्या दुधापासून तुप, शेण आणि गोमुत्रापासून धूप कांड्या, शेणखत, गावरान अंडी आणि असं बरंच काही त्यांच्या
परसात त्यांनी सुरू केलं आहे. तसा पाहिला तर फार मोठा असा काही त्यांचा वार्षिक जमाखर्च नाही. पण त्यांच्या बॅंक बॅंलेन्समध्ये जमा असलेलं समाधान मात्र खूप मोठ्या व्याजासकट दररोज त्यांच्या पुढ्यात आरोग्याची शिदोरी आणि नवा उत्साह घेऊन येत आहे.
दोघा पिता-पुत्रांना बाजारपेठेचा अंदाज आहे, मुलगा स्वतः मुंबई-पुण्यात फिरून आपली नवनवीन उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करून देतो. त्यासाठी त्यांना वेगळं मार्केटिंग स्कील वापरण्याची गरजच पडत नाही. कारण त्यांचा ग्राहकच त्यांच्या मालाची मार्केटिंग करतो. आणि म्हणूनच त्यांच्याकडे खास गावरान तुपासाठी लोक ६ महिने अगोदर सुद्धा बुकींग करून थांबायला तयार असतात.

एकीकडे बाजारात दुधाला दर नाही म्हणून आंदोलने करणारे शेतकरी आणि दुसरीकडे या सा-यापासून लांब कोकणातील एका खेडयात आपला प्राचीन देशी गायींची वाण घेऊन त्याची जपणूक करणारं कुटुंब. यांना कधीही बाजारपेठेत येऊन त्यांच्या मालाला दर मिळावा म्हणून संघर्ष करावा लागला नाही. किंवा सरकार दरबारी निषेध नोंदवावे लागले नाहीत. चार गावरान गायींपासून सेरु केलेला हा देशी व्यवसाय आता २१ जनावरांवर पोचला आहे. त्यात १७ गायी आणि ४ वळू आहेत आणि ही वाढ झाली आहे ती गोठ्यातील गायींनी जन्म दिलेल्या नवीन वासरांपासून. त्यांनी कधीही
बाजारातून गाय विकत आणली नाही. म्हणजे २००७ सुरू झालेला त्यांचा हा यज्ञ आता एक तप पूर्ण करत आहे. किती मोठी तपश्चर्या म्हणावी लागेल. किती ध्यास आणि चिकाटी. किती काळ ते व्यवसाय वृद्धीची वाट पाहात आहेत. आजमितीला दिवसाला त्यांना मिळतं १५-२५ लिटर दुध. सिझनप्रमाणे त्यात कमी-अधिक होत राहतं. आणि एक किलो तुप बनविण्यासाठी २८-३० लिटर दुध लागतं. म्हणजे दररोज ते पाऊण किलो तुप बनवतात. सुरूवातीला दुध विक्रीपासून सुरू केलेला हा व्यवसाय आता दुग्धजन्य पदार्थांपर्यंत येऊन ठेपला आहे. त्यात भर पडली ती त्यांना पुरक
असणा-या गावरान कोंबड्यांची. त्यांच्या गावरान अंड्यांनाही मोठी मागणी असते. शिवाय ते उन्हाळ्यात गायींचे शेण, गोमुत्र, लोभान आणि नागरमोथ्यापासून धुप बनवतात. त्यालाही खूप मागणी असते आणि कायम ते कमीच पडतं. ग्राहकांना पुरेल इतका माल आम्ही ठेवत नाही म्हणून अनेकवेळा ग्राहक आमच्यावर नाराज असतात. मालाचं उत्पादन वाढविण्याचा सल्ला देतात, त्यासाठी लागणारी मशिन्स देण्याची पण त्यांची तयारी असते. पण त्यासाठी लागणारं दुध कोठून आणायचा हा गुप्तेंचा मिश्किल प्रश्न. त्यात इतकी वर्षं जपलेला दर्जा जाण्याची भिती. त्यामुळे कलाने पण नेटाने त्यांचा व्यवसाय वृद्धीचा हा महायज्ञ सुरू आहे. येत्या काळात गायींचा मुक्तसंचार गोठा करण्याचा त्यांचा मानस आहे. आज इतक्या वर्षांपासून सुरू असलेली ही धडपड मुंबई-पुणे आणि त्याहीपलिकडे जाऊन पोहचली. परंतु गावातून मात्र कोणीही याबाबत साधी चौकशी सुद्धा करायला येत नाही याची खंत दोन्ही पिता- पुत्रांना आहे. निरोप घेताना त्यांनी आपुलकीने पाजलेल्या गावरान दुधाच्या चहाची चव मग कित्येक वेळ जीभेवर रेंगाळत राहिली. मनात व्यवहाराचे आकडे मांडतच मी त्यांचा निरोप घेतला. परंतु आजच्या व्यावहारिक जगात दर्जापेक्षा मार्केटिंगवर भर देऊन आपली उत्पादनं ग्राहकांच्या माथी मारणा-या कंपनीच्या तुलनेत गुप्तेंचं काम तसं किती छोटंसं. परंतु त्यात त्यांनी जपलेली नितीमत्ता आणि सात्विककतेचं मोल कसं करता येईल.
लेखक : उमेश भोसले, कृषी-पणन अभ्यासक, मो. ९७६३७००२२८
Be the first to comment