हे आहेत खनिज घटकांच्या कमतरतेचे दुष्परिणाम

जमिनीतील मुख्य घटक नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक, क्लोरीन, सिलिका, झिंक, लोह, कॉपर ( तांबे ), मॉलीब्डेनम, बोरॉन, मॅंगेनीज, असे विविध घटक प्रत्येक पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असतात व प्रत्येक पिकाची प्रत्येक घटकाची गरज वेगवेगळी असते.

नत्र (Nitrogen ):- पिकाच्या शाकिय वाढीसाठी व सूर्यप्रकाश ग्रहण करण्यासाठी याची प्रमुख भूमिका असते. नत्र हा सर्व प्रकारच्या प्रथिनांची तसेच हरीतद्रव्याचा अविभाज्य घटक आहे. पाने, खोड व फांद्यांची वाढ करतो. वनस्पतींची वाढ जलद गतीने होते. वनस्पतींच्या शरीरात प्रथिनांचे प्रमाण वाढवितो पालेभाज्या तसेच जनावरांच्या वैरणीचा दर्जा उंचवतो. पालाश, स्फुरद तसेच अनेक मुलद्रव्यांचे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शोषणही घडवून आणतो. उर्जेचे वहन करण्यासाठी व न्युक्लीक आम्लातील महत्वाचा घटक आहे.

स्फुरद (Phosphorus):- पिकाची उत्पादकता स्फुरद हा घटक ठरवत असतो समजा ऊस पिकाची एकरी २० किलो स्फुरद ग्रहण केल्यास एकरी ऊस उत्पादनही २० टन येते. तसेच ६० किलो स्फुरद ग्रहण केल्यास एकरी ६० टन ऊस निघतो. १२० किलो स्फुरद ग्रहण केल्यास १२० टन ऊस निघतो. म्हणजेच स्फुरदाची ग्रहण क्षमता वाढविणे म्हणजेच ऊसाची एकरी उत्पादकता वाढविणे. पिकवाढीच्या पुर्वावस्थेत भरपूर स्फुरदाचा पुरवठा झाला तर प्रजननसंस्था तयार होण्याची सुरुवात लवकर होते. बहुसंख्य वितरकांचा स्फुरद हा महत्वाचा घटक असून वनस्पती द्रव्यामध्ये साठविलेल्या शक्तीचे नियंत्रण घडवून आणून आवश्यक तेवढी शक्ती इतर कार्य करण्यासाठी पिकाला उपलब्ध करुन देतो. मुळांची वाढ भरपूर व लवकर घडवून आणतो. पीक जोमाने वाढते व झाडाला टणकपणा येतो. जास्त नत्रामुळे होणाऱ्या अनिष्ट परिणामांना आळा घालतो. पिकांचा दर्जा सुधारतो. स्फुरदामुळे डाळ वर्गातील पिके वातावरणातून जास्त शोषून घेतात. पिकामध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढविते व थंडीपासून बचाव करते.

पालाश ( Potash ):- पिकाची गुणवत्ता व रोग प्रतिकारक शक्ती, पाण्याची कमतरता सहन करण्याची ताकद याकरिता पालाशची मुख्य भूमिका असते. झाडाचा जोमदारपणा आणि प्रतिकारशक्ती वाढवितो. तृणधान्यामध्ये ( भात व गहू ) टणकपणा वाढवितो त्यामुळे ही पिके जमिनीवर लोळण्यास प्रतिबंध होतो. पेशींमध्ये पाण्याचे नियंत्रण करतो. रवाळ व साखरेसारख्या पिष्टमय पदार्थांच्या निर्मितीस व त्यांचे एकमेकांत रुपांतर होण्यास तसेच त्यांचे स्थलांतर घडवून आणण्यास मदत करतो. धान्याच्या दाण्यांची वाढ व्यवस्थित होण्यास मदत करतो. डायजेस्ट सारख्या संयोजकांची क्रिया जलद घडवून आणण्यास मदत करतो. जास्त नत्रामुळे उद्भवणारे दुष्परिणाम नाहीसे करून पिकांचा दर्जा उंचावतो. संप्रेरकांना उत्तेजन देणे. प्रकाश संश्लेषणष शर्करेचे, पाणी व पोषण तत्वाचे वहन, प्रथिने तयार करणे, पिकांचे आरोग्य व प्रत यांसाठी महत्वाचे.

