शेतीकथा | काड्याकुड्यांचे बायोमास; शेत पिकते हमखास..!

उसापासून शाश्वत उत्पन्न मिळण्याचे गोडवे गायले जातात. मात्र, या पिकाशिवायही पपई, कांदा, कपाशी आणि इतर भाजीपाला व वेलवर्गीय पिकांतून जीवनात गोडवा मिळविणारे प्रयोगशील शेतकरी राकेश गोरखराव काकुस्ते (शेणपूर, साक्री, धुळे) यांची यशकथा अफलातून आहेच की…

शेतातील काड्याकुड्यांचे बायोमास वापरून उसाशिवाय शाश्वत उत्पन्न आणि शेणखताशिवाय शेतीचे एक नवीन सूत्र राकेश यांनी यशस्वी करून दाखविले आहे.

बारा वर्षापूर्वी ते उसाची शेती करीत होते. पण ते पीक काही जमत नव्हते. मग त्यांनी पपईचे नियोजन केले. त्या पहिल्याच प्रयत्नात आक्रित घडले. त्यांना एकरातच शंभर टन पपई निघाली. अर्थात हे अपवादात्मक होते. पण नवीन उभारी देणाराही हा अनुभव होता. त्यांना पपई शेतीचे गमक सापडले होते.

ते दरवर्षी पपई घेतात. मागील 12 वर्षांत एकरी सरासरी 50 टन पपई मिळाली आहे. वर्षांतला सरासरी विक्री दर 5 रू./किलो. खर्च 50 हजार रुपये काढून दोन लाख उत्पन्न एकरात सातत्याने मिळातेय त्यांना. पपई हा ऊसाला चांगला पर्याय मिळाला आहे या शेतकऱ्याला…

ते पपईमध्ये टरबूजाचे आंतरपिक नियमित घेतात. 22-25 टन टरबूज निघते. होळीच्या आसपास टरबूज काढणीला येते. एप्रिल-मे महिन्यामध्ये पपईची रोपे लावतात. सात महिन्यानंतर सुरू झालेली पपईचा तोड पुढे सहा-सात महिने नियमित राहते. असे साधारण वर्षाचे पपई पीक चालते. त्यात एक आंतरपीकही घेता येते.

पपई हार्वेस्ट झाल्यानंतर रोटर मारून या पपईचे सहा-सात टन बायोमास शेतातच जिरवले जाते. पुढे त्या क्षेत्रात कपाशी, कांदा असा पीकपालट होतो. एकरात अठरा क्विंटलच्यापुढे कपाशी आणि 200 क्विंटलच्या पुढे कांदा पिकतो. तोही शेणखताशिवाय. कारण बायोमास हाच आहे या शेताचा आधार…

त्यांच्याकडे 28 एकर क्षेत्र आहे. पपई दरवर्षी घेतात. फक्त क्षेत्रपालट करतात. कांद्याची पात, कपाशीच्या पऱ्हाट्याही शेतीतच गाडतात. त्याचेही बायोमास शेतात गाडून जमीन तयार केली जाते. राकेश गोरखराव काकुस्ते (शेणपूर, साक्री, धुळे) यांची ही यशकथा नवीन शिकवण देणारी आहे की..!

(शिवारातल्यानोंदी)
लेखक : दीपक चव्हाण, पुणे
(शेती विषयाचे अभ्यासक व मुक्त पत्रकार)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*