बीव्हीजी म्हणजे कृषी विस्ताराचे विद्यापीठ : चंद्रकांत दळवी

पुणे :
बीव्हीजी लाईफ सायन्सेस नावाची कंपनी कृषी विस्ताराचे विद्यापीठ असल्याचे मत माजी जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केले.

बीव्हीजी लाईफ सायन्सेसच्या वतीने आयोजित केलेल्या शेतकरी व वितरकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बीव्हीजी समुहाचे चेअरमन हणमंतराव गायकवाड, उमेश माने, दिप शुक्ला, बी.टी. गोरे, गणेश लिमये व भालचंद्र पोळ आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना दळवी म्हणाले की, कृषी विद्यापीठे शेती संशोधन व कृषी विस्ताराचे कार्य करतात. त्याच प्रमाणे बीव्हीजी लाईफ सायन्सेच काम सुरु आहे. गेल्या ३ वर्षात बीव्हीजी लाईफ सायन्सेसने कृषी विद्यापीठांपेक्षा अधिक चांगली कामगिरी बजावली आहे.
कृषी विस्ताराला विपणनाची जोड देण्यात बीव्हीजीला यश मिळाले आहे. बीव्हीजीचे शास्त्रज्ञ हेच बीव्हीजी लाईफ सायन्सेसच्या पाठीचा कणा आहे.
बीव्हीजीने देशाची प्रगती करण्यासाठी ग्रामिण भागातील शेती अधारित गुंतवणूक वाढवली आहे.त्यामुळे बीव्हीजीने शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय दिल्याने त्यांनी शेतकऱ्यांची विश्वासहार्ता जिंकली आहे. विषमुक्त शेतमाल विक्रीची बाजारपेठ निर्माण करण्यासाठी बीव्हीजीने पुढाकार घेतला आहे. यापुढे शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीची चिंता राहिली नाही.

या वेळी बोलताना गायकवाड म्हणाले की, ‘ बीव्हीजी लाईफ सायन्सेसने विष मुक्त शेती व निरोगी भारत घडविण्याची चळवळ देशात सुरु केली आहे. चळवळीला बळ देण्यासाठी यंदा नव्याने ३ हजार कृषी पदवीधरांची भरती बीव्हीजीमध्ये करणार आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. परंतु आता शेती हा व्यवसाय म्हणून करणे गरजेचे आहे. शेतीसाठी खर्च कमी केलाच पाहिजे. जास्त उत्पादन मिळावे, या आशेने रासायनिक खतांचा वापर जास्त प्रमाणात होत आहेत. हे शेतीसाठी व माणवाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. शेतकऱ्यांनी प्रथम माती व पाणी परिक्षण करुन घ्यावे. शेतीत नवनवीन जैविक खते व तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेती हा यशस्वी व्यवसाय होईल. यापुढे प्रत्येक शेतकरी व नागरिकाने विषमुक्त शेतीसाठी प्रचार व प्रसाराबरोबर प्रत्यक्ष अनुकरण करावे. वाढलेले आजार हे आहारातून होत आहेत म्हणून आता पुन्हा सेंद्रीय उत्पादन अर्थात विषमुक्त शेतीकडेच वळले पाहिजे. तरुणांना बाहेरच्या देशात नोकरी व व्यवसायासाठी मोठी संधी आहे. प्रत्येकाकडे एक वेगळे कौशल्य आहे. त्याचा वापर करा. कौशल्य आधारित शिक्षण घेत व्यवसाय करा. यश नक्की मिळेलच संघर्ष जीवनाला घडवत असून भारत निर्माण कंपनी ही शेती, स्वच्छता, आरोग्य या क्षेत्रात मोठे काम करत आहे. नव्याने अनेक योजना राबवून देतांना सुमारे दहा कोटी जनतेच्या आयुष्यात परिवर्तन करण्याचा मनोदय असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे स्वागत बीव्हीजी लाईफ सायन्सेसचे संचालक गणेश लिमये यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्मिता पोफळे यांनी केले. बीव्हीजी लाईफ सायन्सेसचे कृषी विभागाचे प्रमुख भालचंद्र पोळ यांनी आभार व्यक्त केले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*