जस्त ( Zinc ):- जमिनीस दिलेले नत्र पाण्यापर्यंत पोहोचविण्याचे काम जस्त करतो. पानांची काळोखी ही सूर्यप्रकाश ग्रहण करण्यासाठी गरजेची असते. ही पानांची काळोखी जस्त हा घटक ठरवत असतो. वनस्पतींमधील पुनरूत्पादन क्रिया चांगल्या पध्दतीने घडवतो. जस्तामुळे वनस्पतींना पाणी शोषणात, संजीवके तयार करण्यासाठी तसेच प्रथिने तयार करुन धान्य तयार करावयास मदत होते.

बोरॉन:- जमिनीतील विविध खनिजे व पाणी पाना- पानापर्यंत पोहोचविणे तसेच पानात निर्माण झालेले अन्न योग्य ठिकाणी पोहोचविणे ( translocation ) हे बोरॉनचे कार्य असते. ऊसाच्या कांडीची लांबी, ऊसातील साखर उतारा ठरविण्यासाठी बोरॉन हाच घटक महत्वाचा असतो. मुळांची चांगली वाढ होऊन पिके लवकर पक्व होण्यासाठी फुले व फळे लवकर तयार होण्यासाठी परागकण निर्मितीमध्ये व पिकांना नत्र उपलब्ध करून देण्यासाठी साखरेचे प्रथिनांमध्ये रुपांतर करण्यासाठी बोरॉन महत्वाचे आहे. कॅल्शियम शोषण, शर्करेची ने- आण, प्रथिनांची निर्मिती व मधुरफळांच्या निर्माण कार्यात मदत करतो.

सिलिका:- पानात अन्न बनविण्यासाठी सौर ऊर्जा शोषून घेणे हे काम पूर्णपणे सिलिका या घटकावर अवलंबून असते. सिलीकॉन मोनोसिलीसीक आम्ल स्वरुपात पिकांकडून शोषण होते. त्यामुळे पेशी कवच कठीण बनते. पाण्याचे उत्सर्जन कमी होऊन पिके दुष्काळात तग धरु शकतात. रोग व कीडींचा प्रादुर्भाव कमी होतो. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत वाढ करते तसेच जमिनीत स्फुरदाची उपलब्धता वाढविते.

मॅग्नेशियम:-प्रकाश संश्लेषण म्हणजेच अन्न बनण्याची क्रिया, पानात किती हरितद्रव्य आहे यावर अवलंबून असते. हरीतद्रव्य बनण्यासाठी मॅग्नेशियम हा मुख्य घटक आहे. तो हरितद्रव्य व प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये महत्वाची भूमिका बजावतो. कर्बोदके, प्रथिने व मेद तयार होण्यासाठी मॅग्नेशियम उपयुक्त असतो. संप्रेरके व ऊर्जा तयार होण्यच्या प्रक्रियेमध्ये मॅग्निशियम अन्नद्रव्य महत्वाचे आहे. पिकात न्युक्लिक आम्ल तयार होण्याचे कार्य करते. पिकांची व मुळांची वाढ लवकर करते. नत्र, लोह, बोरॉन, जस्त, तांबे व मॅंगेनीज यांचे पिकांमध्ये शोषण वाढविले जाते. पिकांमध्ये शर्करेचे वहन चांगल्या प्रकारे होते व बीजोत्पादन चांगले होते.

कॅल्शियम:- शेंड्याची वाढ होण्यासाठी हा घटक महत्वाचा असतो. याच्या अभावी झाडाची वाढ खुंटते. झाडास कळ्या, फुले येणे थांबते, उत्पादन घटते. पेशीभित्तिका मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम मदत करते. पिकांमध्ये फूल, फळ धारण क्षमता वाढविण्यासाठी मदत करते. पिकांची प्रत उत्तम राहण्यास व उत्पादन अधिक काळ टिकून राहण्यास मदत करते. उष्णतेपासून पिकांचे संरक्षण करते. बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोगांविरुध्द प्रतिकार क्षमता वाढविते. भुईमुगामध्ये शेंग कुजत नाही व शेंगा चांगल्या भरल्या जातात. अन्नद्रव्य शोषण करण्यास महत्वाची भूमिका बजावतो.

गंधक ( Sulphur ):- मुळांची वाढ, पांढऱ्या मुळांची निर्मिती आणि वनस्पतीची कीड रोग प्रतिबंधक शक्ती गंधकामुळे निर्माण होते. गंधकाअभावी पानाच्या देठाचा आकार लहान होतो. त्यामुळे उत्पादनात घट येते. हरितलवके निर्मितीमध्ये महत्वाचे कार्य करतो. त्यामुळे पेशींची वाढ होते व झाडांची वाढ चांगली होते. शेंगवर्गीय पिकांच्या मुळांची वाढ चांगली होते. त्याबरोबरच बियांच्या वाढीसाठी गंधकाचे महत्व आहे. गंधकामुळे पिकात गंधकयुक्त अमिनो आम्लांची आणि विशिष्ट प्रथिनांची निर्मिती होते. नत्राच्या वापरात वाढ होऊन हरितद्रव्य निर्मितीत वाढ होते. गंधकामुळे लोहाच्या कमतरतेमुळे येणाऱ्या केवड्यांस प्रतिबंध होतो. जमिनीचा सामू काही प्रमाणात कमी होतो. जमिनीत स्फुरद, लोह, जस्त व तांबे या अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.

मंगल ( मॅंगेनीज ) :- याच्या अभावी पानातील जाळीदार  शीरा अगदी ठळक दिसतात व त्यामधील भाग पिवळसर होतो त्यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया, अन्न निर्मिती प्रक्रिया मंदावते. प्रकाश संश्लेषण व विविध सेंद्रिय पदार्थ रुपांतरण करण्यासाठी मंगल महत्वाचे आहे. कर्बोदके व प्रथिने तयार करणे, जैव व रासायनिक प्रक्रियांना चालना देते व विकारांना प्रवृत्त करते.

लोह:- याच्या अभावी कोवळ्या पानांची वाढ थांबते त्यामुळे झाडाचा आकार मोठा न होता लहान राहतो. त्याप्रमाणात उत्पादनात घट होते. मुख्य अन्नद्रव्य उपलब्धतेसाठी लोह महत्वाचे असून ते प्रकाश संश्लषणा दरम्यान आवश्यक आहे. कडधान्य पिकांच्या मुळांमध्ये हिमोग्लोबीन तयार होण्यासाठी लोह महत्वाचे आहे. लोहामुळे नत्र स्थिरीकरणास मदत होते संप्रेरके निर्मिती व त्याचे वहन होण्यासाठी लोहाची गरज असते.

तांबे :- तांब्याच्या अभावी मुळावर गाठी तयार होत नाहीत. त्यामुळे नत्राचे शोषण होत नाही. पानातील हरित द्रव्याचे प्रमाण कमी होते. प्रथिने व विकरांमुळे जैव रासायनिक क्रियामध्ये वाढ होते तसेच पुनरुत्पादन क्रिया, वनस्पतींच्या श्वसन क्रिया व प्रकाश संश्लेषण सुरळीत होण्यासाठी मदत करतात. प्रथिने व संप्रेरके तयार होण्यासाठी काही प्रथिनांमध्ये तांबे आवश्यक असते. पिकांमध्ये कर्बोदके तयार करण्यासाठी तसेच पुनरुत्पादन करण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व संप्रेरकांचे संतुलन होण्यासाठी तांबे गरजेचे आहे. अ जीवनसत्व निर्माण करण्यास मदत करते. फळे पिकविण्याच्या प्रक्रियेत महत्वपूर्ण कार्य करते.

मॉलीब्डेनम :- पानाचा आकार व्यवस्थित होत नाही. पानाची अनावश्यक लांबी वाढते. त्यामुळे अन्न तयार होणे थांबते. कडधान्य पिकात मॉलीब्डेनम ची बीजप्रक्रिया केल्यास पीक उत्पादनात लक्षणीय वाढ होते. नत्राच्या व गंधकाच्या चयापचयात मदत होते. मॉलीब्डेनम हे विकरांचा महत्वपूर्ण घटक आहे. नत्र स्थिर करणाऱ्या जीवाणूंच्या वाढीस व फॉस्फेट व क जीवनसत्व तयार करण्यास मदत करतो.

सर्व मुख्य, दुय्यम व सूक्ष्म घटकांची अद्वितीय ( unique ) अशी भूमिका असते. एकूण १७ घटकांपैकी १६ घटक १०० टक्के उपलब्ध आहेत. परंतु जर १७ वा घटक ५० टक्केच उपलब्ध असेल तर उत्पादन ५० टक्केच येते. बाकीचे १६ घटक १०० टक्के असूनही काही उपयोग होत नाही. १७ वा घटकही १०० टक्केच उपलब्ध असावा लागतो. त्याचवेळी १०० टक्के उत्पादन घेता येते. माती परीक्षण रिपोर्ट प्रमाणे त्यातील कमतरता भरून काढल्याशिवाय आपल्याला तरणोपाय नसतो.

जमिनीतील अन्नद्रव्यांचा साठा ( कि./ हे./पी.पी.एम. ) १४० कि. स्फुरद, पालाश १०० कि., कॅल्शिअम १.५ मिली./१०० ग्रॅम, मॅग्नेशियम १मिली/ १०० ग्रॅम, गंधक १० पी. पी. एम. , लोह ४५.०० पी. पी. एम., मॅगेनीज २.० पी. पी. एम., जस्त ०.८५ पी. पी. एम., कॉपर ०.५ पी. पी. एम., बोरॉन ०.५ पी. पी. एम., मॉलीब्डेनम ०.२ पी. पी. एम.

युरिया वगळता इतर रासायनिक खते व सूक्ष्म अन्नद्रव्ये वापरताना त्यांच्या वजनापेक्षा दुप्पट वजनाच्या कुजलेल्या शेणखतात कमितकमी ८ ते १० दिवस गोण्यांमध्ये भरुन ठेवून नंतर वापर करावा. त्यामुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते.

अन्नद्रव्यांची कमतरता भरुन काढणे

पिकांचे १०० टक्के उत्पादन मिळविण्यासाठी विविध घटकांचे कमीत- कमी ६० टक्के उपलब्धता असणे गरजेचे आहे. त्यासाठी विविध पिकांसाठी शिफारस केलेली नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशिअम, गंधक, मॅंगनीज, लोह, बोरॉन, जस्त, कॉपर, मॉलीब्डेनम, सिलीका इ. ची मात्रा द्यायचीच. पण त्यातील मागील तूट भरुन काढण्यासाठी किंवा कमीत- कमी ६० टक्के उपलब्धता होण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या एकूण मात्रेपैकी एका हंगामात फक्त ३३ टक्के हिस्सा टाकावा. दुसऱ्या व तिसऱ्या हंगामात प्रत्येकी ३३ टक्के तूट भरुन काढावी. एकावेळी १०० टक्के तूट भरुन काढणे तांत्रिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्याही व्यवहार्य ठरत नाही.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*